मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

अजिंक्य भारत, अतुल्य भारत, विजयी भारत

  

( आजचा लेख थोडा मोठा झाला आहे परंतु खर म्हणजे भारतीय संघाने मिळविलेले यश हे इतक ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे की शब्द अपुरे पडतील.)

दमा के पुरा किया जितना भी खसारा था
वही से जितके निकला जहां मैं हारा था।

शायर शकील आझमी यांचा हा शेर आज पुन्हा लिहावासा वाटला कारण पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर आज भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ ने हरवत इतिहास घडविला आणि दाखवून दिले की वही से जीतके निकले जहां हम हारे थे. पहिल्या कसोटीत ३६ वर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघापेक्षा गल्ली क्रिकेटचा संघ बरा अशी चौफेर टीका होत होती त्यात कर्णधार, रनमशीन विराट कोहली मायदेशी परतला आणि प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होते त्यामुळे या कसोटी मालिकेत भारत ४-० ने हरेल किंवा आता भारत मालिका हरणारच असे रिकी पॉंटिंग, मायकल वॉर्न, मायकल क्लार्क या दिग्गजांनी सांगितले. परंतु यांना माहित नव्हते की 'अजिंक्य' भारत काय असतो.

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद आले आणि पराभवाने खचलेल्या संघाला स्वतः अविस्मरणीय शतक करत प्रेरणा दिली. अजिंक्यचे शतक, अश्वीन,जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे भारताने मेलबर्नमध्ये  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत बाउंसबॅक केला. मेलबर्न कसोटीतील विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कसोटी विजयापैकी एक होता.


सिडनी येथील तिसरी कसोटीमध्ये दुसऱ्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय होईल असे वाटत असताना  पंतने काऊंटर अटॅक करत ऑस्ट्रेलिया पराभूत होईल अशी परिस्थिती निर्माण केली. पुजारानेही मैदानात तंब्बू ठोकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. दोघे बाद झाल्यावर   दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी आणि अश्वीन यांनी किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखत सामना अनिर्णित ठेवला. तब्बल ४२ ओव्हर्स त्यांनी फलंदाजी करत सामना अनिर्णित केला. विहारी आणि अश्वीनची खेळी जिद्द,चिकाटी आणि संयम याचे अद्वितीय उदाहरणच आहे. जडेजाने केलेला ऑलराऊंड परफोर्मन्स ही कौतुकास्पद होता.

निर्णायक कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर होणार होती ज्या मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नाही असे हे मैदान. भारताचे प्रमुख गोलंदाज बुमराह, अश्विन, जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेले. नवख्या भारतीय गोलंदाजांकडे फक्त एकुण ५ सामन्याचा अनुभव मात्र जे शुर असतात त्यांना लढणं शिकवाव लागत नाही ते उपजत येत हे नटराजन, शार्दुल ठाकुर, सुंदर यांनी अप्रतिम कामगिरी करत दाखवून दिले.  भारतीय संघाची १५० वर ५ विकेट्स असताना शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनुक्रमे ६७ आणि ६२ धावांची अविस्मरणीय खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. 

तिसऱ्या इंनिगमध्ये सिराजने कसोटी इंनिगमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघास ३०० धावांच्या आत रोखले. शेवटची इनिंग T-20 पेक्षाही रोमहर्षक झाली. ३०० पेक्षा अधिक धावा पाचव्या दिवशी करता येणे शक्य नाही एकतर सामना अनिर्णित राहिल अथवा भारताचा पराभव होईल असेच क्रिकेट तज्ञांचे मत होते परंतु अशक्य लक्ष्य प्राप्त करण हेच या संघाच वैशिष्ट्य होत आणि शुभमन गिलच्या ९१ धावांच्या आक्रमक खेळीने धावसंख्येचा पाया उभारला गेला. पुजाराने एखाद्या योद्ध्याप्रमाणे एक बाजू धरुन ठेवली आणि ज्याला भारताचा फ्युचर स्टार बोलल जात त्या ॠषभ पंतने सामना जिंकविला. ऑस्ट्रेलियाचा गाबाचा घमंड ३२ वर्षांनंतर तोडत भारताने ऐतिहासिक मालिका विजय मिळविला.

या मालिका विजयाचे श्रेय हे सर्व खेळाडूंना जाते. ज्या जिद्दीने ते खेळले त्यांना खरंच सलामही कमी पडेल. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी संधीच सोनं केले. सर्वात मुख्य म्हणजे अजिंक्य रहाणेने केलेले शांत,संयमी नेतृत्वासाठी शब्द कमी आहेत. प्रमुख गोलंदाज आणि फलंदाज नसतानाही संघाला विजय मिळवून देणे ही अशक्यप्राय गोष्ट अजिंक्यने केली. त्याची खिलाडूवृत्ती आणि त्याचा स्वभाव खरंच कौतुकास्पद आहे आणि हा चारित्र्यवान खेळाडू 'आपला माणूस' आहे असं नेहमी वाटत. भारतीय क्रिकेट इतिहासात तो 'अजिंक्य' कर्णधार म्हणून  ओळखला जाईल हे नक्की.

राखेतून भरारी घेणे काय असतं याचे अद्वितीय उदाहरण ही मालिका आहे. जेव्हा कधी निराश व्हाल तर ही मालिका आठवा बक्कळ प्रेरणा देऊन जाईल.

चक दे इंडिया. सलाम सलाम सलाम.