बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

भारतीय हॉकीला नवसंजीवनी


           गेल्या शनिवारी इन्चॉन आशियाई खेळांची सांगता झाली. या स्पर्धेत चीनने नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखत ३५० पदकांची कमाई केली. जपान, यजमान दक्षिण कोरिया या देशांनीही स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. भारताने ११ सुवर्णासहित ५७ पदकांची कमाई केली. गेल्या आशियाई खेळांच्या तुलनेत ही कामगिरी कमी असली तरी या स्पर्धेतून अनेक नवे क्रिडापटूं भारतास मिळाले, कबड्डी, नेमबाजी, टेनिस,अॅथलेटिक्स या खेळांमध्ये खेळाडूंनी साजेशी कामगिरी केली . मात्र काही क्रिडा प्रकारात खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागला. या आशियाई खेळांमुळे स्कॉश. तिरंदाजीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमठवला. या खेळामध्ये वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला पराभूत करत  सुवर्णपदक जिंकत  खऱ्या अर्थाने हॉकीला नवसंजीवनी दिली आहे त्यामुळेच या य़शाच महत्व वेगळ आहे. ह़़ॉकी संघाने १६ वर्षानंतर सुवर्णपदक जिकले आणि २०१६ अॉलिम्पिक खेळांमध्ये प्रवेशही निश्चित केला.
         भारतीय ह़़ॉकी संघावर खराब कामगिरीमुळे नेहमीच टीका केली जात होती. राष्ट्रीय ह़ॉकी संघटनेमध्ये असणारे वाद, ह़़ॉकी हा भारताचा  राष्ट्रीय खेळ असूनही सरकार दरबारी ह़ॉकी खेळाप्रती असलेली उदासिनता, यामुळे भारतीय ह़ॉकी संपली असेच वाटत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी संघाने आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.   प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी  हॉकीपटूंनी केली आहे.

         अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू असा आत्मविश्वास स्पर्धेपूर्वीच हॉकीपटूंनी वक्त केला होता आणि त्यानी तो सार्थ ठरवला. सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अाशियाई स्पर्धेत उपांत्यफेरीत दक्षिण कोरियाचं अाव्हान १-० असे परतवले. साखळी सामन्यात पाकिस्तान विरुध्द भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी अंतिम सामन्यात भारताला मिळाली होती आणि या संधीचे सोने करत हॉकी संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. अनुभवी सरदार सिंग, गोलकिपर श्रीजेश, बिरेंदर लाक्रा, रघुनाथ  अाणि नव्या दमाचे अाकाशदिप सिंग,मनप्रीत सिंग, कोठाजित सिंग यांची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनिय होती एकंदर गेल्या काही वर्षापासून  पूर्ण हॉकी संघच फार मेहनत करत आहे या मेहनतीचे फळ हे आशियाई खेळामध्ये मिळाले,
        भारतीय हॉकीचा इतिहासच गौरवशाली आहे.हॉकीचे जादुगर ध्यानंचंद यानी हॉकीला खरा सुवर्णकाळ मिळवून दिला.  तब्बल ८ वेळा आलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी हॉकी संघाने केली आहे. अॉलंम्पिकमध्ये भारत आणि हॉकीचे सुवर्णपदक हे जणू समीकरणच होत. १९७५ मध्ये मलेशियात अजितपाल सिंग याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकत हॉकीला यशोशिखर मिळवून दिले. लहान लहान पास अाणि खेळातील प्रचंड वेग हे भारतीय हॉकीची वैशिष्टय होती.   १९८० पर्य़ंत भारतीय हॉकीचा दबदबा होता. भारतीयांमध्ये हॉकी सर्वात लोकप्रिय खेळ होता.
        १९८२ मध्ये दिल्ली येथे आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये भारत आणि पाकिस्तान असा अंतिम सामना रंगला त्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताला ७-१ ने हरवून जणू भारतीय हॉकीचा धज्जा उ़डविला. या मानहानिकारक पराभवामुळे भारतीय हॉकीची लोकप्रियता प्रचंड घसरली, हॉकी संघावर प्रचंड टिका झाली या पार्श्वभुमीवर आधारित चक दे इंडिया हा चित्रपट आहे. त्यावेळीचे गोलकिपर मीररंजन नेगी यांची भुमिका शाहरुख खानने साकारली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्यामुळे क्रिडारसिंकाना क्रिकेटने आकर्षित केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय हॉकीला उतरती कळा लागली.
      त्यानंतर हॉकीमध्ये भारताची कामगिरी खालावतच गेली. त्यात  ह़ॉकीचा चेहरामोहरा बदलला हॉकी अस्ट्रोटर्फ मैदानावर खेळली जाऊ लागली त्यामुळे अनेक युरोपियन देशांनी या नव्या हॉकीशी जुळवून घेतले मात्र भारतीय हॉकीचा पायाच मुळात मैदानावर असल्याने भारतीय हॉकी या नव्या हॉकीशी लवकर समरस झाली नाही. ९०च्या दशकात धनराज पिल्लेंच्या रुपाने भारतीय हॉकीला नवा स्टार मिळाला. धनराज पिल्लेंच्या नेतृत्वाखाली हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत असतानाच हॉकी प्रशासनाने राजकारण करीत धनराज पिल्लेसारख्या खेळाडूचे करियरच संपविले. २००८ च्या बिजींग अॉलंम्पिकमध्ये भारत प्रवेशही करु शकला नाही याघटनेमुळे भारतीय हॉकीचं संपली अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येऊ लागली.

         गेल्या दोन-तीन वर्षात भारतीय हॉकी संघाने चांगली कामगिरी केली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई चषकातील उपविजेतेपद अाणि आता आशियाई  खेळांमध्ये सुवर्णपदकासहित अ़ॉलंम्पिक प्रवेश यामुळे भारतीय हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. य़ा भारतीय संघाक़डून लोकांना फार अपेक्षा आहेत.  कारण हॉकीशी भारतीयांचे भावनिक नाते आहे कितीही झाले तरी लोक हॉकी खेळांमध्य भारतीयांना आपलेपण वाटते. भारतातील हॉकीचे चाहते हे दर्दी आहेत. भारतीय हॉकीचे गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास आताच्या संघात आहे. या यशाने हुरळून न जाता दोन वर्षानंतर येणाऱ्या अॉलंम्पिकसाठी योग्य नियोजनपूर्वक प्रयत्न आतापासून सुरु करायला हवेत. भारतीय ह़ॉकी आणि युरोपियन हॉकीचा ताळमेळ घालता गेला तर् नक्कीच हा भारतीय संघ २०१६ रियो अॉलंम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल आणि भारतीय हॉकीला गतवैभव प्राप्त करुन देईल यात शंका नाही


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा