शुक्रवार, २३ जुलै, २०२१

टोक्यो ऑलम्पिक- रंग दे तिरंगा 🇮🇳

 

आजपासून उगवत्या सुर्याचा देश म्हटल्या जाणाऱ्या जपानमध्ये टोक्यो येथे ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट अवघे जग ऑलम्पिकमय होणार आहे.  गेल्यावर्षी होणारी स्पर्धा कोरानामुळे यावर्षी आयोजित केली जाईल असा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघटनेने घेतला होता. या वर्षीही स्पर्धा होणार की नाही याबाबत शंकाच होती कारण कोरोनाची जागतिक परिस्थिती आणि जपानमधील कोरानास्थितीमुळे स्पर्धेला असलेला स्थानिकांचा विरोध मात्र या सर्वविरोधास दूर करत अखेर आज या स्पर्धेस सुरुवात होत आहे. स्टेडियमवर प्रेक्षक मर्यादित असल्याने तेथील उत्साह कमी असेल मात्र जगात ऑलम्पिकमुळे उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण नक्कीच असेल. कोरोनाच्या या निराशादायी वातावरणात अवघ्या जगाचे लक्ष वळविण्याचे कार्य ऑलम्पिक करत आहे.


रंग दे तिरंगा

ऑलम्पिकमध्ये भारताचा विचार केल्यास या ऑलम्पिक मध्ये भारताचा 120 खेळाडू असलेल्या आतापर्यंतचा सर्वात जास्त खेळाडूंचा चमू जात आहे ही खरच अभिमानास्पद बाब आहे. पदकांच्या दावेदारांचा विचार केल्यास बॅडमिंटनमध्ये गेल्या दोन्ही ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळाले होते. यावेळीही गेल्या ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ही सुवर्णपदकाची प्रबऴ दावेदार आहे. कुस्तीतही मागील तीन ऑलम्पिकमध्ये पदक मिळाले आहे यावेळी विनेश फोगट, बजरंग पुनिया कुस्तीमध्ये पदक जिंकू शकतात. बजरंगची गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरी पाहता तो सुवर्णपदक जिंकेल असे म्हटले जात आहे. 2016 च्या ऑलम्पिकमध्ये ऐन भरात असणाऱ्या विनेशला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली होती त्यामुळे या स्पर्धेत पदकासाठी ती पराकाष्ठा करेल हे नक्की.

नेमबाजीमध्ये युवा नेमबाज मनु भाकर, सौरभ चौधरी, यांच्याकडून पदकाची आस आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्याकडेही पदक मिळविण्याची क्षमता आहे. बॉक्सिंगमध्ये सुपरवुमन मेरी कोम आणि अमित पांघल हे पदक निश्चित करु शकतात. एथलेटिक्समध्ये भारताची पदकांची पाटी नेहमी कोरी राहिली आहे यावेळी मात्र भालाफेकपटू नीरज चोप्राच्या रुपाने आशेचा किरण आहे. द्युतीचंद 200 मीटर धावणे आणि महाराष्ट्राचा अविनाश साबळे स्टीपलचेसमध्ये कमाल करु शकतो.

तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमांकावर प्रथम स्थानी असणाऱ्या दिपिका कुमारी भारताची सुवर्णकन्या बनू शकते. प्रविण जाधव हा महाराष्ट्राचा तिरंदाज ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची घरची परिस्थिती अतिशय गरीब आहे. आई, वडील शेतात मोलमजुरी करतात पण या पठ्ठ्याने खडतर संघर्ष करत आज ऑलम्पिकमध्ये स्थान मिळविले आहे. पंतप्रधान मोदींनीही त्याच्याशी थेट संवाद साधून त्याचे कौतुक केले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू भारताची एकमेव खेळाडू प्रतिनिधित्व करत आहे. विशेष म्हणजे तीने जागतिक विश्वविजेतेपद जिंकले असून ती देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल असा विश्वास वाटत आहे. टेबलटेनिसच्या मिश्र दुहेरीत देशाचे अव्वल टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल आमि मनिका बात्रा यांची जोडी चीनच्या तगड्या आव्हाना टक्कर देऊन पदकाची मानकरी होऊ शकते.

आता बोलूया अशा खेळाबद्दल ज्या खेळाने भारतासाठी ऑलम्पिकमधील इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला आहे पण गेली 40 वर्षे या खेळात भारताला पदक मिळाले नाही ही एक लाजिरवाणी बाबही आहे.  होय, मी हॉकीबद्दल बोलत आहे. क्रिकेट जरी देशाचा धर्म असला तरी हॉकीशी भारतीयांच भावनिक नाते आहे. गेली 40 वर्ष पदकांची पाटी कोरी असणाऱ्या भारतीय दोन्ही हॉकी संघांना यावेळी पदक जिकण्याची सुवर्णसंधी आहे. पुरुष हॉकी मध्ये भारत जागतिक क्रमवारीत 4 थ्या क्रमांकावर असून गेल्या काही वर्षांपासून भारताच्या खेळात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे यावेळी पुरुष हॉकीत पदक जिंकून भारतीयांना चक दे इंडिया म्हणणाची आणि आनंद साजरा करण्याची संधी द्यावी. राणी रामपालच्या महिला हॉकी संघानेही अमेरिकेसारख्या ताकदवान संघाचा पराभव करत ऑलम्पिकमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महिला हॉकी संघाने कामगिरीत सातत्य राखल्यास ते मोठमोठ्या संघाला हरवून देशाला पदक जिंकवून देऊ शकतात. याव्यतिरिक्त टेनिस,स्विमिंग, फेंन्सिंग, ज्युदो आणि घोडेस्वारी या खेळांमध्येही भारतीय खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत 

ऑलम्पिकमध्ये पदक विजेत्यामध्ये नव्या  खेळाडूंचीही भर पडू शकते. काही धक्कादायक निकाल ही लागू शकतात कारण शेवटी हा खेळ आहे आणि खेळात अशक्य असे काही नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या खेळांच्या थराराचा आनंद जग घेईल. आपण रोजच्या जीवनात कितीही वेगवेगळे असलो तरी 15 दिवसांसाठी आपले खेळाडू देशाला एकत्र आणतील. हेच खेळाचे वैशिष्ट्य आहे. 2008 मध्ये ऑलम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते त्यानंतर ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजले नाही. यावेळी हा 13 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपावा आणि खेळाडूंच्या सुवर्णकामगिरीमुळे ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजावे.  या क्षणासाठी प्रत्येक देशवासिय आसूसलेला आहे कारण तो क्षण त्या खेळाडूंसाठी आणि सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण असेल. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन भारतासाठी प्रथमच दोन आकडी पदकसंख्या जिंकण्याचा विक्रम करावा आणि चक दे इंडियाचा नारा घुमावा हीच इच्छा. टोक्यो ऑलम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. चक दे इंडिया, रंग दे तिरंगा