गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

वाढता कौटुंबिक विसंवाद


 


                 आजकाल सगळीकडे आपण ऐकतो कि लोकांना सतत कसल्या ना कसल्या गोष्टीची चिंता सतावत असते. मनावर कसला ना कसला ताण असतोच. टेंन्शन हा शब्द तर जीवनातील अविभाज्य घटकच बनला आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या पहिलीतल्या मुलीशी सहज गप्पा मारत असताना ती मला म्हणाली की मला अभ्यासाच टेंन्शन आल आहे. त्यावेळी मी आवाक झालो. आजच्या घडीला पहिलीतील मुलीलाही टेंन्शन येत आहे ज्या वयात खेळायचे असते त्या वयात मुलांना कसल टेंन्शन येत. त्यात त्या मुलांचीही चूक नाही घरी आई वडील कामावर जात असल्याने मुलांना शाळा आणि त्यानंतर क्लासमध्ये जाव लागत त्यामध्ये शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास वेळ मिळालाच तर त्यावेळात मुले टॅब, मोबाईलवरील गॅम्स खेळण्यात व्यस्त असतात. यामध्ये मुले आणि पालकांचा संवादच होत नाहीत. मुले आणि पालक ही विसंवादाचे एक उदाहरण झाले खऱतर कौटुंबिक विसंवाद ही आजच्या धावपळीच्या जगात मुख्य समस्या बनली आहे. 


                      आताचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.आज मोबाईल, इंटरनेट आणि इतर साधनांमध्ये आपण  इतके दंग झाला आहे की माणसे घऱात एकत्र बसली असली तरी त्यांची लक्ष मोबाईल मध्ये असते. त्यामुळे फेसबुक, व्हॅाटसप सारख्या संवादमाध्यमांचा  ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या आजोबांपर्य़ंत सर्व याचा सर्रास वापर करत आहेत.यामध्येच प्रत्येक जण व्यस्त असतो की इतर गोष्टींना त्याच्याकडे वेळच उरत नाही. हे इंटरनेटचे व्यसन कौटुंबिक विसंवादाचे मुख्य कारण आहे.

घर असावे सुंदर माझे असे सर्वांनाच वाटते परंतु आता घरात घरपण राहिले नसुन फक्त चार भिंती आहेत. ज्या भिंतीमध्ये  घरच्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची कल्पनाही बहुतेक जणांना नसते. घरातल्या लोंकाशी बोलणेच होत नसल्याने आपले पणाचा ओलावा उरत नाही. कोणा विषयी आदर राहत नाही.  प्रत्येक जण आपल्यापूरती विचार करतो. त्यामुळे माणूस राहण्यासाठी म्हणून राहत आहे अशा चार भिंतींना घऱ म्हणावे का हाच प्रश्न पडतो.


         काही वर्षांपूर्वी 'श्रीयुत गंगाधऱ टिपरे ही मालिका येत असे. ही मालिका इतर मालिंकापेक्षा फार वेगळी होती. यात शिऱ्या आणि त्याच्या आजोबांचे नाते, आई वडील शेखर, शामला यांच्या नात्यातील ओलावा घऱातील वेगवेगळ्या समस्या रंजकरित्या सोडविल्या जात. कुटुंबाचे महत्व या मालिकेतून मांडले गेले होते. त्यामुळे ही मालिका लोकांच्या दिर्घकाल स्मरणात राहिली आहे. आज त्याप्रकारच्या मालिकाही येत नाही आणि चित्रपटही नाहीत. प्रत्यक्षातही लोकांचा दुष्टीकोन बदलला आहे हे महत्वाचे आहे.आज आजीच्या गोष्टी ऐकण्यात नातवाला रस नसतो. मोबाईल,टॅबवरील गेम्ससारख्या आभासी विश्वातच लहान मुले रमत आहेत. यामुळे नातेसंबधातील दरी वाढत जात आहे. 
          कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेकही घातक असतो. इंटरनेटचाही अतिवापर हा माणसाला घातक ठरु लागला आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी आपली माणसे दुरावली आहेत. माणूस आभासी जगात वावरु लागला आहे. प्रत्यक्ष संवादाला माणसाच्या जीवनातील स्थान कमी होऊ लागल्यानेच अनेकांना मानसिक आजार होत आहेत. कौटुंबिक विसंवादातूनच या सर्व समस्या होत आहेत हे मान्य करावच लागेल.
         काळ बदलतो तसे माणसालाही बदलावे लागते  त्यामुळे कुटुंबातील नातेसंबधामध्येही काळानुसार बदल  होत आहे. मात्र  कुटुंबातील व्यक्तींचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेच पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनातील समस्या जर आपण घऱच्यांसमोर मांडल्यास तर समस्येचे निराकरण होऊ शकते. काहीवेळा समस्येवर तोडगा निघाला नसला तरी जो हवा असणारा भावनिक पाठिंबा आपल्याला कुटुंबाकडून नक्कीच मिळतो. या पाठिंबाची आपल्याला खरी गरज असते.
         माणसाने कुटुंब आणि नातेसंबधावर लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर माणसाची अवस्था भरकटलेल्या जहाजाप्रमाणे होईल.  पौराणिक काळापासून आपल्या देशात कुंटुंबाला महत्व दिले आहे. कुटुंबाच्या संस्कारावर माणूस घडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्परांशी नियमित संवाद ठेवणे प्रत्येक कुटुंबाने महत्त्वाचे मानले तर कौटुंबिक विसंवादाचे प्रमाण नक्कीच कमी होईल.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा