बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

चक दे इंडिया


 

आज भुवनेश्वर येथे हॉकीचा रणसंग्राम सुरू होत आहे. १६ संघाचा समावेश असलेल्या विश्र्वचषक स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे लक्ष्य मायदेशात विश्र्वचषक जिंकून देशाला अविस्मरणीय भेट देण्याचे असेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करुन हॉकीतील मरगळ झटकून टाकली आहे. सध्या जागतिक स्तरावर भारत ५ व्या क्रमांकावर असून विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे.प्रशिक्षक हरिंदर सिंग यांनी भारताला २१ वर्षांखालील विश्र्वचषक जिंकून दिला होता आता हा विश्र्वचषक जिंकण्याच्या ध्यासाने ते आणि त्यांचे खेळाडू मैदानात उतरतील हे नक्की.


भारताच्या खेळात प्रचंड सुधारणा झाली असून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त रहावे याकडे लक्ष दिले गेले आहे. भारतीय हॉकीचे वैशिष्ट्य आहे कलात्मक खेळ आणि त्यासोबत पाश्चिमात्य देशांची शैली यांचा मेळ त्यांच्या खेळांमध्ये दिसतो आहे.हॉकी खेळ नसून भारतीय अस्मिता आहे. हॉकीच देशवासीयांशी भावनिक नाते आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर दमदार कामगिरी करत भारतीय संघाने  विश्र्वचषक जिंकावा याकरिता मनापासून शुभेच्छा.सर्व देशवासीय एकच जयघोष करीत आहेत तो म्हणजे

चक दे इंडिया.

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सर्वसमावेशक युगाचा अंत.

                   

आज सद्यकालीन राजकारणातील आवडता नेता निवर्तला. अटलबिहारी वाजपेयीजींना अंतःकरणापासून श्रद्धांजली.

जेव्हा बालपणी राजकारणाबद्दल जाणिव झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांचा पाकिस्तानचा दौरा ही पहिली आठवण होती. जेव्हा राजकारण नेमकं काय असतं हे समजू लागले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणातील सक्रिय सहभाग कमी केला होता मात्र त्यांच्याबद्दल माहिती मिळू लागली तसं तसा हा महान नेता मनी स्थान निर्माण करु लागला.

१३ दिवसांच सरकाराचा राजीनामा देताना देश रहना चाहिए, देश का लोकतंत्र रहना चाहिए हे त्यांच वाक्य अजरामर झाले. त्यानंतर वाजपेयीजींनी राष्ट्रीय लोकशाही दल स्थापन करुन अनेक विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करून स्थापन केलेले सरकार, मुख्य म्हणजे सर्व पक्षांना सांभाळून सरकारचा कार्यकाल पूर्ण केला हे कौशल्य फक्त वाजपेयींमध्येच होत.पोखरण अणुस्फोट सारखा धाडसी निर्णय, कारगील युद्ध अशा महत्त्वपूर्ण घटना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान या मुलभूत योजनांतून वाजपेयी सरकारची कामगिरी कळाली.

विरोधकांशी ही सन्मानाने वागणारा नेता, टीका करताना ही मर्यादा पाळणारा वक्ता, विजयाने उन्मादून न जाणारा आणि पराभवाने न खचणारा योध्दा, देशप्रेम, प्रेरणेने ओतप्रोत असणाऱ्या कविता करणारा कवी असे असंख्य गुण असणाऱ्या  या नेत्यांच राजकारणात सक्रिय नसणं यांचं दुःख मनी सदैव होत.

देशभक्त असणारे तुम्ही भारतमातेच्या उदरातच पुन्हा जन्म घ्याल यात शंका नाही. वाजपेयीजी तुम्हाला त्रिवार मुजरा. पुन्हा अंतःकरणापासून श्रद्धांजली.

सोमवार, ४ जून, २०१८

फर्जंद एक अविस्मरणीय शौर्यगाथा



फर्जंद हा चित्रपट म्हणजे शुरवीर मावळ्यांची शौर्यगाथा, फर्जंद म्हणजे राजमाता  जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील मावळ्यांची श्रद्धा, फर्जंद म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आणि महाराजांचं मावळ्यांवरील प्रेम फर्जंद म्हणजे पन्हाळा सर करणारा शुर यौध्दा अस असंख्य शब्दांमध्ये फर्जंदच वर्णन करता येईल. काही वेळा एखाद्या गोष्टीवर काय लिहावं हे कळतं नाही तर काहीवेळा अशा कलाकृतीवर किती लिहावं आणि काय लिहावं यासाठी शब्द अपुरे पडतात. फर्जंद ही अशीच भव्यदिव्य आणि शिवकाळ डोळ्यांसमोर उभी करणारी कलाकृती.आज सकाळी प्लाझा थिएटरला हा चित्रपट १९ शिवप्रेमींसोबत पाहिला. इतक्या मोठ्या ग्रुपसोबत चित्रपट पाहण तेही शिवप्रेमींसोबत खरंच फार अप्रतिम अनुभव होता.हाऊसफुल्ल असलेल्या शोमध्ये शिवरायांचा जयघोष, प्रत्येक महत्त्वाच्या संवादाला टाळ्या,आवाज असं शिवमय थिएटरच वातावरण होत.

या चित्रपटाचं कथानक आहे पन्हाळ्याच्या मोहिमेवर आधारित. शिवराज्याभिषेक अगोदर हा किल्ला स्वराज्यात सामील होणं हे स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.यवनांनी स्वराजातील पळवून नेलेल्या स्त्रीयांना ही याच किल्ल्यावर ठेवले असल्याने महाराजांना हा किल्ला त्या महिलांच्या सुटकेकरिता हा किल्ला जिंकायचाच आहे. या मोहिमेकरिता सरदार कोंडाजी फर्जंद यांची निवड केली जाते. आऊसाहेब जिजाऊ मात्र अशा मोहिमाकरुन आमची मुलं गमवायची नाही आहेत अशा मनःस्थितीत असतात मात्र कैदेतील स्रीयांकरिता आणि कोंडाजी फर्जंदच्या जिद्दीमुळे या मोहिमेस होकार देतात.फक्त ६० मावळ्यांसह २५०० यवनांचा पराभव करुन ही मोहिम फर्जंद फत्ते करतात आणि इतिहास घडवितात. इतक्या कमी फौजेसह २५०० शत्रुचा पराभव केला हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.

फर्जंद या चित्रपट हा मराठीतील एक उत्कृष्ट युद्धपट म्हणू शकतो. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अक्षरशः शिवकाळ डोळ्यांसमोर उभा केलाय. लेखक म्हणूनही कथानकाची मांडणी उत्तम केली आहे.vfx आणि graphics उत्तमरित्या वापरले आहे.यासर्वबांबीमुळे चित्रपटाला भव्यदिव्य स्वरुप आले आहे.खरच दिग्पाल तुम्हाला मानाचा मुजरा. जिजाऊ साहेब मृणाल कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारल्या आहेत.  चिन्मय मांडलेकर यांनी जीव ओतून महाराज साकारले आहेत हे दिसतं. अभिनेता  अंकित मोहन यांनी कोंडाजी फर्जंद या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. अंगमेहनत आणि मराठी भाषिक नसुनही त्याकाळातील मराठी भाषा त्याचा लहेजा पकडला आहे. खरच मोहन तुमचं कौतुक. अजय पुरकर,आस्ताद काळे, मृण्मयी देशपांडे, हर्षद दुधाणे, निखिल राऊत,प्रविण तरडे, नेहा जोशी यासर्वांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे.गणेश यादव आणि अंशुमन विचारे यांची अगदी लहान भुमिका ही लक्षात राहते. समीर धर्माधिकारी यांनी बेशक खान हा खलनायक ताकदीने उभा केलाय.विशेष कौतुक आहे प्रसाद ओक यांच बहिर्जी नाईक यांच ७ वेषातील बहुरुपी पात्र जीवंत केले आहे. सर्व कलाकारांना सलाम.

फर्ज़ंद प्रत्येक शिवप्रेमींनी, मराठी माणसांनी आवर्जून थिएटरला पहावा आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर मावळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. हा चित्रपट इतिहास घडवणार यात शंका नाही.

जय जिजाऊ
जय शिवराय.

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सुवर्ण टेबल टेनिस.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

टेबल टेनिसमध्ये क्रांतीकारी सुवर्णपदके


तिरंग्यासहित भारतीय पुरुष संघ आणि प्रशिक्षक

सकाळी अटीतटीच्या उपांत्य फेरीत सिंगापूरविरुध्द २-२ अशी सामन्यांची बरोबरी झाली त्यावेळी भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू अचंता शरथकमले अंतिम सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाद्वारे 11-5,12-10,12-10 असा झुई पेंगवर विजय मिळवत भारतीय संघाला सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये स्थान मिळवून दिले.अंतिम सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळ करत नायजेरियाचा ३-० असा पराभव केला आणि तब्बल 12 वर्षानंतर टेबल टेनिसमध्ये  सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. .

पहिला सामना अंचता शरथ कमलने ३-०सरळ सेटमध्ये जिंकत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. युवा खेळाडू सवथीन गणशेखरने पुढील सामना ३-१ असा जिंकला. पुरुष दुहेरीत सवथीनसह हरमीत देसाईने नायजेरियन जोडी  विरुद्ध ३-० ने सामना जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. साखळी सामन्यामध्ये त्रिनिनाद टोबेगो, उत्तर आर्यलंड यांचा पराभव केला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुध्द विजय मिळविला होता. अमलराज आणि सनील शैटी या खेळाडूंनीही या सुवर्ण वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले. भारताचे इटालियन प्रशिक्षक मसीमो कोन्संटिनी यांचेही अभिनंदन.

सुवर्णपदकासहित महिला संघ

दोन दिवसात टेबल टेनिस हा भारतीयांसाठी सुवर्णपदक देणारा खेळ ठरला आहे.महिला संघाने सुवर्ण कामगिरी केल्या नंतर आज पुरुष संघाने सुवर्ण जिंकुन टेबल टेनिसच्या नव्या वाटचालीची सुरुवात केली आहे. वैयक्तिक टेबल टेनिस स्पर्धा अजून बाकी असून यातही आपले खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांच्या कामगिरीमुळे वाटत आहे.

टेबल टेनिस खेळामध्ये भारतीय खेळाडू  आहेत हे कालपर्यंत अनेकांना माहिती ही नसेल. काल महिलांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेकांनी स्टेटस, पोस्ट करत महिला संघाचे अभिनंदन केले आणि  आज भारतीय पुरुष टेबल टेनिसपटूंनी ही सुवर्णपदक जिंकून टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंची गुणवत्ता दाखवून दिली. या खेळाला दोन दिवसापासून मिळणारी लोकप्रियता अशीच वाढावी ही सदिच्छा.

बॅडमिटंन मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

आज बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकत. बॅडमिंटनचा नवा अध्याय लिहिला आहे. गोपीचंद  यांनी तयार केलेल्या या परिपूर्ण संघात सर्वच खेळाडू सरस आहेत. वैयक्तिक प्रकारात सायना, सिंधू, कदंम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यम, एच एस प्रणॉय तर दुहेरीत अश्विनी पोनप्पा हे यशस्वी कामगिरी करत होतेच मात्र आज संघ म्हणून देशाकरिता ऐतिहासिक कामगिरी करुन बॅडमिंटनमधील प्रत्येक प्रकारात भारत यश संपादन करु शकतो हा विश्वास जागृत केला आहे.

साखळी सामन्यांपासून सुरु असलेली बॅडमिंटनमधील विजयी घौडदौड कायम ठेवत भारताने चारवेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मलेशियाचा पराभव केला. या विजयासह पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावले. अश्विनी पोनप्पा आणि 17 वर्षीय सात्विक रेड्डी यांनी पहिला सामन्यात 21-14, 15-21, 21-15 असा मलेशिय मिश्र दुहेरी संघाचा पराभव केला. तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवर असताना अश्विनी पोनप्पाने अनुभवाच्या जोरावर सत्विकसह या सामन्यात विजय मिळविला. कदंम्बी श्रीकांतने ऑलंम्पिक रौप्यपदक विजेता ली चाँग विरुध्द सामना 21-17,21-14 असा जिंकत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिल्यांदाच ली चाँग वीचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात युवा सात्विक रेड्डी आणि चिराग शेट्टीचा पुरुष दुहेरीत मलेशियन दुहेरी संघाने 15-21, 20-22 असा पराभव केला. दोन्ही भारतीय युवा खेळाडूंनी चांगला संघर्ष केला.


2-1 अशी स्थिती असताना भारताची फुलराणी आणि सर्वात अनुभवी खेळाडू सायनाने महिला ऐकेरीचा सामना 21-11, 19-21, 21-9 असा जिंकत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. पहिल्या गेममध्ये सायनाने शेवटचे 12 गुण थेट मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सायना आघाडीवर असताना मलेशियन सोनिया चेहने सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये 9-9 अशी बरोबरी असताना सायनाने आपला जादुई खेळ दाखविला. सायनाचा झंझावात एवढा होता की सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला 9 गुणानंतर एकही गुण प्राप्त करायला दिला नाही. सायनाचा तिसऱ्या गेममधील खेळ डोळ्याच पारणे फेडणारा होता. या तिसऱ्या गेमच्या विजयासह भारताने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

साखळी सामन्यात श्रीलंका, पाकिस्तानचा पराभव भारतीय संघाने केला. उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशिअस आणि उपांत्य फेरीत बलाढ्य सिंगापूरला भारतीय संघाने हरविले होते. रुत्विका गद्दे, प्रणव चोप्रा, एन सिक्कीरेड्डी, या खेळाडूंनी या सुवर्णवाटचालीत महत्वपूर्ण योगदान दिले. प्रणॉय कुमारसहित पी सिंधूचाही समावेश या संघात होता मात्र दुखापतीमुळे सांघिक सामने सिंधूने खेळले नाहीत. वैयक्तिक सामने उद्यापासून सुरु होत आहेत या सामन्या सर्व भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना शुभेच्छा.

सलाम बॅडमिंटन संघ.  प्रशिक्षक गोपीचंद  आणि मिश्र जोडीचे प्रशिक्षक किम टेन हर यांना सलाम. रंग दे तिरंगा. चक दे इंडिया.

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा, 2018

2018 गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा




     आजपासून सुरु होईल खेळांचा थरारपदक जिंकण्याकरिता खेळाडूंमधील संघर्षदेशाचा झेंडा डौलाने फडकविण्याकरिता खेळाडूंकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल. ऑलंम्पिक नंतर सर्वात जास्त देशांचा समावेश असणारी राष्ट्रकुल स्पर्धेचे काल गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे उद्घाटन झाले. 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा होणार आहे.  भारताचा ध्वजासहित पी.व्ही. सिंधूने दिमाखात ध्वजसंचलन केले. सर्व भारतीय खेळाडूही उत्साहात या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचा इतिहास, राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा आणि भारताची कामगिरी, 2018 स्पर्धा आणि भारत यासंबधी घेतलेला आढावा.


राष्ट्रकुल क्रिडा  स्पर्धेचा इतिहास



     राष्ट्रकुल म्हणजे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांची संघटना. ज्या देशांवर ब्रिटीशांनी राज्य केले अशा सर्व देशांचा समावेश या राष्ट्रकुल संघटनेत होतो. 1911 साली लंडन येथे ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील काही देशांची क्रिडा स्पर्धा पार पडली मात्र 1930 साली हेमिल्टनकॅनडा येथे झालेली स्पर्धा ही अधिकृत पहिली स्पर्धा म्हणून मान्यता दिली गेली. या क्रिडा स्पर्धेमध्ये भारताने मात्र स्वातंत्र्यानंतर 1954 साली ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा येथील स्पर्धेत प्रथम सहभाग घेतला. इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांचाच या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. मात्र गेल्या दशकापासून भारतानेही या स्पर्धेत पदकांची लयलटू केली आहे. मातब्बर देशांना टक्कर दिली आहे.

दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा

     2010 साली दिल्ली येथे झालेली राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिडा क्षेत्रातील नवा अध्याय आहे. 1982 मध्ये झालेल्या आशीयाई स्पर्धेनंतर भारतात झालेली ही मोठी स्पर्धा होती. तब्बल 28 वर्षानंतर भारतात झालेल्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन भारताने जबरदस्त केले. भ्रष्टाचाराच प्रकरण या राष्ट्रकुलमुळे पुढे आले हे खर मात्र या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपल्या घरच्या प्रेक्षकांच्यासमोर खेळण्याची संधी मिळाली खेळाडूंनी या संधीच सोन करत तब्बल 100 पदक जिंकत भारताला पदकतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करुन दिले. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकतालिकेत भारताने दुसरे स्थान प्राप्त केले होते. या स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंची विशेष तयारी केली गेली. त्याचा परिणाम राष्ट्रकुल स्पर्धेत दिसलाच मात्र त्यानंतर झालेल्या आशियाई स्पर्धा आणि 2012 लंडन ऑलंम्पिकमध्येही पदक जिंकलेल्या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. खेळाडूंच्या विकासाकरिता आणि खेळाचे वातावरण तयार करण्याकरिता अशा राष्ट्रकुल अथवा आशियाई स्पर्धांचे आयोजन देशात होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या राष्ट्रकुल स्पर्धेचे आणि दक्षिण कोरिया, चीन, जपान आशियाई क्रिडा स्पर्धेचे आयोजन दर दशकात एकदा तरी करतातच. याबद्दल नक्कीच सरकारला विचार करण्याची गरज आहे.

भारताच्या दृष्टीने 2018 राष्ट्रकुल स्पर्धा
     
     या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन यशस्वी करुन ऑस्ट्रेलिया बॉल टॅपरिंगमुळे निर्माण झालेला क्रिडा क्षेत्राबद्दल अविश्वास, निराशा दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची आहे कारण बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी,  या खेळांमध्ये भारतीयांची कामगिरी चांगली होत आहे त्याच फलित या स्पर्धेत पदकांमध्ये मिळाव ते सुवर्णपदक असाव ही अपेक्षा क्रिडाप्रेमींची आहे. वेटलिंफ्टिग, नेमबाजी  या स्पर्धेत भारताची जमेची बाजू आहे. आताच लेख लिहित असतानाच गुरुराजा याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत भारताचे खाते उघडले आहे. त्यामुळे वेटलिफ्टिंर्स आणि नेमबाज भारताला विजयपथावर ठेवतील यात शंका नाही. एथलॅटिक्स, जलतरण या स्पर्धा सर्वात जास्त पदक असणारे क्रिडाप्रकार आहेत. मात्र भारताला या दोन्ही प्रकारात घवघवीत यश मिळाले नाही. एथलॅटिक्समध्ये मिल्खा सिंग, पी.टी.उषा यांनी भारताला गौरवांन्वित केले आणि दिल्लीतील स्पर्धेत काहीसे चांगले यश एथलॅटिक्समध्ये संपादन केल मात्र इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही.  या स्पर्धेत विश्व विक्रम करणाऱ्या उदयोन्मुख भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.जलतरणात वीरधवल खाडेकडून आशा आहे मात्र जलतरण तर इतर क्रिडाप्रकारापेक्षा फारच मागे पडला आहे हे भारतीय क्रिडा क्षेत्राच वास्तव आहे. या दोन्ही क्रिडाप्रकाराचा विकास होणे अतंत्य गरजेचे आहे. त्याकरिता या दोन्ही प्रकाराकरिता वेगळ धोरण क्रिडा मंत्रालयाने आखले पाहिजे. 


     पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कदंम्बी श्रीकांत, गगन नारंग,जीतू राय, हिना सिंधू, शरथ कमल (टेबल टेनिसपटू), सुशील कुमार, मेरी कॉम हे प्रमुख खेळाडू क्रिडास्पर्धेत सहभागी झालेल्या 218 खेळाडूंच्या भारतीय चमूला सुर्वणपथ दर्शक आहेत.   या स्पर्धेत अनेक नवे पदकविजेते स्टार भारताला मिळतीलच. सांघिक प्रकारात महिला आणि पुरुष हॉकी संघाने आशियाई चषक जिकंल्यानंतर या स्पर्धेतही आपली विजयी घौडदौड कायम राखणे गरजेचे आहे. स्वाक्श, टेनिसमध्येही भारताला नेहमी यश मिळाले आहे ते यश या स्पर्धेत मिळाव.  जिमनॅस्टीकमध्ये दीपा कर्माकर नसल्याने तिची कामगिरी पाहता येणार नाही ही सल क्रिडाप्रेमींना असेल मात्र तिच्या ऑलंम्पिकमधील अतुलनीय कामगिरीमुळे  जिमनॅस्टीकला लोकप्रियता मिळालीच तसच जिमनॅस्टीकला नवचैतंन्य मिळाल. त्यामुळे जिमनॅस्टीकमधील इतर खेळाडूंच्या कामगिरीकेडे लक्ष असेल. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील कामगिरी ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांचा विचार करता महत्वाची ठरणार आहे. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत  2014 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील 64 पदकसंख्येपेक्षा आपल्या देशाची पदकसंख्या नक्कीच जास्त असेल असा क्रिडाप्रेमी म्हणून खेळाडूंवर विश्वास आहे. आता दहा दिवस आपण या क्रिडा स्पर्धेचा आनंद लुटुया आणि भारतीयांच्या घवघवीत यशाकरिता शुभेच्छा आणि पाठिंबा देऊयात.