सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

अमोल पालेकर - बातो ही बातों मे


                

काहीवेळा माझ अस होत की मी घऱातून कॉलेजसाठी लवकर निघतो ( बाकीच्यावेळी माझी तारेवरची कसरत म्हणजे धावपळीचाच कारभारच असतो)पण त्यावेळी बस उशीरा येते. आजही तेच झाल पण नशीब चांगल कारण रोजची ट्रेन मिळाली. ट्रेन मिळण्याचही  एक कारण  आहे ते म्हणजे आपल्या लोकल वेळेवर येत नाहीत आणि माझ्यासारख्यां उशीरा निघायची सवय असलेल्यांना ह्याचा फायदा होतो. विलेपार्ले स्टेशला उतरल्यावर कॉलेजला जाईपर्यंत एफ एम ऐकत असताना माझ्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे हे कळल. हा अभिनेता आजच्यासारखा ६ पॅकवाला हिरो नाही.यानं चित्रपटात कधीही मारधाड केली नाही. यांच वैशिष्ट म्हणजे ते सामांन्यातील एक आहेत पडद्यावरही आणि खऱ्या आय़ुष्यातही त्यामुळेच ते सर्वांना आपल्यातले वाटतात. अभिनेते आणि तितकेच संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे अमोल पालेकर यांनी आज ७१ वर्षात पदार्पण केले. अमोल पालेकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


        'अमोल पालेकर' हे नाव मी लहाणपणी ऐकल असेल पण ते कसे दिसतात त्यांचे चित्रपट कोणते हे मला १२ वी मध्ये कळल. टिव्हीवर त्यांच्या छोटी सी बात या चित्रपट काहीसा भाग मी पाहिला. त्यातील साधेपणा भावला आणि तो चित्रपट पूर्ण पाहता यावा यासाठी मी माझ्या अनेक मित्रांना विचारले पण त्यांच्याकडे हा चित्रपट मिळाला नाही. शेवटी काही दिवसानंतर इंटरनेटवर या चित्रपट मिळाला. परीक्षेसाठी जेमतेम आठवडा  बाकी असताना मी हा चित्रपट पूर्ण बघितला चित्रपटातील सांमान्य माणसाच्या प्रेमाची कथा अमोल पालेकर यांचा सहज सुंदर अभिनय. विद्या सिन्हांनी दिलेली साथ असरानी आणि अशोक कुमार यांची जुगलबंदी बासु चॅटर्जी यांच्या दिग्दर्शन ७० च्या दशकातील मुंबई यामुळे या चित्रपट मला प्रचंड आवडला.

    १२ वीच्या सुट्टीत गावी गेलो होतो. तेव्हा 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे गाण एक काका गुणगुणत होते त्यावेळी मी त्यांनी मला सांगितल की हे गाण 'चितचोर' या चित्रपटातल आहे ते म्हणाले की ''मी मुंबईत असताना हा चित्रपट पाहिला होता अमोल पालेकरची अक्टींग मस्त आहे आणि गावातील कथा आहे''. त्याच्यां  सांगण्याने अमोल पालेकर यांच्या चित्रपटाविषयी मनात ओढ निर्माण झाली. त्यांचे चितचोर, गोलमाल, नरम गरम, रजनीगंधा हे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या नर्मविनोदी भुमिका आणि सहज सुंदर अभिनयामुळे अमोल पालेकरांचा मी दर्दी चाहता झालो. ते  माझे आवडते अभिनेते झाले. आजही त्यांचे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो त्यामधील सामान्य माणसाशी जोडलेली नाळ आणि त्यांची अदाकारी प्रत्येकवेळी भारावते.

अमोल पालेकर यांची कारकिर्द

    जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये त्यांनी फाइन आर्टस शिकले. चित्रकार असलेल्या अमोल पालेकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २९ व्या वर्षी रजनीगंधा (१९७४) हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट. दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हांच्या या चित्रपटामध्ये त्यांची भूमिकाही छाप पाडून जाते. त्यानंतर 'छोटी सी बात' सारखा सामांन्य माणसाच्या प्रेमावरील रंजक चित्रपट. चितचोरमधून शहरी तरुण आणि गावातील मुलींच प्रेमावर आधारित कथानक असलेल्या चित्रपट हे चित्रपट त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे स्मरणीय ठरले.  

   अमोल पालेकर झरीना वहाब आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या घरोंदामध्ये शहरातील सामांन्य माणसाचा संघर्ष मांडला आहे. अमोल पालेकर यांनी काहीशी निगेटिव्ह व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे. श्याम बेनेगल यांच्या 'भुमिका' (१९७७) चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भुमिका साकारुन प्रेक्षकांना अचंबित करुन टाकले. बासु चॅटर्जी यांच्या बातो ही बातो में सारखा रेल्वेमध्ये होणाऱ्या प्रेम आणि बांद्र्यातील ख्रिश्चन कुटुंबावर आधारित चित्रपटामध्ये अमोल पालेकर-टीना मुनिम जोडी छान जमून आली.

    ह्रषिकेश मुखर्जींचा गोलमाल हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील डबल रोलमुळे अमोल पालेकर खऱ्या अर्थाने एक स्टार झाले. या चित्रपटाची विनोदी कथा उत्पल दत्तअमोल पालेकरबिंद्या गोस्वामी यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. रामप्रसाद शर्माभवानी शंकर ह्या व्यक्तीरेखा गाजल्या.  भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या समावेश होतो. या चित्रपटातील अभिनयामुळे अमोल पालेकर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

     अपने परायेजुठीनरम गरमरंगबिरंगीटॅक्सी-टॅक्सी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. एक अभिनेता म्हणून सिमित न राहता त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८१ मध्ये आक्रीत हा त्यांचा दिग्दर्शन केलला पहिला चित्रपट होता. थोडासा रुमानी हो जाय हा कल्पनारंम्य चित्रपट लक्ष्यवेधी ठरला. या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या बारिश व्यक्तिरेखेचे विशेष कौतुक केले गेल. बनगर वाडी, ध्यासपर्व असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन दिग्दर्शनातही आपले वेगळेपण कायम राखले.२००५ मध्ये पहेली हा शाहरुख खानराणी मुखर्जी याच्यावरील चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आले यामध्ये त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे यश आहे. कच्ची धूपनकाबकरीना करीना अशा टिव्ही मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    अमोल पालेकर यांच्या चित्रपटातून सामांन्य माणसाच्या जीवन त्यातील संघर्षत्याच्या भावनाप्रेमत्याच्या ईच्छा आकांशा दाखविल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अक्शन चित्रपटांच्या काळात नर्मविनोदी चित्रपटांमुळे लोकांना आपलासा वाटणारा अभिनेता अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमुळे माझी ह्रषिकेश मुखर्जीबासू चॅटर्जी यां प्रतिभावान दिग्दर्शकांची ओळख झाली. एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक म्हणून ते परिचित असले तरी अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आणि आम्हा चाहत्यांच्या ह्रद्यामध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा