गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

महाराष्ट्रातील रणसंग्राम

                                        




        महाराष्ट्रामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेली १५ दिवस प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रभर उडला होता. दिल्ली पासून गल्लीपर्यंत सर्व राजकीय पुढारी या निवडणूकीत कार्य़रत होते. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याच्या भष्टाचारी कारभारामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरुध्द असंतोष होता त्यामुळे या निवडणूकीत भाजप शिवसेनेच्या बाजूने जनतेचा कौल होता हे लोकसभेतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाने स्पष्ट झाले होते. भाजप शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन अनेक दिवस वादावादी सुरु होती. अखेर भाजपाने शिवसेनेशी काडीमोड घेत तब्बल २५ वर्षापासुन असलेली ही युती संपुष्टात आली. त्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भुकंप घडवून आणला. महाराष्ट्राने गेली काही वर्षे पाहिलेली आघाडी आणि युतीचे राजकारण एका दिवसामध्ये पालटले. मनसेही शहरी भागात यश मिळवू शकत असल्याने महाराष्ट्रातमध्ये पहिल्यांदाच पंचरंगी निवडणुका झाल्या.

गरज सरो वैद्य मरो
          वरील म्हणीप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भुमिका घेतली. २५ वर्षे हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र असणारे भाजप शिवसेना या पक्षांमध्ये अनेकदा वाद झाले परंतु युतीत कधी बेबनाव दिसला नव्हता मात्र लोकसभेतील एकहाती सत्तेनंतर भाजपाने शिवसेनेला दिलेले कमी महत्वाचे मंत्रीपद वारंवार दिलेली कमीपणाची वागणूक यामुळे शिवसेना अस्वस्थ होती. नरेंद्र मोदीची लाट असल्याने भाजपाने शिवसेनेकडे विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी केली अवाजवी जागा मागितल्याने शिवसेनेनेही त्या मागणीस विरोध केला. त्यानंतर चर्चेचे गुऱ्हाळ अनेक दिवस सुरु होत आणि शेवटी भाजपाने शिवसेनेशी युती तोडली ज्या भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बोट धरुन पाय रोवले त्यांनी आता शिवसेनेलाच दुर सारले आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेली १५ वर्षे काँग्रेसबरोबर राज्यकारभार केला मात्र लोकसभेतील पराभव आणि जनतेमधील असंतोषाची भावना यामुळे काँग्रेसला टार्गेट करत आघाडीतून बाहेर पडत वेगळा रस्ता धरला. जरी आम्ही सत्तेत होतो तरी आम्ही विकासाचाच प्रयत्न केला मात्र काँग्रेसमुळेच राज्याचा विकास होऊ शकला नाही असा प्रचार राष्ट्रवादीला यामुळे करता आला यावरुनच राष्ट्रवादीचा संधीसाधुपणा दिसुन येतो.


प्रचाराची रणधुमाळी
           प्रचारातही राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेख केली. कोणी अफजलखानाच्या फौजा, पहाड का चुहा, अर्धे चड्डीवाले अशी खालच्या दर्जाची टिका या निवडणूकीत झाली. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट, मनसेची ब्लू प्रिंट भाजपाचे दृष्टीपत्र आणि काँग्रेस, ऱाष्ट्रवादीने जाहीरनामा काढुन जनतेला आश्वासन दिले खरे मात्र यावर चर्चा न होता एकमेकांची उणीधुणी काढण्यातच राजकीय पक्ष मग्न होते. आठवलेंच्या कविता आणि राज ठाकरेंच त्यास प्रत्युत्तर देण यातही जनतेच राजकीय मनोरंजनच झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षरश पुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला. अमेरिकेचा दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी गेले १५ दिवस महाराष्ट्रातच मुक्कामाला होते. एखाद्या पंतप्रधानाने विधानसभेसाठी तब्बल २७ सभा घेणे हे इतिहासात प्रथमच होत होते.  प्रदेश भाजपने जणू नरेंद्र मोदी नामाचा जपच केला. सीमेवरील गोळीबार हुडहुड वादळ अशा राष्ट्रीय समस्यांवरुन इतर पक्षांनी पंतप्रधानांवर जोरदार टिका केली.
         शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि त्यातच भाजपाने युती तोडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याच्यासाठी ही निवडणुक म्हणजे राजकीय कसोटीच आहे. प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. भाजपाविषयी असलेला असंतोष त्यानी प्रचारातुन व्यक्त करत भाजपालाच क्रमांक एकचा शत्रु मानले. या निवडणुकीत मोदी लाट थोपवून महाराष्ट्रात शिवसेना भाजपपेक्षा वरचढ असावी हेच त्यांच्यासमोरील मुख्य ध्येय आहे.
लोकसभेतील पराभवातून काँग्रेस, राष्ट्रवादी अजून सावरले नाहीत असेच या दोन्ही पक्षांच्या प्रचारातून दिसून येत होते. पराभवाची मानसिकताच घेऊन हे पक्ष निवडणूकीत उतरले आहेत असे नेत्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. महाराष्ट्राचे राजकारणावर पकड असलेले शरद पवारही निवडणूकीनंतरच्या बेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी किंगमेकर ठरु शकते याकडे लक्ष ठेऊन आहेत असे त्यांच्या भाजप शिवसेनेसंबधी विधानातून स्पष्ट होत होते. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती तरी ही गर्दी मतांमध्ये किती परावर्तित होईल यावरच मनसेची राजकीय घौडदौड अवलंबून आहे.

धक्कादायक निकालांची शक्यता
       पंचरंगी निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनां उमेदवार उभे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. या निवडणूकीत राजकीय पक्षांना कोण किती पाण्यात आहे याचा अंदाजही येईल. जनेतेलाही युती आणि आघाडीचे सरकार न देता कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता देण्याची संधी लाभली आहे. जनतेचा कौल मतपेटीत बंद झाला आहेत. अनेक सर्वेक्षणातून भाजप एकहाती सत्ता मिळवले असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. माध्यमांच्या सर्वेक्षण हे तंतोतंत खरे ठरेल असे नाही कारण पंचरंगी निवडणूका असल्याने प्रत्येक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत आणि जिंकून येणाऱ्या उमेदवारचे मताधिक्य हे फार थोड असेल त्यामुळे आताही अंदाज बांधणे कठीण आहे. कल जरी भाजप शिवसेनेच्या बाजूने असला तरी राज्यात अनेक धक्कादायक निकालांची शक्यता आहे आणि अनेक भाकित या निवडणूकीत खोटी ठरतील असे मला वाटते. आता फक्त १९ तारखेचीच प्रत्येकाला आस लागली आहे. बघुया भविष्यात काय दडले आहे ते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा