रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

गोल्डन बॉय नीरज चोप्रा

 


कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता,         एक भाला तो तबीयत से उछालो यारों...! 

आज नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक  जिंकत वरील शेर सिध्द केला आहे.ट्रेक एण्ड फिल्ड प्रकारात भारताने ऑलिम्पिकमध्ये कधीच पदक जिंकले नव्हते. मात्र नीरजने अद्भुत कामगिरी करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आसमानमध्ये भाला फेकत सुवर्ण सुराख केला आहे. भारताला तब्बल १३ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळाले असून आज भारतीय तिरंगा ऑलिम्पिकमध्ये डौलाने फडकला. १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रधून वाजली आणि सर्व भारतीयांना राष्ट्रधूनवर उभे राहून तिरंग्याला अभिवादन करता आले. हे यश, हा सुवर्णक्षण नीरजने भारतीयांना दिला आहे.

मिल्खा सिंग, पी.टी. उषा यांच पदक ०.१० सेकंद फरकाने गेले होते. आज मिल्खा सिंग यांना खरी श्रद्धांजली मिळाली आहे. स्वर्गात फ्लाइंग सिंखांच्या आनंदाला पारावार उरला नसणार. पी टी उषांही आनंदा अश्रूंनी हा विजय पहात असतील. जे स्वप्न असते ते सत्यात आणण्यासाठी नीरज सारखी मेहनत आणि आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास नीरजच्या सुवर्ण यशाने सर्व भारतीय खेळाडूंना आणि भारतीयांना नक्कीच मिळाला असणार. 

नीरज नावाचा अर्थ कमळ असाही होतो. भारताच्या ट्रेक एण्ड फिल्ड क्रिडा प्रकारातील भूतकाळ हा चीखल असून नीरजचे सुवर्णपदक हे सुवर्ण 'कमळ' आहे. आज नीरजच्या यशाने भारताने या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकले आहेत.आतापर्यंत सर्वात जास्त पदक आपण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलो आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्या सुवर्णपदकाची आस साऱ्या भारतीयांना होती ते नीरजने जिंकत देशाला अनमोल भेट दिली आहे.  नीरजचे हे यश भारतातील क्रिडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात असावी आणि उत्तरोत्तर क्रिडा क्षेत्रात नीरजसारखे गुणवान खेळाडू तयार होवोत. भारत क्रिडा क्षेत्रात महासत्ता बनावा हीच इच्छा. नीरज तुझ्यावर कितीही लिहिले तरी कमीच पडेल. नीरज तुला मानाचा मुजरा.

सलाम नीरज. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अंधेरा हट गया, सुरज निकल गया, पदक मिल गया।




८ वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताला आज ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ५-४ ने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. ३-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारताने सलग ४ गोल करत दमदार कमबॅक केला आणि जर्मनीला नेस्तनाबूत केले. 

साल २००८ भारत बीजींग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ न शकला नाही. त्यामुळे अनेक तज्ञांनी भारताच्या हॉकीला तिलांजली दिली होती.  २०२० टोक्यो ऑलिम्पिकच्या सुरुवातीला एका प्रख्यात वृत्तपत्राच्या वार्ताहराने भारतीय पुरुष संघाबद्दल ते मेडलचे दावेदार नाहीत असे म्हणत हिणवले होते. त्या सर्वांना आजचा पदकविजय हे जबरदस्त उत्तर आहे. हॉकी ही भारताची अस्मिता आहे. भारतीयांचे हॉकीशी भावनिक नाते आहे.जितके प्रेम या स्पर्धेत भारतीयांनी हॉकीवर दाखवले तेवढेच प्रेम कायम ठेवा हॉकीला सदैव समर्थन द्या. या विजयामुळे आज आपण खऱ्या अर्थाने हॉकीसाठी चक दे इंडियाचा जयघोष करत आहोत. भारतीय हॉकीवर गर्व आहे.


सलाम भारतीय हॉकी संघ. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

टोक्यो ऑलम्पिक- रंग दे तिरंगा 🇮🇳

 

आजपासून उगवत्या सुर्याचा देश म्हटल्या जाणाऱ्या जपानमध्ये टोक्यो येथे ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट अवघे जग ऑलम्पिकमय होणार आहे.  गेल्यावर्षी होणारी स्पर्धा कोरानामुळे यावर्षी आयोजित केली जाईल असा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघटनेने घेतला होता. या वर्षीही स्पर्धा होणार की नाही याबाबत शंकाच होती कारण कोरोनाची जागतिक परिस्थिती आणि जपानमधील कोरानास्थितीमुळे स्पर्धेला असलेला स्थानिकांचा विरोध मात्र या सर्वविरोधास दूर करत अखेर आज या स्पर्धेस सुरुवात होत आहे. स्टेडियमवर प्रेक्षक मर्यादित असल्याने तेथील उत्साह कमी असेल मात्र जगात ऑलम्पिकमुळे उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण नक्कीच असेल. कोरोनाच्या या निराशादायी वातावरणात अवघ्या जगाचे लक्ष वळविण्याचे कार्य ऑलम्पिक करत आहे.


रंग दे तिरंगा

ऑलम्पिकमध्ये भारताचा विचार केल्यास या ऑलम्पिक मध्ये भारताचा 120 खेळाडू असलेल्या आतापर्यंतचा सर्वात जास्त खेळाडूंचा चमू जात आहे ही खरच अभिमानास्पद बाब आहे. पदकांच्या दावेदारांचा विचार केल्यास बॅडमिंटनमध्ये गेल्या दोन्ही ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळाले होते. यावेळीही गेल्या ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ही सुवर्णपदकाची प्रबऴ दावेदार आहे. कुस्तीतही मागील तीन ऑलम्पिकमध्ये पदक मिळाले आहे यावेळी विनेश फोगट, बजरंग पुनिया कुस्तीमध्ये पदक जिंकू शकतात. बजरंगची गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरी पाहता तो सुवर्णपदक जिंकेल असे म्हटले जात आहे. 2016 च्या ऑलम्पिकमध्ये ऐन भरात असणाऱ्या विनेशला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली होती त्यामुळे या स्पर्धेत पदकासाठी ती पराकाष्ठा करेल हे नक्की.

नेमबाजीमध्ये युवा नेमबाज मनु भाकर, सौरभ चौधरी, यांच्याकडून पदकाची आस आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्याकडेही पदक मिळविण्याची क्षमता आहे. बॉक्सिंगमध्ये सुपरवुमन मेरी कोम आणि अमित पांघल हे पदक निश्चित करु शकतात. एथलेटिक्समध्ये भारताची पदकांची पाटी नेहमी कोरी राहिली आहे यावेळी मात्र भालाफेकपटू नीरज चोप्राच्या रुपाने आशेचा किरण आहे. द्युतीचंद 200 मीटर धावणे आणि महाराष्ट्राचा अविनाश साबळे स्टीपलचेसमध्ये कमाल करु शकतो.

तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमांकावर प्रथम स्थानी असणाऱ्या दिपिका कुमारी भारताची सुवर्णकन्या बनू शकते. प्रविण जाधव हा महाराष्ट्राचा तिरंदाज ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची घरची परिस्थिती अतिशय गरीब आहे. आई, वडील शेतात मोलमजुरी करतात पण या पठ्ठ्याने खडतर संघर्ष करत आज ऑलम्पिकमध्ये स्थान मिळविले आहे. पंतप्रधान मोदींनीही त्याच्याशी थेट संवाद साधून त्याचे कौतुक केले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू भारताची एकमेव खेळाडू प्रतिनिधित्व करत आहे. विशेष म्हणजे तीने जागतिक विश्वविजेतेपद जिंकले असून ती देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल असा विश्वास वाटत आहे. टेबलटेनिसच्या मिश्र दुहेरीत देशाचे अव्वल टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल आमि मनिका बात्रा यांची जोडी चीनच्या तगड्या आव्हाना टक्कर देऊन पदकाची मानकरी होऊ शकते.

आता बोलूया अशा खेळाबद्दल ज्या खेळाने भारतासाठी ऑलम्पिकमधील इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला आहे पण गेली 40 वर्षे या खेळात भारताला पदक मिळाले नाही ही एक लाजिरवाणी बाबही आहे.  होय, मी हॉकीबद्दल बोलत आहे. क्रिकेट जरी देशाचा धर्म असला तरी हॉकीशी भारतीयांच भावनिक नाते आहे. गेली 40 वर्ष पदकांची पाटी कोरी असणाऱ्या भारतीय दोन्ही हॉकी संघांना यावेळी पदक जिकण्याची सुवर्णसंधी आहे. पुरुष हॉकी मध्ये भारत जागतिक क्रमवारीत 4 थ्या क्रमांकावर असून गेल्या काही वर्षांपासून भारताच्या खेळात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे यावेळी पुरुष हॉकीत पदक जिंकून भारतीयांना चक दे इंडिया म्हणणाची आणि आनंद साजरा करण्याची संधी द्यावी. राणी रामपालच्या महिला हॉकी संघानेही अमेरिकेसारख्या ताकदवान संघाचा पराभव करत ऑलम्पिकमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महिला हॉकी संघाने कामगिरीत सातत्य राखल्यास ते मोठमोठ्या संघाला हरवून देशाला पदक जिंकवून देऊ शकतात. याव्यतिरिक्त टेनिस,स्विमिंग, फेंन्सिंग, ज्युदो आणि घोडेस्वारी या खेळांमध्येही भारतीय खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत 

ऑलम्पिकमध्ये पदक विजेत्यामध्ये नव्या  खेळाडूंचीही भर पडू शकते. काही धक्कादायक निकाल ही लागू शकतात कारण शेवटी हा खेळ आहे आणि खेळात अशक्य असे काही नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या खेळांच्या थराराचा आनंद जग घेईल. आपण रोजच्या जीवनात कितीही वेगवेगळे असलो तरी 15 दिवसांसाठी आपले खेळाडू देशाला एकत्र आणतील. हेच खेळाचे वैशिष्ट्य आहे. 2008 मध्ये ऑलम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते त्यानंतर ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजले नाही. यावेळी हा 13 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपावा आणि खेळाडूंच्या सुवर्णकामगिरीमुळे ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजावे.  या क्षणासाठी प्रत्येक देशवासिय आसूसलेला आहे कारण तो क्षण त्या खेळाडूंसाठी आणि सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण असेल. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन भारतासाठी प्रथमच दोन आकडी पदकसंख्या जिंकण्याचा विक्रम करावा आणि चक दे इंडियाचा नारा घुमावा हीच इच्छा. टोक्यो ऑलम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. चक दे इंडिया, रंग दे तिरंगा  

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

अजिंक्य भारत, अतुल्य भारत, विजयी भारत

  

( आजचा लेख थोडा मोठा झाला आहे परंतु खर म्हणजे भारतीय संघाने मिळविलेले यश हे इतक ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे की शब्द अपुरे पडतील.)

दमा के पुरा किया जितना भी खसारा था
वही से जितके निकला जहां मैं हारा था।

शायर शकील आझमी यांचा हा शेर आज पुन्हा लिहावासा वाटला कारण पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर आज भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ ने हरवत इतिहास घडविला आणि दाखवून दिले की वही से जीतके निकले जहां हम हारे थे. पहिल्या कसोटीत ३६ वर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघापेक्षा गल्ली क्रिकेटचा संघ बरा अशी चौफेर टीका होत होती त्यात कर्णधार, रनमशीन विराट कोहली मायदेशी परतला आणि प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होते त्यामुळे या कसोटी मालिकेत भारत ४-० ने हरेल किंवा आता भारत मालिका हरणारच असे रिकी पॉंटिंग, मायकल वॉर्न, मायकल क्लार्क या दिग्गजांनी सांगितले. परंतु यांना माहित नव्हते की 'अजिंक्य' भारत काय असतो.

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद आले आणि पराभवाने खचलेल्या संघाला स्वतः अविस्मरणीय शतक करत प्रेरणा दिली. अजिंक्यचे शतक, अश्वीन,जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे भारताने मेलबर्नमध्ये  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत बाउंसबॅक केला. मेलबर्न कसोटीतील विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कसोटी विजयापैकी एक होता.


सिडनी येथील तिसरी कसोटीमध्ये दुसऱ्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय होईल असे वाटत असताना  पंतने काऊंटर अटॅक करत ऑस्ट्रेलिया पराभूत होईल अशी परिस्थिती निर्माण केली. पुजारानेही मैदानात तंब्बू ठोकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. दोघे बाद झाल्यावर   दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी आणि अश्वीन यांनी किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखत सामना अनिर्णित ठेवला. तब्बल ४२ ओव्हर्स त्यांनी फलंदाजी करत सामना अनिर्णित केला. विहारी आणि अश्वीनची खेळी जिद्द,चिकाटी आणि संयम याचे अद्वितीय उदाहरणच आहे. जडेजाने केलेला ऑलराऊंड परफोर्मन्स ही कौतुकास्पद होता.

निर्णायक कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर होणार होती ज्या मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नाही असे हे मैदान. भारताचे प्रमुख गोलंदाज बुमराह, अश्विन, जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेले. नवख्या भारतीय गोलंदाजांकडे फक्त एकुण ५ सामन्याचा अनुभव मात्र जे शुर असतात त्यांना लढणं शिकवाव लागत नाही ते उपजत येत हे नटराजन, शार्दुल ठाकुर, सुंदर यांनी अप्रतिम कामगिरी करत दाखवून दिले.  भारतीय संघाची १५० वर ५ विकेट्स असताना शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनुक्रमे ६७ आणि ६२ धावांची अविस्मरणीय खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. 

तिसऱ्या इंनिगमध्ये सिराजने कसोटी इंनिगमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघास ३०० धावांच्या आत रोखले. शेवटची इनिंग T-20 पेक्षाही रोमहर्षक झाली. ३०० पेक्षा अधिक धावा पाचव्या दिवशी करता येणे शक्य नाही एकतर सामना अनिर्णित राहिल अथवा भारताचा पराभव होईल असेच क्रिकेट तज्ञांचे मत होते परंतु अशक्य लक्ष्य प्राप्त करण हेच या संघाच वैशिष्ट्य होत आणि शुभमन गिलच्या ९१ धावांच्या आक्रमक खेळीने धावसंख्येचा पाया उभारला गेला. पुजाराने एखाद्या योद्ध्याप्रमाणे एक बाजू धरुन ठेवली आणि ज्याला भारताचा फ्युचर स्टार बोलल जात त्या ॠषभ पंतने सामना जिंकविला. ऑस्ट्रेलियाचा गाबाचा घमंड ३२ वर्षांनंतर तोडत भारताने ऐतिहासिक मालिका विजय मिळविला.

या मालिका विजयाचे श्रेय हे सर्व खेळाडूंना जाते. ज्या जिद्दीने ते खेळले त्यांना खरंच सलामही कमी पडेल. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी संधीच सोनं केले. सर्वात मुख्य म्हणजे अजिंक्य रहाणेने केलेले शांत,संयमी नेतृत्वासाठी शब्द कमी आहेत. प्रमुख गोलंदाज आणि फलंदाज नसतानाही संघाला विजय मिळवून देणे ही अशक्यप्राय गोष्ट अजिंक्यने केली. त्याची खिलाडूवृत्ती आणि त्याचा स्वभाव खरंच कौतुकास्पद आहे आणि हा चारित्र्यवान खेळाडू 'आपला माणूस' आहे असं नेहमी वाटत. भारतीय क्रिकेट इतिहासात तो 'अजिंक्य' कर्णधार म्हणून  ओळखला जाईल हे नक्की.

राखेतून भरारी घेणे काय असतं याचे अद्वितीय उदाहरण ही मालिका आहे. जेव्हा कधी निराश व्हाल तर ही मालिका आठवा बक्कळ प्रेरणा देऊन जाईल.

चक दे इंडिया. सलाम सलाम सलाम.