मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सुवर्ण टेबल टेनिस.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

टेबल टेनिसमध्ये क्रांतीकारी सुवर्णपदके


तिरंग्यासहित भारतीय पुरुष संघ आणि प्रशिक्षक

सकाळी अटीतटीच्या उपांत्य फेरीत सिंगापूरविरुध्द २-२ अशी सामन्यांची बरोबरी झाली त्यावेळी भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू अचंता शरथकमले अंतिम सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाद्वारे 11-5,12-10,12-10 असा झुई पेंगवर विजय मिळवत भारतीय संघाला सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये स्थान मिळवून दिले.अंतिम सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळ करत नायजेरियाचा ३-० असा पराभव केला आणि तब्बल 12 वर्षानंतर टेबल टेनिसमध्ये  सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. .

पहिला सामना अंचता शरथ कमलने ३-०सरळ सेटमध्ये जिंकत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. युवा खेळाडू सवथीन गणशेखरने पुढील सामना ३-१ असा जिंकला. पुरुष दुहेरीत सवथीनसह हरमीत देसाईने नायजेरियन जोडी  विरुद्ध ३-० ने सामना जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. साखळी सामन्यामध्ये त्रिनिनाद टोबेगो, उत्तर आर्यलंड यांचा पराभव केला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुध्द विजय मिळविला होता. अमलराज आणि सनील शैटी या खेळाडूंनीही या सुवर्ण वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले. भारताचे इटालियन प्रशिक्षक मसीमो कोन्संटिनी यांचेही अभिनंदन.

सुवर्णपदकासहित महिला संघ

दोन दिवसात टेबल टेनिस हा भारतीयांसाठी सुवर्णपदक देणारा खेळ ठरला आहे.महिला संघाने सुवर्ण कामगिरी केल्या नंतर आज पुरुष संघाने सुवर्ण जिंकुन टेबल टेनिसच्या नव्या वाटचालीची सुरुवात केली आहे. वैयक्तिक टेबल टेनिस स्पर्धा अजून बाकी असून यातही आपले खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांच्या कामगिरीमुळे वाटत आहे.

टेबल टेनिस खेळामध्ये भारतीय खेळाडू  आहेत हे कालपर्यंत अनेकांना माहिती ही नसेल. काल महिलांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेकांनी स्टेटस, पोस्ट करत महिला संघाचे अभिनंदन केले आणि  आज भारतीय पुरुष टेबल टेनिसपटूंनी ही सुवर्णपदक जिंकून टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंची गुणवत्ता दाखवून दिली. या खेळाला दोन दिवसापासून मिळणारी लोकप्रियता अशीच वाढावी ही सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा