शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही ।

                         



ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही । अशी टायटल असणारी जाहिरात गेल्या महिन्याभरापासून स्टार स्पोर्ट्स चॅनलवर प्रक्षेपित होत आहे. खरच ऑलंम्पिकसे बडा कुछ हो ही नही सकता। जिथे जगभरातील मातब्बर खेळाडू इर्षेने जिद्दीने फक्त देशाची शान वाढविण्यासाठी संघर्ष करतात. जिथे येणारा प्रत्येक खेळाडू फक्त ऑलंम्पिकमध्ये पदक मिळाव हेच स्वप्न बघून जगत असतो.  ज्याठिकाणी नव नवे विश्वविक्रम रचले जातात. जिथे जात, धर्म, पंथ आड न येता फक्त गुणवत्तेला आणि प्रतिभेला जग सलाम करत ते ठिकाण म्हणजे ऑलंम्पिक.

आधुनिक ऑलंम्पिकचे जनक

 सर कुंबर्टिन या फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहास संशोधकास ग्रीसमधील इतिहासाच्या अभ्यासात  ऑलंम्पिक ही संकल्पना मिळाली. सर्व खेळांच्या स्पर्धा एकाच ठिकाणी होणे तेही इसवी सन पूर्व काळात  ही संकल्पनाच विलक्षण होती. या संकल्पनेने सर कुंबर्टिन भारावून गेले आणि सुरु झाला एक ध्यास तो म्हणजे जगभरातील सर्व देशांना एकत्र करुन पुन्हा ऑल्मंपिक चळवळ सक्रिय करायचा. १८९४ साली ऑलंम्पिक संघटनेची स्थापना करुन दोन वर्षाने १८९६ अथेन्स ऑलंम्पिक क्रिडा स्पर्धा भरविण्यात आली आणि इथूनच सुरुवात झाली ती आधूनिक ऑलंम्पिकची. सर कुंबर्टिन यांना आधूनिक ऑलंम्पिकचे जनक मानले जाते.

रिओ ऑलंम्पिक
     फुटबॉल साठी प्रसिध्द  असणाऱ्या आणि जिथे फुटबॉलचा देव ब्लॅक पर्ल जन्माला अशा ब्राझील देशात २०१६ ची ऑलंम्पिक स्पर्धा आजपासून सुरु होईल. अमेरिका, चीन, जपान भारतासह जगाच्या नकाशावर न दिसणारे देश या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक खेळाडू आपल्या जीवनातील सर्वोत्तम कामगिरी करिता तयार झाला आहे. वेध लागले आहेत फक्त केव्हा ऑलंम्पिक मशाल पेटविली जाते याचे आणि स्पर्धेला सुरुवात होते.

भारत आणि ऑलिंम्पिक
     आतापर्यंत भारतातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न फक्त ऑलंम्पियन होण्याचे होते पण बीजिंग आणि लंडन ऑलंम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेत कमालीचा बदल झाला आहे. आता प्रत्येक भारतीय खेळाडू हा पदक मिळविण्याच्या हेतूने रिओमध्ये दाखल झाला आहे. उद्घाटन सोहळ्यात जेव्हा अभिनव बिंद्रा भारतीय ध्वज डौलाने फडकवेल त्यासह ११८ जणांचा भारताचा आतापर्यंतचा मोठा चमू स्टेडियमवर येईल तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. जितू राय, योगेश्वर दत्त, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, दिपिका कुमारी या खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास हे खेळाडू भारताचे सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. अडथळ्यांची शर्य़त पार करुन सहभागी झालेला मल्ल नरसिंग यादव वर सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
     भारत आणि ऑलंम्पिक हॉकी सुवर्णपदक हे समीकरण होत मात्र मधल्या काळात भारतीय हॉकीची फार पिच्छेहाट झाली त्याच हॉकीमध्ये यावर्षी  ऑलंम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक मिळवून दिले जाईल असा अनेक क्रिडा रसिकांचा विश्वास आहे. जिमनॅस्टिक दिपा कर्माकर हिच्याकडून भारताला पदकाची उमेद आहे याव्यतिरिक्त अन्य खेळाडू ही त्यांच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करतील आणि देशाला पदक तालिकेत मानाचे स्थान मिळवून देतील अशी आशा आहे.

भावनात्मक उत्कंटा
     आजपासून उसेन बॉल्ट, मायकल फेल्पस यांच्या विक्रमांची चर्चा असेल. पदकांची लयलुट होईल. अनेक विक्रम मोडले जातील अनेक नवे ऑलंम्पिक विजेते जगाला मिळतील. अमेरिका आणि चीनमध्ये पदकतालिकेतील अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर असेल. पुढील १८ दिवस  ऑलंम्पिकमय जग पाहायला मिळेल. आम्हा भारतीयाचे कान लागून राहिले आहेत ते फक्त त्या खेळाडूंकडे ज्यांच्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर भारताचे राष्ट्रगीत ऑलंम्पिकमध्ये वाजविण्यात येईल आणि भारतीय खेळाडूंच्या सुवर्णपदाकाचा तो सुवर्ण क्षण अनुभवण्याकडे.

रविवार, ३ जानेवारी, २०१६

'नटसम्राट' असा नट होणे नाही।

                  



      नटसम्राट ही कुसुमाग्रजांची  एक अजरामर कलाकृती. त्या कलाकृतीवर आधारित जो चित्रपट मी आज पाहिला नटसम्राट असा नट होणे नाही, तो चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभुती. या चित्रपटाने ह्रद्याला स्पर्श केला. नटसम्राटाच्या आयुष्याची ओढाताण नाटकच जो जगला त्याची होणारी फरफट हे चित्रपटातून दाखवल आहे. चित्रपटाची कथा, तांत्रिक बाजू उत्तम आहेत. पण जे काळजाला भिडतात आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात असे संवाद या चित्रपटात आहेत.  कोणी घर देता का घर, एका तुफानाला कोणी घर देता काजगाव की मराव हा एकच सवाल आहे. तुम्ही नाटक घरी घेऊन आलात असे संवाद चित्रपटाला एका अद्भूत कलाकृतीकडे घेऊन गेले आहेत.  संवाद लेखक किरण यज्ञोपवती आणि अभिजीत देशपांडे यांना याचे श्रेय जाते.
     मेधा मांजरेकर, विक्रम गोखले यांनी आपल्या भूमिका अप्रतिम साकारल्या आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, अजित परब इतर कलाकारांनी अभिनयातून छाप पाडली आहे. ज्या विषयी बोलाव तेवढ थोड ते म्हणजे नाना. 'गणपतराव बेलवलकर' ही व्यक्तीरेखा त्यांनी जगली आहे. शब्द फेक, चेहऱ्यावरील भाव आणि प्रसंगानुरुप बदलणारी देहबोली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नाना अधिराज्य गाजवतात. या नटास खरच वंदन. दिग्दर्शक महेश माजंरेकरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. एका अजरामर नाटकाला एका अजरामर चित्रपटांमध्ये रुपांतरण केले आहे. नटसंम्राट या कलाकृतीला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नव्हे तर अश्रूंनी दाद दिली आहे . प्रेक्षकगृहात नावे पडेपर्यंत प्रेक्षक जागच्या जागी बसून राहतो. खरच शब्द अपूरे आहेत या कलाकृतीबद्दल बोलण्यासाठी शेवटी एवढच म्हणीन की, एका इतिहासाचे साक्षीदार होता आले हे आपले भाग्य आहे.
असा नट होणे नाही
असा नटसम्राट होणे नाही
अशी कलाकृती होणे नाही।