गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा, 2018

2018 गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा




     आजपासून सुरु होईल खेळांचा थरारपदक जिंकण्याकरिता खेळाडूंमधील संघर्षदेशाचा झेंडा डौलाने फडकविण्याकरिता खेळाडूंकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल. ऑलंम्पिक नंतर सर्वात जास्त देशांचा समावेश असणारी राष्ट्रकुल स्पर्धेचे काल गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे उद्घाटन झाले. 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा होणार आहे.  भारताचा ध्वजासहित पी.व्ही. सिंधूने दिमाखात ध्वजसंचलन केले. सर्व भारतीय खेळाडूही उत्साहात या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचा इतिहास, राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा आणि भारताची कामगिरी, 2018 स्पर्धा आणि भारत यासंबधी घेतलेला आढावा.


राष्ट्रकुल क्रिडा  स्पर्धेचा इतिहास



     राष्ट्रकुल म्हणजे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांची संघटना. ज्या देशांवर ब्रिटीशांनी राज्य केले अशा सर्व देशांचा समावेश या राष्ट्रकुल संघटनेत होतो. 1911 साली लंडन येथे ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील काही देशांची क्रिडा स्पर्धा पार पडली मात्र 1930 साली हेमिल्टनकॅनडा येथे झालेली स्पर्धा ही अधिकृत पहिली स्पर्धा म्हणून मान्यता दिली गेली. या क्रिडा स्पर्धेमध्ये भारताने मात्र स्वातंत्र्यानंतर 1954 साली ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा येथील स्पर्धेत प्रथम सहभाग घेतला. इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांचाच या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. मात्र गेल्या दशकापासून भारतानेही या स्पर्धेत पदकांची लयलटू केली आहे. मातब्बर देशांना टक्कर दिली आहे.

दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा

     2010 साली दिल्ली येथे झालेली राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिडा क्षेत्रातील नवा अध्याय आहे. 1982 मध्ये झालेल्या आशीयाई स्पर्धेनंतर भारतात झालेली ही मोठी स्पर्धा होती. तब्बल 28 वर्षानंतर भारतात झालेल्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन भारताने जबरदस्त केले. भ्रष्टाचाराच प्रकरण या राष्ट्रकुलमुळे पुढे आले हे खर मात्र या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपल्या घरच्या प्रेक्षकांच्यासमोर खेळण्याची संधी मिळाली खेळाडूंनी या संधीच सोन करत तब्बल 100 पदक जिंकत भारताला पदकतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करुन दिले. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकतालिकेत भारताने दुसरे स्थान प्राप्त केले होते. या स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंची विशेष तयारी केली गेली. त्याचा परिणाम राष्ट्रकुल स्पर्धेत दिसलाच मात्र त्यानंतर झालेल्या आशियाई स्पर्धा आणि 2012 लंडन ऑलंम्पिकमध्येही पदक जिंकलेल्या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. खेळाडूंच्या विकासाकरिता आणि खेळाचे वातावरण तयार करण्याकरिता अशा राष्ट्रकुल अथवा आशियाई स्पर्धांचे आयोजन देशात होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या राष्ट्रकुल स्पर्धेचे आणि दक्षिण कोरिया, चीन, जपान आशियाई क्रिडा स्पर्धेचे आयोजन दर दशकात एकदा तरी करतातच. याबद्दल नक्कीच सरकारला विचार करण्याची गरज आहे.

भारताच्या दृष्टीने 2018 राष्ट्रकुल स्पर्धा
     
     या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन यशस्वी करुन ऑस्ट्रेलिया बॉल टॅपरिंगमुळे निर्माण झालेला क्रिडा क्षेत्राबद्दल अविश्वास, निराशा दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची आहे कारण बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी,  या खेळांमध्ये भारतीयांची कामगिरी चांगली होत आहे त्याच फलित या स्पर्धेत पदकांमध्ये मिळाव ते सुवर्णपदक असाव ही अपेक्षा क्रिडाप्रेमींची आहे. वेटलिंफ्टिग, नेमबाजी  या स्पर्धेत भारताची जमेची बाजू आहे. आताच लेख लिहित असतानाच गुरुराजा याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत भारताचे खाते उघडले आहे. त्यामुळे वेटलिफ्टिंर्स आणि नेमबाज भारताला विजयपथावर ठेवतील यात शंका नाही. एथलॅटिक्स, जलतरण या स्पर्धा सर्वात जास्त पदक असणारे क्रिडाप्रकार आहेत. मात्र भारताला या दोन्ही प्रकारात घवघवीत यश मिळाले नाही. एथलॅटिक्समध्ये मिल्खा सिंग, पी.टी.उषा यांनी भारताला गौरवांन्वित केले आणि दिल्लीतील स्पर्धेत काहीसे चांगले यश एथलॅटिक्समध्ये संपादन केल मात्र इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही.  या स्पर्धेत विश्व विक्रम करणाऱ्या उदयोन्मुख भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.जलतरणात वीरधवल खाडेकडून आशा आहे मात्र जलतरण तर इतर क्रिडाप्रकारापेक्षा फारच मागे पडला आहे हे भारतीय क्रिडा क्षेत्राच वास्तव आहे. या दोन्ही क्रिडाप्रकाराचा विकास होणे अतंत्य गरजेचे आहे. त्याकरिता या दोन्ही प्रकाराकरिता वेगळ धोरण क्रिडा मंत्रालयाने आखले पाहिजे. 


     पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कदंम्बी श्रीकांत, गगन नारंग,जीतू राय, हिना सिंधू, शरथ कमल (टेबल टेनिसपटू), सुशील कुमार, मेरी कॉम हे प्रमुख खेळाडू क्रिडास्पर्धेत सहभागी झालेल्या 218 खेळाडूंच्या भारतीय चमूला सुर्वणपथ दर्शक आहेत.   या स्पर्धेत अनेक नवे पदकविजेते स्टार भारताला मिळतीलच. सांघिक प्रकारात महिला आणि पुरुष हॉकी संघाने आशियाई चषक जिकंल्यानंतर या स्पर्धेतही आपली विजयी घौडदौड कायम राखणे गरजेचे आहे. स्वाक्श, टेनिसमध्येही भारताला नेहमी यश मिळाले आहे ते यश या स्पर्धेत मिळाव.  जिमनॅस्टीकमध्ये दीपा कर्माकर नसल्याने तिची कामगिरी पाहता येणार नाही ही सल क्रिडाप्रेमींना असेल मात्र तिच्या ऑलंम्पिकमधील अतुलनीय कामगिरीमुळे  जिमनॅस्टीकला लोकप्रियता मिळालीच तसच जिमनॅस्टीकला नवचैतंन्य मिळाल. त्यामुळे जिमनॅस्टीकमधील इतर खेळाडूंच्या कामगिरीकेडे लक्ष असेल. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील कामगिरी ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांचा विचार करता महत्वाची ठरणार आहे. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत  2014 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील 64 पदकसंख्येपेक्षा आपल्या देशाची पदकसंख्या नक्कीच जास्त असेल असा क्रिडाप्रेमी म्हणून खेळाडूंवर विश्वास आहे. आता दहा दिवस आपण या क्रिडा स्पर्धेचा आनंद लुटुया आणि भारतीयांच्या घवघवीत यशाकरिता शुभेच्छा आणि पाठिंबा देऊयात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा