शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२- यशस्वी भव:




आजपासून सुरू होत आहे आशियाई देशांमध्ये  खेळांचा महासग्राम आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीनमधील कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील  हांगझोऊ शहरात होणार आहे. चीनमध्ये तिसऱ्यांदा ही आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ १९५१ साली भारतामध्ये झाला. यावर्षी होणारी ही स्पर्धा ही १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 

भारताचा विचार केल्यास या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तब्बल ६५० हून जास्त खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग ज्याच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच आपण आशियाई चॅम्पियन चषक जिंकलो आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन हे दोघे देशाचे ध्वजवाहक असतील. आज २३ तारखेला स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन होईल. खरंतर १९ तारखेपासूनच अनेक खेळांची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत तब्बल ४० खेळांच्या ६१ क्रिडाप्रकारांचा समावेश आहे तसेच ४८१ सुवर्ण पदकांकरिता ४५ देशातील १२ हजारांहून जास्त खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 

सुवर्ण कामगिरीचे दावेदार


भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. सुवर्णपदक जिंकून दोन्ही संघाला ऑलिंपिकमध्ये पात्र होण्याची सुवर्णसंधी आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ऑलिंपिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, निखत झरीन, बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू,  लक्ष्य सेन, सात्विक साईराज - चिराग शेट्टीची जोडी, एच एस प्रणॉय, कुस्ती मध्ये अंतिम पंघाल, ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बजरंग, महिला आणि पुरुष कब्बडी संघ, धावपटू अविनाश साबळे, रिले संघ हे सर्व भारताचे सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार असतील.नेमबाजीत नेमबाज सुवर्ण कामगिरी करतील. त्यासोबतच तिरंदाजी रोविंग, स्विमिंग, टेनिस,  आणि इतर स्पर्धांमध्ये ही भारतीय खेळाडू शानदार प्रदर्शन करतील.

या आशियाई क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे २०१४ नंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ यामध्ये सहभागी होणार असून दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन खेळांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान दिले असून  त्यामध्ये पब्जी, ई फुटबॉल , डोटा असे ही खेळ समाविष्ट आहे. 



 गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदक जिंकली होती या स्पर्धेत त्याहून जास्त पदके जिंकण्याचा मानस असेल. गेल्या महिन्यातच आपण चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश ठरलो. आपला देश जगातील ५ मोठी अर्थव्यवस्था आहे . देशाला महासत्ता होण्याचे वेध लागले आहेत. महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हायला हवे. क्रिडा क्षेत्रात तर आपण खूप मागे आहोत पण चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून खेळांना पोषक वातावरण निर्माण होते आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या वाढविल्या पाहिजेत. दर दशकात आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धा देशात आयोजित केल्या तर क्रिडापटूंना प्रोत्साहन मिळेल  आणि या स्पर्धांच आयोजन करुन जगाला आपली खेळातील आणि आयोजन करण्याची क्षमता दाखवता येईल.  आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. यशस्वी भव:, चक दे इंडिया.