शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२- यशस्वी भव:




आजपासून सुरू होत आहे आशियाई देशांमध्ये  खेळांचा महासग्राम आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीनमधील कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील  हांगझोऊ शहरात होणार आहे. चीनमध्ये तिसऱ्यांदा ही आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ १९५१ साली भारतामध्ये झाला. यावर्षी होणारी ही स्पर्धा ही १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 

भारताचा विचार केल्यास या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तब्बल ६५० हून जास्त खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग ज्याच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच आपण आशियाई चॅम्पियन चषक जिंकलो आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन हे दोघे देशाचे ध्वजवाहक असतील. आज २३ तारखेला स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन होईल. खरंतर १९ तारखेपासूनच अनेक खेळांची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत तब्बल ४० खेळांच्या ६१ क्रिडाप्रकारांचा समावेश आहे तसेच ४८१ सुवर्ण पदकांकरिता ४५ देशातील १२ हजारांहून जास्त खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 

सुवर्ण कामगिरीचे दावेदार


भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. सुवर्णपदक जिंकून दोन्ही संघाला ऑलिंपिकमध्ये पात्र होण्याची सुवर्णसंधी आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ऑलिंपिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, निखत झरीन, बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू,  लक्ष्य सेन, सात्विक साईराज - चिराग शेट्टीची जोडी, एच एस प्रणॉय, कुस्ती मध्ये अंतिम पंघाल, ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बजरंग, महिला आणि पुरुष कब्बडी संघ, धावपटू अविनाश साबळे, रिले संघ हे सर्व भारताचे सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार असतील.नेमबाजीत नेमबाज सुवर्ण कामगिरी करतील. त्यासोबतच तिरंदाजी रोविंग, स्विमिंग, टेनिस,  आणि इतर स्पर्धांमध्ये ही भारतीय खेळाडू शानदार प्रदर्शन करतील.

या आशियाई क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे २०१४ नंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ यामध्ये सहभागी होणार असून दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन खेळांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान दिले असून  त्यामध्ये पब्जी, ई फुटबॉल , डोटा असे ही खेळ समाविष्ट आहे. 



 गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदक जिंकली होती या स्पर्धेत त्याहून जास्त पदके जिंकण्याचा मानस असेल. गेल्या महिन्यातच आपण चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश ठरलो. आपला देश जगातील ५ मोठी अर्थव्यवस्था आहे . देशाला महासत्ता होण्याचे वेध लागले आहेत. महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हायला हवे. क्रिडा क्षेत्रात तर आपण खूप मागे आहोत पण चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून खेळांना पोषक वातावरण निर्माण होते आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या वाढविल्या पाहिजेत. दर दशकात आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धा देशात आयोजित केल्या तर क्रिडापटूंना प्रोत्साहन मिळेल  आणि या स्पर्धांच आयोजन करुन जगाला आपली खेळातील आणि आयोजन करण्याची क्षमता दाखवता येईल.  आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. यशस्वी भव:, चक दे इंडिया.

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

आशियाई चॅम्पियन भारतीय संघ व्हावा विश्व चॅम्पियन

आशियाई चॅम्पियन, चक दे इंडिया 

चैन्नई मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने ४-३ ने मलेशियाला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी वर नाव कोरले. सामन्यामध्ये १६ मिनिटे शिल्लक असताना मलेशिया ३-१ ने पुढे होती मात्र पुढच्याच मिनिटाला भारताने २ गोल करत जबरदस्त कमबॅक केला आणि सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली. शेवटच्या सत्रात आकाशदिप सिंगने ४ था गोल करत भारतीय संघाला शानदार विजय संपादन करुन दिला. भारतीय संघाचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने केला.त्यानंतर दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने केला. सामन्यातील तिसरा अत्यंत महत्त्वाचा गोल गुरजंट सिंगने केला हा गोल भारतीय संघातील सुंदर ताळमेळीचे एक उदाहरण होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अतिंम सामन्यात भारताने पिछाडीवरुन आघाडीवर येत सामना जिंकला. यावरुनच भारतीय संघाची लढण्याची, हार न मानण्याची मानसिकता कळते.ही मानसिकता कोणत्याही संघासाठी जास्त महत्वाची असते.

या स्पर्धेत भारत अपराजित राहत पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान, चीन याच्यावर विजय मिळविला. यावरुनच स्पर्धेत पूर्णपणे भारतीय संघाने वर्चस्व केले हेही लक्षात येते. कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेत ९ गोल करत चषक विजयात सिंहांचा वाटा उचलला. युवा लोकल बॉय कार्ती सेलवम, उपकर्णधार हार्दिक सिंग, श्रीजेश, पाठक, मनदीप सिंग आणि निलकंठ शर्मा यांची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. चेन्नईच्या प्रेक्षकांनीही स्पर्धेत भारतीय संघाला दिलेला पाठिंबा कौतुकास्पद होता. अंतिम सामन्यात जेव्हा भारत पिछाडीवर होता त्यावेळी भारताच्या प्रत्येक आक्रमणाला प्रेक्षकांनी पाठिंब्याची धार दिली त्यामुळे चषक जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पाठिंबा खुप महत्वाचा ठरला.


अंतिम लक्ष्य ऑलिंपिक

२०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर पदक जिंकून हॉकीला नवसंजीवनी दिली . त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता मात्र घरच्या मैदानावर महत्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने  ९ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. हा पराभव जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळेच हॉकी इंडियाने फुल्टोन यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. फुल्टोन प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर भारताने जिंकलेले हे मोठे विजेतेपद आहे. आता लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचे असेल कारण या स्पर्धेत जर आपण सुवर्णपदक जिंकलो तर थेट ऑलिंपिक साठी पात्र होऊ.ज्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या पॅरिस ऑलम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. कारण अंतिम लक्ष्य हे ऑलम्पिक मध्ये सुवर्ण कामगिरी करणे हेच असणार आहे. 

जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा.

एक आनंदाची बाब म्हणजे आज भारतीय संघ वर्ल्ड रॅंकिंग मध्ये तिसऱ्या क्रमावर पोहचला आहे. गेल्या दोन दशकातील सर्वोत्कृष्ट क्रमांक भारतीय संघाने मिळवला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात भारतीय संघ नेहमी वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या पाच संघात राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा दिसून येतो. जर या सर्वाचे योग्य निरीक्षण करुन विचार केल्यास भारतीय हॉकी संघ एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जात आहे आणि भारताचा असणारा हॉकीचा सुवर्ण इतिहास पुन्हा साकारणे हेच उद्दिष्ट असणार आहे.

पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन.

येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा 

दिल दो हॉकी को. चक दे इंडिया 🇮🇳