गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

पोइसरचा आठवडा बाजार

पोइसरचा आठवडा बाजार


बाजार हा शब्द कानावर येतो आणि आठवण येते गावच्या आठवडा बाजाराची. गावाकडे खूप पूर्वीपासून आठवड्यातून एकदा बाजार भरविण्याची पध्दत आहे. आमच्या गावी मंगळवारचा आठवडा बाजार भरविला जातो, त्यादिवसाला गावी वाढदिवस असेही  म्हणतात. सगळे जण या आठवडा बाजारात जाऊन काय ना काय खरेदी करतात. गावच्या बाजारात उगाचच फिरण्याचीही मजा काही औरच असते. पंचक्रोशीतील छोटे विक्रेते येथे येतात तसेच ग्राहकही येतात. बाजाराच्या दिवशी गावाला वेगळाच रंग चढलेला असतो. इकडे मुंबई शहरात मात्र  आठवडा बाजार भरणे हे विरळच असेल. कांदिवलीतील पोईसर येथे मात्र गेली अनेक वर्षे बुधवारचा बाजार भरतो.
       
     मुंबईही पूर्वी बांद्र्यापर्यंतच मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात मुंबई उपनगरचा विकास झाला.याविकासामध्ये मुंबईतील मिठी, पोईसर, दहिसर नद्यांचे नाले झाले आणि त्याचा परिणाम २००५ मध्ये आलेल्या महापूरात दिसले. पोईसर नदीच्या म्हणजे नाल्याच्याजवळ हा बाजार भरविला जातो. अवर लेडी ही कांदिवलीतील जुनी शाळा आणि चर्चही तिथे आहे. या बाजारासाठी एक जागाच आरक्षित असली तरी ती जागा अपूरी पडत असल्याने अनेक लहान विक्रेते रस्त्यावर आपल दुकान मांडतात.  

     बाजारामध्ये भाजीपाला, फळे, लहान मोठ्या वस्तू(चमचे, सुरी, लहान भांडी, इत्यादी),खोटे दागदागिने, कपडे हे फार स्वस्त दरात मिळतात. पण पोईसरचा बाजार हा माशांसाठी प्रसिध्द आहे. हलवा,पापलेट या ताज्या माशांपासून जवला, बांगड्याच्या सुक्या माश्यापर्यंत सर्व मासे इथे मिळतात. ''ओ... दादा ओ.. मावशी आवर ये १०० ला जोरी घे'' असा कोळींणीचा आवाज गर्दीमध्ये येत असतो. त्यामुळे मासांहार करणाऱ्यांची इथे फार रेलचेल असते.  सुतळ, गोणी, टोपल्या, किचन्स, लहान मुलांसाठी स्वस्तातील चायना खेळणी अशा काही वस्तू आहेत जे कुठेही उपलब्ध नसतात ते फक्त या बाजारात मिळतात.
    
     वडापाव, कटलेट्स, भजीपाव यांचे छोटे स्टॉल बाजाराच्या मध्यातच असतात त्यामुळे बाजारात फिरताना आपले लक्ष तळलेल्या वड्यांकडे जाते आणि मग खाण्याचा मोह आवरता येत नाही. सध्या वडापावची किंमत साधारण १० ते १२ रुपये आहे. मात्र पोईसरच्या बाजारात एक वडापाव ७ ते ८ रुपयाला मिळतो.  बाजूलाच घुंगराचा खळ खळ करणारा उसाचा रसवाला असतो. १० ते १५ रुपयाला मिळणारा उसाचा रसही येथे फक्त ७ रुपयांमध्ये मिळतो. त्यामुळे बाजारात खरेदी करता करता पेटपूजाही होते ती ही स्वस्तात.
     
       पोईसरच्या बाजारामध्ये फिरण्यातच आपले तास, दोन तास कसे निघतात हेच कळत नाही सकाळी १० च्या सुमारास सुरु होणारा बाजार संध्याकाळी संपतो. बाजार जरी रोज भरत नसला तरी प्रत्येक ग्राहक आणि विक्रेत्याच्या मनात मात्र बाजारासाठी खास अशी जागा असते.आजच्या काळात मुंबईसारख्या शहरामध्ये वेगाने मॉल संस्कृती वाढत आहे. एकाच छताखाली सर्वकाही तेही एसीच्या हवेत असे जरी मॉलचे वैशिष्टय असले तरी प्रत्येकाला मॉलमधून वस्तू विकत घेणे परवडत नाही. अनेक अशा वस्तू ( किचंन्स, खोटे दागदागिने)आहेत त्यांची मॉलमध्ये कायच्या काय किंमत असते मात्र तिच वस्तू आठवडा बाजारात खूप स्वस्त मिळते. आठवडा बाजारात होणारी गर्दी ही मॉल्समधील ग्राहकांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते.
     
     पोईसर आठवडा बाजाराचे चारकोप पोईसरवासियांच्या दृष्टीने वेगळे महत्व आहे. गेली कित्येक वर्ष हा बाजार सुरू असून दिवसेंदिवस या बाजारातील विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या वाढतच आहे. खुल्या आसमंतात  Fixed rate चा बोर्ड नसलेल्या विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी करण्यातही वेगळा अनुभव असतो. त्यामुळे जरी शहर कितीही झपाट्याने बदलले तरी पोईसरच्या आठवडा बाजाराचे महत्व कधीही कमी होणार नाही हे नक्की.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा