गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

'पोश्टर बॉइज्' एक इरसाल ईनोदी सिनेमा





पोश्टर बॉइज् हा चित्रपट गेल्या आठवड्यात मित्रांसोबत पाहिला. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट पाहण्यसाठी चित्रपटगृहात गेलो. चित्रपटाची विषय मुळातच नसबंदी सारख्या गंभीर विषयावर असला तरी दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या समीर पाटील यांनी या विषयाला रंजक आणि विनोदी पद्धतीने सादर केला आहे. नसबंदीवर विनोद करताना तो विनोद कमरे खालचा होऊ न देता विनोदाची सीमारेषा जपली आहे याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला द्यावे लागेल. चित्रपटाची कथा एका गावातील जत्रेत सुरु होते. या जत्रेच्या आनंदानंतर गावचे प्रतिष्ठित गृहस्थ जगन देशमुख ( दिलीप प्रभावळकर), शाळा मास्तर सदानंद कुलकर्णी ( ऋषिकेश जोशी) आणि गावातला एक अवली तरुण अर्जुन जगताप(अनिकेत विश्वासराव) यांच्यावर जणु काही आभाळच कोसळते. जगन देशमुखांच्या मुलीचा साखरपुडा मोडतो, सदानंद कुलकर्णींची बायको घर सोडून जाते आणि अर्जुनचे लग्न मोडते. ही आफत कशामुळे ओढवली आहे याचा थांगपत्ता या तिघांनाही नसतो. ते या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की त्यांचे फोटो सरकारच्या बिनटाका नसबंदीच्या पोश्टरवर त्यांना न विचारता लावण्यात येतात. यानंतर हे तिघे कशाप्रकारे लढा देतात याची गमतीशीर गोष्ट म्हणजे पोश्टर बॉइज्.
       कुलकर्णी मास्तर मुलांना त्सुनामी शिकवत असताना त्यांची बायको शाळेत येऊन मी घर सोडते आहे असे सांगते हा प्रसंग तसेच जगन आबा एका मातारीला आजीबाई म्हणतात तेव्हाचा प्रसंग अशा  कथेतील विनोदाच्या पेरणीमुळे चित्रपट पाहताना आपल्याला कंटाळा येत नाही. दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. या चित्रपटात सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो अनिकेत विश्वासराव. गावातील अवली पण तितकाच हळव्या मनाचा तरुण   त्याने ज्याप्रकारे साकारला आहे त्याला तोड नाही. नेहा जोशीने साकारलेली मास्तरची भांडखोर बायको, अर्जुनची कल्पु डार्लिंग असलेली पुजा सावंत, यांनी आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे. उद्य सबनीस,भारत गणेशपुरे,नेहा बुगडे आणि इतर कलाकारांनी  चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
       अशा चित्रपटाची निर्मिती करण्याच धाडस श्रेयस तळपदेने दाखवले याबद्दल त्याचेही कौतुक. पुष्पांक गावडेच्या सिनेमॅटोग्राफीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. लेझी यांच्या संगीतही चित्रपटास साजेस आहे. चित्रपटाचे प्रमोशनल साँग तर सर्वांच्या ओठावर रुळल आहे. क्षण हे आणि देवा देवा ही गाणीसुध्दा श्रवणीय आहेत. एकंदर तद्दंन चित्रपटापेक्षा काहीसा वेगळा विषय आणि त्याची विनोदी पध्दतीने केलेली हाताळणी यामुळे पोश्टर बॉइज् नक्कीच स्मरणीय ठरतो.