मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

साहेब विनम्र अभिवादन 🙏🙏

 


आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन. त्याबद्दल आताच मित्र सुमेध म्हात्रेशी बोलत होतो. साहेब गेले ती बातमी टीव्हीवर पाहिली आणि रडू कोसळलं होत याची आठवण झाली. साहेबांच आणि माझ नात सुरु झाल लहानपणापासून. वडिलांना राजकारणात  रस आणि आवड असल्याने मला आपोआप राजकारणाची आवड निर्माण झाली. सामान्य मराठी माणसाप्रमाणे साहेबांचे आणि शिवसेनेचे आकर्षण वाटू लागले. साहेबांवर श्रद्धा वाढत गेली. शाळेत असताना साहेबांचा फोटो पाकिटात ठेवायचो. काही महिने वर्गात मॉनिटर होतो त्यावेळी साहेब सभेमध्ये हात दाखवायचे तसा हात दाखवून वर्गावर नियंत्रण करायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी मी राजकारणात जाईन असंच मला आणि माझ्या मित्रांना वाटायचे.  

दशकभरापूर्वी म्हणजे माझ्या महाविद्यालयीन जीवनात मनसेची जबरदस्त लाट होती त्यावेळी घरच्यांसोबत, मित्रांसोबतच्या वादात शिवसेनेची बाजू लावून धरायचो.  साहेबांच भाषण, दसरा मेळावा हा अतिशय जवळचा विषय होता. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या वाक्याची जादू वेगळीच होती.साहेबांच्या भाषणाने उर्जा मिळायची.

साहेब गेले तेव्हा माझा मित्र प्रणित भगत सोबत साहेबांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो तेथील न भूतो न भविष्यती असा जनसागर जमला होता या जनसागराच साहेबांशी नात फक्त एकच होत ते म्हणजे साहेब सर्वांसाठी घरातील व्यक्ती होती. परत या परत या बाळासाहेब परत या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे या घोषणांनी शोकाकूल वातावरणातही साहेबांच अस्तित्व जाणवत होत. एकदा साहेब दिसावे म्हणून जो,तो त्यांच्या गाडीच्या जवळ जात होता कारण प्रत्येकाला माहिती होते आज आपण आपल्या दैवताला, श्रद्धांस्थानाला अखेरचा निरोप देत आहोत.

जे प्रेम साहेबांना मिळाले ते कुठल्या नेत्याला मिळण शक्य नाही. आज माझी राजकीय पक्षांबद्दल मत बदलली. कोणताही पक्ष जवळचा नाही पण साहेबांवर प्रेम होते, आहे आणि कायम राहील.


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन