रविवार, ३ जुलै, २०२२

*महिला हॉकी विश्वचषक २०२२*

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची चर्चा सर्व भारतीयांमध्ये असते. आपण सर्व फुटबॉल विश्वचषक ही आवर्जून पाहतो त्यासाठी जागरण ही करतो. महिला हॉकी विश्वचषकाची तशी फारशी चर्चा माध्यमांमध्ये नाही आणि सामान्य क्रिडा प्रेमींमध्ये ही नाही ही खंत वाटते.  स्पेन आणि नेदरलँड्स येथे १ जुलै पासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली असून आज महिला भारतीय महिला हॉकी संघ इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहेत.  हॉकी म्हटले की *चक दे इंडिया* हा चित्रपट आठवतो त्या चित्रपटातील संघानेही जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकला होता आता ही संधी प्रत्यक्षात भारतीय संघाला आहे.

गेल्यावर्षी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत हॉकीला नवसंजीवनी दिली त्याच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय महिला हॉकी संघाने अविश्वसनीय कामगिरी  करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकाच्या जवळ आले असताना ग्रेट ब्रिटनविरुध्द अटीतटीच्या लढतीत ३-४ असा पराभव झाला. मात्र राणी रांमपालाच्या नेतृत्वाखाली महिला संघाने केलेली कामगिरी अद्भुत होती. प्रधानमंत्री मोदींपासून सर्वसामान्य भारतीयांनी त्याचे कौतुक केले होते.

या विश्वचषकामध्ये गोलरक्षक सविताच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून ऑलिम्पिक सारखी अथवा त्यापेक्षा चांगली कामगिरी त्यांनी करावी याकरिता मनःपुर्वक शुभेच्छा. आपली जबाबदारी ही आहे की आपण सर्वांनी भारतीय संघाला पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक सामन्याचे प्रसारण हे Star sports आणि Hotstar द्वारे केले जाणार आहे त्यावर आपणास सर्व सामने पाहता येईल आणि आपल्या भारतीय महिला हॉकी संघास पाठिंबा देता येईल.
भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकावा हीच इच्छा.

चक दे इंडिया 🇮🇳🇮🇳

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

महिलांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा 'झिम्मा'

 


आपण नेहमी बॉलिवूडमध्ये मल्टीस्टार एक्टर्सचा               (अभिनेत्यांचे)  चित्रपट पाहतो पण मराठी मध्ये मल्टीस्टार अभिनेत्रींना एकत्र घेऊन झिम्मा हा चित्रपट केला जातो आणि हा चित्रपट कोविड काळात ५० टक्के प्रेक्षक संख्या असतानाही  बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो यावरुनच जर आशय चांगला असेल तर तो चित्रपट चालतो हे मराठी प्रेक्षकांनी पुन्हा सिध्द केले आहे. आजच ॲमेझॉन प्राईमवरही हा चित्रपट रिलीज झाला आहे.  चित्रपटात ची कथा ही वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या महिला युके ( ब्रिटन) टूरवर जातात कोणी वयाने लहान, कोणी आजी अशा वेगवेगळ्या वयोगटातील या महिला आहेत त्यांचा स्वभावही वेगवेगळा पण कशा पद्धतीने त्या या ट्रीपचा आनंद घेतात. स्वातंत्र्य अनुभवतात. तसेच त्यांच्यामध्ये होणारे रुसवे-फुगवे कशा सोडवतात हे सर्व या चित्रपटात दाखवलेले आहे. 

सुहास जोशी,निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी,  मृण्मयी गोडबोले क्षिती जोग,सायली संजीव यांनी आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. सिध्दार्थ चांदेकरने साकारलेली 'गाईड'ची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेंनी छोट्या छोट्या प्रसंगांतून महिलांचे  व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर प्रकारे उलगडले आहे. पर्यटनावर चित्रपट असल्याने युकेतील महत्वाची पर्यटन स्थळे कॅमेराने छान टिपली आहेत. महिलांचे तेचतेच रडगाणे न दाखवता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा हा 'झिम्मा' पाहिलाच पाहिजे .

सोमवार, १० जानेवारी, २०२२

पूष्पा, फ्लावर नही फायर है फायर...


पूष्पाराज मै झूकेगा नही साला..., पूष्पा फ्लावर नही फायर है फायर, असे जबरदस्त डायलॉग आणि हे डायलॉग बोलणारा जर स्टाइलीश स्टार अल्लू अर्जून असेल तर प्रेक्षक हा चित्रपट डोक्यावरच घेणार यात शंका नाही. मसाला चित्रपटांमध्ये साऊथ सिनेमाच्या तोडीस तोड चित्रपट बनविणे महाकठिण आहे हे पूष्पाने पुन्हा सिध्द केले आहे.  लहानपणापासूनच दुजाभाव, अवहेलना मिळालेला पूष्पराज एका प्रसंगी  निर्णय घेतो की तो कोणासमोर झुकणार नाही. मोठा झाल्यावर पूष्पा ( अल्लू अर्जून) मजूर असला तरी राजासारखा राहतो. बुध्दीचा आणि शक्तीचा वापर करुन मालकासोबत भागीदार बनतो. त्यादरम्यान पूष्पाचे अनेक शत्रू तयार होतात त्यांना अद्दल घडवितो. श्रीवल्ली (रश्मिका) या मुलीवर प्रेम करतो साऊथच्या अनेक चित्रपटापणे यातही प्रेम करताना नायकाची स्टाईल वेगळी आहे. पूष्पाला प्रेम मिळते का? पूष्पा शत्रूंवर विजय मिळवून पूढे जातो का? हे सर्व चित्रपटांमध्ये पाहता येईल. 

अल्लू अर्जूनला पडद्यावर पाहणे, त्याचा डांन्स, एक्शन, बसण्याची स्टाईल सर्वच कमाल आहे. अनेक तरुणांची क्रश रश्मिकानेही चांगले काम केले आहे. नायकाचे विरोधक ही जबरदस्त आहेत. चित्रपटातील गाणी ही ठेका धरणारी आहेत.  शेवटी पूष्पामध्ये  पुढील भागासाठी काही प्रमाणात उत्सुकता निर्माण केली आहे.  चित्रपटातील सीन आणि कॅमेऱ्याची फ्रेम ही केमिस्ट्री जूळून आली आहे. यासाठी दिग्दर्शकाचे आणि सिनेमेटोग्राफरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पूष्पा अल्लू अर्जूनसाठी एकदा तरी पाहिलाच पाहिजे असा हा 'पैसा वसूल' चित्रपट आहे. कोणत्याही स्टारचा चित्रपट पहिल्या आठवड्यात जबरदस्त चालतो आणि नंतर कमाई कमी होते. पूष्पा मात्र पहिल्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आठवड्यात जास्त कमाई करुन फ्लावर नाही फायर ठरत आहे. अनेक बड्या चित्रपटांसमोर झुकतही नाही आहे. आम्ही मित्रांनी (नीरव, दर्शन, उत्कर्ष आणि मी) हा चित्रपट काल पाहिला. विशेष म्हणजे उत्कर्षने मोबाईलवर दोनदा पाहिल्यावरही थिएटर मध्ये पाहण्यासाठी आला. क्रेझ म्हणतात ती हीच.