गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

पोइसरचा आठवडा बाजार

पोइसरचा आठवडा बाजार


बाजार हा शब्द कानावर येतो आणि आठवण येते गावच्या आठवडा बाजाराची. गावाकडे खूप पूर्वीपासून आठवड्यातून एकदा बाजार भरविण्याची पध्दत आहे. आमच्या गावी मंगळवारचा आठवडा बाजार भरविला जातो, त्यादिवसाला गावी वाढदिवस असेही  म्हणतात. सगळे जण या आठवडा बाजारात जाऊन काय ना काय खरेदी करतात. गावच्या बाजारात उगाचच फिरण्याचीही मजा काही औरच असते. पंचक्रोशीतील छोटे विक्रेते येथे येतात तसेच ग्राहकही येतात. बाजाराच्या दिवशी गावाला वेगळाच रंग चढलेला असतो. इकडे मुंबई शहरात मात्र  आठवडा बाजार भरणे हे विरळच असेल. कांदिवलीतील पोईसर येथे मात्र गेली अनेक वर्षे बुधवारचा बाजार भरतो.
       
     मुंबईही पूर्वी बांद्र्यापर्यंतच मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात मुंबई उपनगरचा विकास झाला.याविकासामध्ये मुंबईतील मिठी, पोईसर, दहिसर नद्यांचे नाले झाले आणि त्याचा परिणाम २००५ मध्ये आलेल्या महापूरात दिसले. पोईसर नदीच्या म्हणजे नाल्याच्याजवळ हा बाजार भरविला जातो. अवर लेडी ही कांदिवलीतील जुनी शाळा आणि चर्चही तिथे आहे. या बाजारासाठी एक जागाच आरक्षित असली तरी ती जागा अपूरी पडत असल्याने अनेक लहान विक्रेते रस्त्यावर आपल दुकान मांडतात.  

     बाजारामध्ये भाजीपाला, फळे, लहान मोठ्या वस्तू(चमचे, सुरी, लहान भांडी, इत्यादी),खोटे दागदागिने, कपडे हे फार स्वस्त दरात मिळतात. पण पोईसरचा बाजार हा माशांसाठी प्रसिध्द आहे. हलवा,पापलेट या ताज्या माशांपासून जवला, बांगड्याच्या सुक्या माश्यापर्यंत सर्व मासे इथे मिळतात. ''ओ... दादा ओ.. मावशी आवर ये १०० ला जोरी घे'' असा कोळींणीचा आवाज गर्दीमध्ये येत असतो. त्यामुळे मासांहार करणाऱ्यांची इथे फार रेलचेल असते.  सुतळ, गोणी, टोपल्या, किचन्स, लहान मुलांसाठी स्वस्तातील चायना खेळणी अशा काही वस्तू आहेत जे कुठेही उपलब्ध नसतात ते फक्त या बाजारात मिळतात.
    
     वडापाव, कटलेट्स, भजीपाव यांचे छोटे स्टॉल बाजाराच्या मध्यातच असतात त्यामुळे बाजारात फिरताना आपले लक्ष तळलेल्या वड्यांकडे जाते आणि मग खाण्याचा मोह आवरता येत नाही. सध्या वडापावची किंमत साधारण १० ते १२ रुपये आहे. मात्र पोईसरच्या बाजारात एक वडापाव ७ ते ८ रुपयाला मिळतो.  बाजूलाच घुंगराचा खळ खळ करणारा उसाचा रसवाला असतो. १० ते १५ रुपयाला मिळणारा उसाचा रसही येथे फक्त ७ रुपयांमध्ये मिळतो. त्यामुळे बाजारात खरेदी करता करता पेटपूजाही होते ती ही स्वस्तात.
     
       पोईसरच्या बाजारामध्ये फिरण्यातच आपले तास, दोन तास कसे निघतात हेच कळत नाही सकाळी १० च्या सुमारास सुरु होणारा बाजार संध्याकाळी संपतो. बाजार जरी रोज भरत नसला तरी प्रत्येक ग्राहक आणि विक्रेत्याच्या मनात मात्र बाजारासाठी खास अशी जागा असते.आजच्या काळात मुंबईसारख्या शहरामध्ये वेगाने मॉल संस्कृती वाढत आहे. एकाच छताखाली सर्वकाही तेही एसीच्या हवेत असे जरी मॉलचे वैशिष्टय असले तरी प्रत्येकाला मॉलमधून वस्तू विकत घेणे परवडत नाही. अनेक अशा वस्तू ( किचंन्स, खोटे दागदागिने)आहेत त्यांची मॉलमध्ये कायच्या काय किंमत असते मात्र तिच वस्तू आठवडा बाजारात खूप स्वस्त मिळते. आठवडा बाजारात होणारी गर्दी ही मॉल्समधील ग्राहकांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते.
     
     पोईसर आठवडा बाजाराचे चारकोप पोईसरवासियांच्या दृष्टीने वेगळे महत्व आहे. गेली कित्येक वर्ष हा बाजार सुरू असून दिवसेंदिवस या बाजारातील विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या वाढतच आहे. खुल्या आसमंतात  Fixed rate चा बोर्ड नसलेल्या विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी करण्यातही वेगळा अनुभव असतो. त्यामुळे जरी शहर कितीही झपाट्याने बदलले तरी पोईसरच्या आठवडा बाजाराचे महत्व कधीही कमी होणार नाही हे नक्की.


सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

अमोल पालेकर - बातो ही बातों मे


                

काहीवेळा माझ अस होत की मी घऱातून कॉलेजसाठी लवकर निघतो ( बाकीच्यावेळी माझी तारेवरची कसरत म्हणजे धावपळीचाच कारभारच असतो)पण त्यावेळी बस उशीरा येते. आजही तेच झाल पण नशीब चांगल कारण रोजची ट्रेन मिळाली. ट्रेन मिळण्याचही  एक कारण  आहे ते म्हणजे आपल्या लोकल वेळेवर येत नाहीत आणि माझ्यासारख्यां उशीरा निघायची सवय असलेल्यांना ह्याचा फायदा होतो. विलेपार्ले स्टेशला उतरल्यावर कॉलेजला जाईपर्यंत एफ एम ऐकत असताना माझ्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे हे कळल. हा अभिनेता आजच्यासारखा ६ पॅकवाला हिरो नाही.यानं चित्रपटात कधीही मारधाड केली नाही. यांच वैशिष्ट म्हणजे ते सामांन्यातील एक आहेत पडद्यावरही आणि खऱ्या आय़ुष्यातही त्यामुळेच ते सर्वांना आपल्यातले वाटतात. अभिनेते आणि तितकेच संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे अमोल पालेकर यांनी आज ७१ वर्षात पदार्पण केले. अमोल पालेकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


        'अमोल पालेकर' हे नाव मी लहाणपणी ऐकल असेल पण ते कसे दिसतात त्यांचे चित्रपट कोणते हे मला १२ वी मध्ये कळल. टिव्हीवर त्यांच्या छोटी सी बात या चित्रपट काहीसा भाग मी पाहिला. त्यातील साधेपणा भावला आणि तो चित्रपट पूर्ण पाहता यावा यासाठी मी माझ्या अनेक मित्रांना विचारले पण त्यांच्याकडे हा चित्रपट मिळाला नाही. शेवटी काही दिवसानंतर इंटरनेटवर या चित्रपट मिळाला. परीक्षेसाठी जेमतेम आठवडा  बाकी असताना मी हा चित्रपट पूर्ण बघितला चित्रपटातील सांमान्य माणसाच्या प्रेमाची कथा अमोल पालेकर यांचा सहज सुंदर अभिनय. विद्या सिन्हांनी दिलेली साथ असरानी आणि अशोक कुमार यांची जुगलबंदी बासु चॅटर्जी यांच्या दिग्दर्शन ७० च्या दशकातील मुंबई यामुळे या चित्रपट मला प्रचंड आवडला.

    १२ वीच्या सुट्टीत गावी गेलो होतो. तेव्हा 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे गाण एक काका गुणगुणत होते त्यावेळी मी त्यांनी मला सांगितल की हे गाण 'चितचोर' या चित्रपटातल आहे ते म्हणाले की ''मी मुंबईत असताना हा चित्रपट पाहिला होता अमोल पालेकरची अक्टींग मस्त आहे आणि गावातील कथा आहे''. त्याच्यां  सांगण्याने अमोल पालेकर यांच्या चित्रपटाविषयी मनात ओढ निर्माण झाली. त्यांचे चितचोर, गोलमाल, नरम गरम, रजनीगंधा हे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या नर्मविनोदी भुमिका आणि सहज सुंदर अभिनयामुळे अमोल पालेकरांचा मी दर्दी चाहता झालो. ते  माझे आवडते अभिनेते झाले. आजही त्यांचे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो त्यामधील सामान्य माणसाशी जोडलेली नाळ आणि त्यांची अदाकारी प्रत्येकवेळी भारावते.

अमोल पालेकर यांची कारकिर्द

    जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये त्यांनी फाइन आर्टस शिकले. चित्रकार असलेल्या अमोल पालेकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २९ व्या वर्षी रजनीगंधा (१९७४) हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट. दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हांच्या या चित्रपटामध्ये त्यांची भूमिकाही छाप पाडून जाते. त्यानंतर 'छोटी सी बात' सारखा सामांन्य माणसाच्या प्रेमावरील रंजक चित्रपट. चितचोरमधून शहरी तरुण आणि गावातील मुलींच प्रेमावर आधारित कथानक असलेल्या चित्रपट हे चित्रपट त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे स्मरणीय ठरले.  

   अमोल पालेकर झरीना वहाब आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या घरोंदामध्ये शहरातील सामांन्य माणसाचा संघर्ष मांडला आहे. अमोल पालेकर यांनी काहीशी निगेटिव्ह व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे. श्याम बेनेगल यांच्या 'भुमिका' (१९७७) चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भुमिका साकारुन प्रेक्षकांना अचंबित करुन टाकले. बासु चॅटर्जी यांच्या बातो ही बातो में सारखा रेल्वेमध्ये होणाऱ्या प्रेम आणि बांद्र्यातील ख्रिश्चन कुटुंबावर आधारित चित्रपटामध्ये अमोल पालेकर-टीना मुनिम जोडी छान जमून आली.

    ह्रषिकेश मुखर्जींचा गोलमाल हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील डबल रोलमुळे अमोल पालेकर खऱ्या अर्थाने एक स्टार झाले. या चित्रपटाची विनोदी कथा उत्पल दत्तअमोल पालेकरबिंद्या गोस्वामी यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. रामप्रसाद शर्माभवानी शंकर ह्या व्यक्तीरेखा गाजल्या.  भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या समावेश होतो. या चित्रपटातील अभिनयामुळे अमोल पालेकर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

     अपने परायेजुठीनरम गरमरंगबिरंगीटॅक्सी-टॅक्सी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. एक अभिनेता म्हणून सिमित न राहता त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८१ मध्ये आक्रीत हा त्यांचा दिग्दर्शन केलला पहिला चित्रपट होता. थोडासा रुमानी हो जाय हा कल्पनारंम्य चित्रपट लक्ष्यवेधी ठरला. या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या बारिश व्यक्तिरेखेचे विशेष कौतुक केले गेल. बनगर वाडी, ध्यासपर्व असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन दिग्दर्शनातही आपले वेगळेपण कायम राखले.२००५ मध्ये पहेली हा शाहरुख खानराणी मुखर्जी याच्यावरील चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आले यामध्ये त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे यश आहे. कच्ची धूपनकाबकरीना करीना अशा टिव्ही मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    अमोल पालेकर यांच्या चित्रपटातून सामांन्य माणसाच्या जीवन त्यातील संघर्षत्याच्या भावनाप्रेमत्याच्या ईच्छा आकांशा दाखविल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अक्शन चित्रपटांच्या काळात नर्मविनोदी चित्रपटांमुळे लोकांना आपलासा वाटणारा अभिनेता अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमुळे माझी ह्रषिकेश मुखर्जीबासू चॅटर्जी यां प्रतिभावान दिग्दर्शकांची ओळख झाली. एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक म्हणून ते परिचित असले तरी अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आणि आम्हा चाहत्यांच्या ह्रद्यामध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.



बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

झोपाळा




मराठी रंगभूमीला भारतात मानाच स्थान आहे. प्रायोगिक नाटक ते व्यावसायिक नाटके यामध्ये संगीत नाटकांचा भाग वेगळाच. प्रायोगिक नाटकांचा मुळातच बाज वेगळा असतो कारण कोणतीही व्यावसायिक गणिते यामध्ये नसतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांची हाताळणी यामध्ये केली जाते. अनेक प्रायोगिक नाटके नंतर व्यावसायिक नाटके होतात. काहीवेळा प्रायोगिक आणि व्यावसायिक असा सुरेख मेळ नाटकात साधण्यात येतो. झोपाळा हे नाटकही याच धऱतीवरील आहे. झोपळा हा शब्द ऐकल्यावर नॉस्टलेजिक व्हायला होत कारण प्रत्येकाने झोपाळ्यावर झोका घेतलेला असतो त्या झोक्यात आपल्याला उंचावरुन झुर् खाली यायला होत तसंच हे झोपाळा नाटक.
मराठी लेखकांमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण केलेले दोन लेखक म्हणजे व.पू, काळे आणि रत्नाकर मतकरी. झोपाळा या विषयावर या दोघांनीही कथा लिहिली आहे, व.पू.च लेखन म्हणजे माणसाला प्रश्नार्थक करणार आणि मतकरीच्या लेखनात गुढता भरलेली अशी दोन्ही कथांवर आधारित नाटक म्हणजे झोपाळा.

प्रथमेश परब, भाग्यश्री शंकपाल  (बालक पालक फेम ) आणि डहाणुकर महाविद्यालयातील मुलांनी झोपाळा साकारले आहे.  नाटकाची सुरुवातच एका कार्यालयातून होते. कार्यालयातील जेष्ठ कर्मचारी (प्रथमेश परब) हा या कथा सांगतो. त्याच्याच कार्यालयात स्टॅनो म्हणून काम करत असणाऱ्या ललितबद्दल ही कथा असते. ललित सोबत त्या दिवशी एक उच्चभ्रू स्त्री कार्यालयापर्यंत येते. आणि मग सुत्रधार त्याला विचारतो की ही स्त्री कोण  ललित आपल्या बालपण आणि मृदुला भाग्यश्री शंकपाल हीच शेजारी गावी राहण. झोपाळ्यावर झोका घेणे. पुढे मात्र मृदुलाचा जीवनात संबंध नसणे आणि आता पुन्हा मृदुलाची भेठ होते. कॉलेजमधील खास मैत्रीण आणि ललितला भावलेली जसवंतीही त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. अशा घटना एकाच वेळा घडतात आणि सर्व  या कथेचा शेवट शेवटी प्रश्नार्थक होतो.
मध्यंतरानंतर दुसरी कथा सुरु होते. नाशकात राहणाऱ्या लिलूला लग्नासाठी मुलाकडचे पाहण्यास येतात. त्यावेळी त्या मुलाची आई जणूकाही या वाड्यात वास्तव्य करते असे प्रश्न विचारते त्यामुळे सर्वजण कोड्यात पडतात. त्यांच्या घरातील झोपाळ्यावर बसून ती यासर्व गुढतेची उत्तर देते. कुसुमचं लग्न हे मुलीच्या वडीलांशी ठरलेल असते. मुलाकडच्यांवर गंभीर प्रसंग येऊन दोनवेळा लग्नाचा मुहुर्त पुढे जातो त्यामुळे हे लग्न शेवटी मोडते. मात्र कुसुमचे मन मात्र नाशकातील वाड्यातच अडकलेला असतो अशी मतकरीची रहस्यमय कथा आहे.
नाटकातील दोन्ही कथा वेगळ्या असल्या तरी झोपाळ्याशी निगडीत आहेत. पहिली कथा ही मनाचा ठाव घेते. व.पू. काळे यांची ही कथा योग्य पद्धतीने साकारली गेली आहे. कलाकारांनी अभिनय ही चांगला केला आहे. नाटकातील दोन्ही कथांमध्ये प्रकाशयोजनाचे वापर फार अप्रतिम केला आहे. प्रकाशयोजनेमुळे नाटकाला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. सर्व दारातील झोपाळ्याचा प्रसंग हा प्रेक्षकाला अचंबित करतो. नाटकातील संगीतही साजेस आहे.
मध्यंतरानंतर दुसऱ्या कथेची सुरुवात फार गुढ होते. आपोआप झोपाळा हलणे, कुसुमचे विचित्र वागणे यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात परंतु वारंवार येणारे तेच प्रसंगामुळे कथा कंटाळवाणी होते. तरीही या कथेमध्येही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे मात्र कथा योग्य पध्दतीने मांडली गेली नाही असेच वाटते. रत्नाकर मतकरींची कथा ज्याप्रमाणे गुढ असावी अशी ती वाटत नाही.
दोन्ही कथा मांडण्याचा प्रयत्न चांगला केला असला तरी दुसरी कथा फारशी जुळून येत नाही त्यामुळे पहिली कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकाच नैपथ्य ही कथेला साजेस आहे. एकंदर झोपाळा हे नाटकाची मांडणी वेगळी आहे. विषयहिन हिंदी चित्रपटांना पैसे घालण्यापेक्षा झोपाळा नाटक तुम्हाला नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल.



गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

वाढता कौटुंबिक विसंवाद


 


                 आजकाल सगळीकडे आपण ऐकतो कि लोकांना सतत कसल्या ना कसल्या गोष्टीची चिंता सतावत असते. मनावर कसला ना कसला ताण असतोच. टेंन्शन हा शब्द तर जीवनातील अविभाज्य घटकच बनला आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या पहिलीतल्या मुलीशी सहज गप्पा मारत असताना ती मला म्हणाली की मला अभ्यासाच टेंन्शन आल आहे. त्यावेळी मी आवाक झालो. आजच्या घडीला पहिलीतील मुलीलाही टेंन्शन येत आहे ज्या वयात खेळायचे असते त्या वयात मुलांना कसल टेंन्शन येत. त्यात त्या मुलांचीही चूक नाही घरी आई वडील कामावर जात असल्याने मुलांना शाळा आणि त्यानंतर क्लासमध्ये जाव लागत त्यामध्ये शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास वेळ मिळालाच तर त्यावेळात मुले टॅब, मोबाईलवरील गॅम्स खेळण्यात व्यस्त असतात. यामध्ये मुले आणि पालकांचा संवादच होत नाहीत. मुले आणि पालक ही विसंवादाचे एक उदाहरण झाले खऱतर कौटुंबिक विसंवाद ही आजच्या धावपळीच्या जगात मुख्य समस्या बनली आहे. 


                      आताचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.आज मोबाईल, इंटरनेट आणि इतर साधनांमध्ये आपण  इतके दंग झाला आहे की माणसे घऱात एकत्र बसली असली तरी त्यांची लक्ष मोबाईल मध्ये असते. त्यामुळे फेसबुक, व्हॅाटसप सारख्या संवादमाध्यमांचा  ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या आजोबांपर्य़ंत सर्व याचा सर्रास वापर करत आहेत.यामध्येच प्रत्येक जण व्यस्त असतो की इतर गोष्टींना त्याच्याकडे वेळच उरत नाही. हे इंटरनेटचे व्यसन कौटुंबिक विसंवादाचे मुख्य कारण आहे.

घर असावे सुंदर माझे असे सर्वांनाच वाटते परंतु आता घरात घरपण राहिले नसुन फक्त चार भिंती आहेत. ज्या भिंतीमध्ये  घरच्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची कल्पनाही बहुतेक जणांना नसते. घरातल्या लोंकाशी बोलणेच होत नसल्याने आपले पणाचा ओलावा उरत नाही. कोणा विषयी आदर राहत नाही.  प्रत्येक जण आपल्यापूरती विचार करतो. त्यामुळे माणूस राहण्यासाठी म्हणून राहत आहे अशा चार भिंतींना घऱ म्हणावे का हाच प्रश्न पडतो.


         काही वर्षांपूर्वी 'श्रीयुत गंगाधऱ टिपरे ही मालिका येत असे. ही मालिका इतर मालिंकापेक्षा फार वेगळी होती. यात शिऱ्या आणि त्याच्या आजोबांचे नाते, आई वडील शेखर, शामला यांच्या नात्यातील ओलावा घऱातील वेगवेगळ्या समस्या रंजकरित्या सोडविल्या जात. कुटुंबाचे महत्व या मालिकेतून मांडले गेले होते. त्यामुळे ही मालिका लोकांच्या दिर्घकाल स्मरणात राहिली आहे. आज त्याप्रकारच्या मालिकाही येत नाही आणि चित्रपटही नाहीत. प्रत्यक्षातही लोकांचा दुष्टीकोन बदलला आहे हे महत्वाचे आहे.आज आजीच्या गोष्टी ऐकण्यात नातवाला रस नसतो. मोबाईल,टॅबवरील गेम्ससारख्या आभासी विश्वातच लहान मुले रमत आहेत. यामुळे नातेसंबधातील दरी वाढत जात आहे. 
          कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेकही घातक असतो. इंटरनेटचाही अतिवापर हा माणसाला घातक ठरु लागला आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी आपली माणसे दुरावली आहेत. माणूस आभासी जगात वावरु लागला आहे. प्रत्यक्ष संवादाला माणसाच्या जीवनातील स्थान कमी होऊ लागल्यानेच अनेकांना मानसिक आजार होत आहेत. कौटुंबिक विसंवादातूनच या सर्व समस्या होत आहेत हे मान्य करावच लागेल.
         काळ बदलतो तसे माणसालाही बदलावे लागते  त्यामुळे कुटुंबातील नातेसंबधामध्येही काळानुसार बदल  होत आहे. मात्र  कुटुंबातील व्यक्तींचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेच पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनातील समस्या जर आपण घऱच्यांसमोर मांडल्यास तर समस्येचे निराकरण होऊ शकते. काहीवेळा समस्येवर तोडगा निघाला नसला तरी जो हवा असणारा भावनिक पाठिंबा आपल्याला कुटुंबाकडून नक्कीच मिळतो. या पाठिंबाची आपल्याला खरी गरज असते.
         माणसाने कुटुंब आणि नातेसंबधावर लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर माणसाची अवस्था भरकटलेल्या जहाजाप्रमाणे होईल.  पौराणिक काळापासून आपल्या देशात कुंटुंबाला महत्व दिले आहे. कुटुंबाच्या संस्कारावर माणूस घडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्परांशी नियमित संवाद ठेवणे प्रत्येक कुटुंबाने महत्त्वाचे मानले तर कौटुंबिक विसंवादाचे प्रमाण नक्कीच कमी होईल.