मंगळवार, १० एप्रिल, २०१८

बॅडमिटंन मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

आज बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकत. बॅडमिंटनचा नवा अध्याय लिहिला आहे. गोपीचंद  यांनी तयार केलेल्या या परिपूर्ण संघात सर्वच खेळाडू सरस आहेत. वैयक्तिक प्रकारात सायना, सिंधू, कदंम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यम, एच एस प्रणॉय तर दुहेरीत अश्विनी पोनप्पा हे यशस्वी कामगिरी करत होतेच मात्र आज संघ म्हणून देशाकरिता ऐतिहासिक कामगिरी करुन बॅडमिंटनमधील प्रत्येक प्रकारात भारत यश संपादन करु शकतो हा विश्वास जागृत केला आहे.

साखळी सामन्यांपासून सुरु असलेली बॅडमिंटनमधील विजयी घौडदौड कायम ठेवत भारताने चारवेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मलेशियाचा पराभव केला. या विजयासह पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावले. अश्विनी पोनप्पा आणि 17 वर्षीय सात्विक रेड्डी यांनी पहिला सामन्यात 21-14, 15-21, 21-15 असा मलेशिय मिश्र दुहेरी संघाचा पराभव केला. तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवर असताना अश्विनी पोनप्पाने अनुभवाच्या जोरावर सत्विकसह या सामन्यात विजय मिळविला. कदंम्बी श्रीकांतने ऑलंम्पिक रौप्यपदक विजेता ली चाँग विरुध्द सामना 21-17,21-14 असा जिंकत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिल्यांदाच ली चाँग वीचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात युवा सात्विक रेड्डी आणि चिराग शेट्टीचा पुरुष दुहेरीत मलेशियन दुहेरी संघाने 15-21, 20-22 असा पराभव केला. दोन्ही भारतीय युवा खेळाडूंनी चांगला संघर्ष केला.


2-1 अशी स्थिती असताना भारताची फुलराणी आणि सर्वात अनुभवी खेळाडू सायनाने महिला ऐकेरीचा सामना 21-11, 19-21, 21-9 असा जिंकत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. पहिल्या गेममध्ये सायनाने शेवटचे 12 गुण थेट मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सायना आघाडीवर असताना मलेशियन सोनिया चेहने सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये 9-9 अशी बरोबरी असताना सायनाने आपला जादुई खेळ दाखविला. सायनाचा झंझावात एवढा होता की सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला 9 गुणानंतर एकही गुण प्राप्त करायला दिला नाही. सायनाचा तिसऱ्या गेममधील खेळ डोळ्याच पारणे फेडणारा होता. या तिसऱ्या गेमच्या विजयासह भारताने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

साखळी सामन्यात श्रीलंका, पाकिस्तानचा पराभव भारतीय संघाने केला. उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशिअस आणि उपांत्य फेरीत बलाढ्य सिंगापूरला भारतीय संघाने हरविले होते. रुत्विका गद्दे, प्रणव चोप्रा, एन सिक्कीरेड्डी, या खेळाडूंनी या सुवर्णवाटचालीत महत्वपूर्ण योगदान दिले. प्रणॉय कुमारसहित पी सिंधूचाही समावेश या संघात होता मात्र दुखापतीमुळे सांघिक सामने सिंधूने खेळले नाहीत. वैयक्तिक सामने उद्यापासून सुरु होत आहेत या सामन्या सर्व भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना शुभेच्छा.

सलाम बॅडमिंटन संघ.  प्रशिक्षक गोपीचंद  आणि मिश्र जोडीचे प्रशिक्षक किम टेन हर यांना सलाम. रंग दे तिरंगा. चक दे इंडिया.

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा, 2018

2018 गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा




     आजपासून सुरु होईल खेळांचा थरार, पदक जिंकण्याकरिता खेळाडूंमधील संघर्ष, देशाचा झेंडा डौलाने फडकविण्याकरिता खेळाडूंकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल. ऑलंम्पिक नंतर सर्वात जास्त देशांचा समावेश असणारी राष्ट्रकुल स्पर्धेचे काल गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे उद्घाटन झाले. 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा होणार आहे.  भारताचा ध्वजासहित पी.व्ही. सिंधूने दिमाखात ध्वजसंचलन केले. सर्व भारतीय खेळाडूही उत्साहात या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचा इतिहास, राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा आणि भारताची कामगिरी, 2018 स्पर्धा आणि भारत यासंबधी घेतलेला आढावा.


राष्ट्रकुल क्रिडा  स्पर्धेचा इतिहास



     राष्ट्रकुल म्हणजे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांची संघटना. ज्या देशांवर ब्रिटीशांनी राज्य केले अशा सर्व देशांचा समावेश या राष्ट्रकुल संघटनेत होतो. 1911 साली लंडन येथे ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील काही देशांची क्रिडा स्पर्धा पार पडली मात्र 1930 साली हेमिल्टन, कॅनडा येथे झालेली स्पर्धा ही अधिकृत पहिली स्पर्धा म्हणून मान्यता दिली गेली. या क्रिडा स्पर्धेमध्ये भारताने मात्र स्वातंत्र्यानंतर 1954 साली ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा येथील स्पर्धेत प्रथम सहभाग घेतला. इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांचाच या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. मात्र गेल्या दशकापासून भारतानेही या स्पर्धेत पदकांची लयलटू केली आहे. मातब्बर देशांना टक्कर दिली आहे.

दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा

     2010 साली दिल्ली येथे झालेली राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिडा क्षेत्रातील नवा अध्याय आहे. 1982 मध्ये झालेल्या आशीयाई स्पर्धेनंतर भारतात झालेली ही मोठी स्पर्धा होती. तब्बल 28 वर्षानंतर भारतात झालेल्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन भारताने जबरदस्त केले. भ्रष्टाचाराच प्रकरण या राष्ट्रकुलमुळे पुढे आले हे खर मात्र या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपल्या घरच्या प्रेक्षकांच्यासमोर खेळण्याची संधी मिळाली खेळाडूंनी या संधीच सोन करत तब्बल 100 पदक जिंकत भारताला पदकतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करुन दिले. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकतालिकेत भारताने दुसरे स्थान प्राप्त केले होते. या स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंची विशेष तयारी केली गेली. त्याचा परिणाम राष्ट्रकुल स्पर्धेत दिसलाच मात्र त्यानंतर झालेल्या आशियाई स्पर्धा आणि 2012 लंडन ऑलंम्पिकमध्येही पदक जिंकलेल्या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. खेळाडूंच्या विकासाकरिता आणि खेळाचे वातावरण तयार करण्याकरिता अशा राष्ट्रकुल अथवा आशियाई स्पर्धांचे आयोजन देशात होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या राष्ट्रकुल स्पर्धेचे आणि दक्षिण कोरिया, चीन, जपान आशियाई क्रिडा स्पर्धेचे आयोजन दर दशकात एकदा तरी करतातच. याबद्दल नक्कीच सरकारला विचार करण्याची गरज आहे.

भारताच्या दृष्टीने 2018 राष्ट्रकुल स्पर्धा
     
     या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन यशस्वी करुन ऑस्ट्रेलिया बॉल टॅपरिंगमुळे निर्माण झालेला क्रिडा क्षेत्राबद्दल अविश्वास, निराशा दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची आहे कारण बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी,  या खेळांमध्ये भारतीयांची कामगिरी चांगली होत आहे त्याच फलित या स्पर्धेत पदकांमध्ये मिळाव ते सुवर्णपदक असाव ही अपेक्षा क्रिडाप्रेमींची आहे. वेटलिंफ्टिग, नेमबाजी  या स्पर्धेत भारताची जमेची बाजू आहे. आताच लेख लिहित असतानाच गुरुराजा याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत भारताचे खाते उघडले आहे. त्यामुळे वेटलिफ्टिंर्स आणि नेमबाज भारताला विजयपथावर ठेवतील यात शंका नाही. एथलॅटिक्स, जलतरण या स्पर्धा सर्वात जास्त पदक असणारे क्रिडाप्रकार आहेत. मात्र भारताला या दोन्ही प्रकारात घवघवीत यश मिळाले नाही. एथलॅटिक्समध्ये मिल्खा सिंग, पी.टी.उषा यांनी भारताला गौरवांन्वित केले आणि दिल्लीतील स्पर्धेत काहीसे चांगले यश एथलॅटिक्समध्ये संपादन केल मात्र इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही.  या स्पर्धेत विश्व विक्रम करणाऱ्या उदयोन्मुख भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.जलतरणात वीरधवल खाडेकडून आशा आहे मात्र जलतरण तर इतर क्रिडाप्रकारापेक्षा फारच मागे पडला आहे हे भारतीय क्रिडा क्षेत्राच वास्तव आहे. या दोन्ही क्रिडाप्रकाराचा विकास होणे अतंत्य गरजेचे आहे. त्याकरिता या दोन्ही प्रकाराकरिता वेगळ धोरण क्रिडा मंत्रालयाने आखले पाहिजे. 


     पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कदंम्बी श्रीकांत, गगन नारंग,जीतू राय, हिना सिंधू, शरथ कमल (टेबल टेनिसपटू), सुशील कुमार, मेरी कॉम हे प्रमुख खेळाडू क्रिडास्पर्धेत सहभागी झालेल्या 218 खेळाडूंच्या भारतीय चमूला सुर्वणपथ दर्शक आहेत.   या स्पर्धेत अनेक नवे पदकविजेते स्टार भारताला मिळतीलच. सांघिक प्रकारात महिला आणि पुरुष हॉकी संघाने आशियाई चषक जिकंल्यानंतर या स्पर्धेतही आपली विजयी घौडदौड कायम राखणे गरजेचे आहे. स्वाक्श, टेनिसमध्येही भारताला नेहमी यश मिळाले आहे ते यश या स्पर्धेत मिळाव.  जिमनॅस्टीकमध्ये दीपा कर्माकर नसल्याने तिची कामगिरी पाहता येणार नाही ही सल क्रिडाप्रेमींना असेल मात्र तिच्या ऑलंम्पिकमधील अतुलनीय कामगिरीमुळे  जिमनॅस्टीकला लोकप्रियता मिळालीच तसच जिमनॅस्टीकला नवचैतंन्य मिळाल. त्यामुळे जिमनॅस्टीकमधील इतर खेळाडूंच्या कामगिरीकेडे लक्ष असेल. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील कामगिरी ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांचा विचार करता महत्वाची ठरणार आहे. या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत  2014 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील 64 पदकसंख्येपेक्षा आपल्या देशाची पदकसंख्या नक्कीच जास्त असेल असा क्रिडाप्रेमी म्हणून खेळाडूंवर विश्वास आहे. आता दहा दिवस आपण या क्रिडा स्पर्धेचा आनंद लुटुया आणि भारतीयांच्या घवघवीत यशाकरिता शुभेच्छा आणि पाठिंबा देऊयात. 

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

फुटबॉलचा नवा अध्याय




आजचा दिवस हा भारतीय फुटबॉलच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे. आज १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला भारतात सुरुवात होईल आणि भारतीय फुटबॉलच्या नव्या अध्यायास प्रारंभ होईल. पहिल्यांदाच फिफाची स्पर्धा भारतात होत आहे आणि स्पर्धबद्दल सरकार, क्रिडाप्रेमी आणि विशेषत युवकांमध्ये उत्सुकता आहे. या स्पर्धेची वातावरणनिर्मिती ही सरकारने शाळा, कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवून केली. या स्पर्धेचे महत्व सरकारने ओळखले याबद्दल सरकारचे कौतुक केले पाहिजे.


   भारतामध्ये फुटबॉल चाहते मोठ्या संख्येने आहेत त्यांना विश्र्वचषक म्हणजे एक पर्वणीच असेल. फुटबॉल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळ आहे. या खेळात भारत नेहमी पिछाडीवर राहिला आहे. या खेळात भारताला  पायाभरणी करण्याची नामी संधी म्हणजे हा युवा विश्र्वचषक.  या स्पर्धेमुळे युवकांना प्रेरणा मिळेलच पण महत्वाच म्हणजे या स्पर्धेतून भविष्यातील मेस्सी, नेयमार जन्माला येतात आणि यामुळे भारताचे भविष्यातील मोठे खेळाडू यास्पर्धेमुळे तयार झाल्यास नवल वाटायला नको. युवा विश्र्वचषक स्पर्धा ही फुटबॉलच्या विकासाची नांदी समजून भविष्यात फुटबॉल तळागाळातील मुलांपर्यंत पोहचला तर या स्पर्धेचे मोठे यश मानता येईल.
   पुढील २२ दिवस प्रत्येक संघ विश्र्वचषक जिकंण्याच्या इर्षेने मैदानावर उतरेल. या थराराचे साक्षीदार होऊया आणि भारतीय युवा संघाला विश्र्वचषक स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊया. काय माहित आपला भारतीय युवा संघ विलक्षण कामगिरी करुन देशाचा अभिमान वाढवेल. कारण खेळात काहीच अशक्य नाही.

चक दे इंडिया

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही ।

                         



ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही । अशी टायटल असणारी जाहिरात गेल्या महिन्याभरापासून स्टार स्पोर्ट्स चॅनलवर प्रक्षेपित होत आहे. खरच ऑलंम्पिकसे बडा कुछ हो ही नही सकता। जिथे जगभरातील मातब्बर खेळाडू इर्षेने जिद्दीने फक्त देशाची शान वाढविण्यासाठी संघर्ष करतात. जिथे येणारा प्रत्येक खेळाडू फक्त ऑलंम्पिकमध्ये पदक मिळाव हेच स्वप्न बघून जगत असतो.  ज्याठिकाणी नव नवे विश्वविक्रम रचले जातात. जिथे जात, धर्म, पंथ आड न येता फक्त गुणवत्तेला आणि प्रतिभेला जग सलाम करत ते ठिकाण म्हणजे ऑलंम्पिक.

आधुनिक ऑलंम्पिकचे जनक

 सर कुंबर्टिन या फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहास संशोधकास ग्रीसमधील इतिहासाच्या अभ्यासात  ऑलंम्पिक ही संकल्पना मिळाली. सर्व खेळांच्या स्पर्धा एकाच ठिकाणी होणे तेही इसवी सन पूर्व काळात  ही संकल्पनाच विलक्षण होती. या संकल्पनेने सर कुंबर्टिन भारावून गेले आणि सुरु झाला एक ध्यास तो म्हणजे जगभरातील सर्व देशांना एकत्र करुन पुन्हा ऑल्मंपिक चळवळ सक्रिय करायचा. १८९४ साली ऑलंम्पिक संघटनेची स्थापना करुन दोन वर्षाने १८९६ अथेन्स ऑलंम्पिक क्रिडा स्पर्धा भरविण्यात आली आणि इथूनच सुरुवात झाली ती आधूनिक ऑलंम्पिकची. सर कुंबर्टिन यांना आधूनिक ऑलंम्पिकचे जनक मानले जाते.

रिओ ऑलंम्पिक
     फुटबॉल साठी प्रसिध्द  असणाऱ्या आणि जिथे फुटबॉलचा देव ब्लॅक पर्ल जन्माला अशा ब्राझील देशात २०१६ ची ऑलंम्पिक स्पर्धा आजपासून सुरु होईल. अमेरिका, चीन, जपान भारतासह जगाच्या नकाशावर न दिसणारे देश या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक खेळाडू आपल्या जीवनातील सर्वोत्तम कामगिरी करिता तयार झाला आहे. वेध लागले आहेत फक्त केव्हा ऑलंम्पिक मशाल पेटविली जाते याचे आणि स्पर्धेला सुरुवात होते.

भारत आणि ऑलिंम्पिक
     आतापर्यंत भारतातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न फक्त ऑलंम्पियन होण्याचे होते पण बीजिंग आणि लंडन ऑलंम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेत कमालीचा बदल झाला आहे. आता प्रत्येक भारतीय खेळाडू हा पदक मिळविण्याच्या हेतूने रिओमध्ये दाखल झाला आहे. उद्घाटन सोहळ्यात जेव्हा अभिनव बिंद्रा भारतीय ध्वज डौलाने फडकवेल त्यासह ११८ जणांचा भारताचा आतापर्यंतचा मोठा चमू स्टेडियमवर येईल तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. जितू राय, योगेश्वर दत्त, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, दिपिका कुमारी या खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास हे खेळाडू भारताचे सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. अडथळ्यांची शर्य़त पार करुन सहभागी झालेला मल्ल नरसिंग यादव वर सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
     भारत आणि ऑलंम्पिक हॉकी सुवर्णपदक हे समीकरण होत मात्र मधल्या काळात भारतीय हॉकीची फार पिच्छेहाट झाली त्याच हॉकीमध्ये यावर्षी  ऑलंम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक मिळवून दिले जाईल असा अनेक क्रिडा रसिकांचा विश्वास आहे. जिमनॅस्टिक दिपा कर्माकर हिच्याकडून भारताला पदकाची उमेद आहे याव्यतिरिक्त अन्य खेळाडू ही त्यांच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करतील आणि देशाला पदक तालिकेत मानाचे स्थान मिळवून देतील अशी आशा आहे.

भावनात्मक उत्कंटा
     आजपासून उसेन बॉल्ट, मायकल फेल्पस यांच्या विक्रमांची चर्चा असेल. पदकांची लयलुट होईल. अनेक विक्रम मोडले जातील अनेक नवे ऑलंम्पिक विजेते जगाला मिळतील. अमेरिका आणि चीनमध्ये पदकतालिकेतील अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर असेल. पुढील १८ दिवस  ऑलंम्पिकमय जग पाहायला मिळेल. आम्हा भारतीयाचे कान लागून राहिले आहेत ते फक्त त्या खेळाडूंकडे ज्यांच्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर भारताचे राष्ट्रगीत ऑलंम्पिकमध्ये वाजविण्यात येईल आणि भारतीय खेळाडूंच्या सुवर्णपदाकाचा तो सुवर्ण क्षण अनुभवण्याकडे.

रविवार, ३ जानेवारी, २०१६

'नटसम्राट' असा नट होणे नाही।

                  



      नटसम्राट ही कुसुमाग्रजांची  एक अजरामर कलाकृती. त्या कलाकृतीवर आधारित जो चित्रपट मी आज पाहिला ‘नटसम्राट’ असा नट होणे नाही, तो चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभुती. या चित्रपटाने ह्रद्याला स्पर्श केला. नटसम्राटाच्या आयुष्याची ओढाताण नाटकच जो जगला त्याची होणारी फरफट हे चित्रपटातून दाखवल आहे. चित्रपटाची कथा, तांत्रिक बाजू उत्तम आहेत. पण जे काळजाला भिडतात आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात असे संवाद या चित्रपटात आहेत.  कोणी घर देता का घर, एका तुफानाला कोणी घर देता का ?  जगाव की मराव हा एकच सवाल आहे. तुम्ही नाटक घरी घेऊन आलात असे संवाद चित्रपटाला एका अद्भूत कलाकृतीकडे घेऊन गेले आहेत.  संवाद लेखक किरण यज्ञोपवती आणि अभिजीत देशपांडे यांना याचे श्रेय जाते.
     मेधा मांजरेकर, विक्रम गोखले यांनी आपल्या भूमिका अप्रतिम साकारल्या आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, अजित परब इतर कलाकारांनी अभिनयातून छाप पाडली आहे. ज्या विषयी बोलाव तेवढ थोड ते म्हणजे नाना. 'गणपतराव बेलवलकर' ही व्यक्तीरेखा त्यांनी जगली आहे. शब्द फेक, चेहऱ्यावरील भाव आणि प्रसंगानुरुप बदलणारी देहबोली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नाना अधिराज्य गाजवतात. या नटास खरच वंदन. दिग्दर्शक महेश माजंरेकरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. एका अजरामर नाटकाला एका अजरामर चित्रपटांमध्ये रुपांतरण केले आहे. नटसंम्राट या कलाकृतीला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नव्हे तर अश्रूंनी दाद दिली आहे . प्रेक्षकगृहात नावे पडेपर्यंत प्रेक्षक जागच्या जागी बसून राहतो. खरच शब्द अपूरे आहेत या कलाकृतीबद्दल बोलण्यासाठी शेवटी एवढच म्हणीन की, एका इतिहासाचे साक्षीदार होता आले हे आपले भाग्य आहे.
असा नट होणे नाही
असा नटसम्राट होणे नाही
अशी कलाकृती होणे नाही।


बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

क्यो की जिंदगी गुलजार है...






         गुलजार साहेब म्हणजे एक सदाबहार व्यक्तिमत्व, एक   गीतकार म्हणून त्यांचा झालेला परिचय.  परिचय, अंगूर या चित्रपटातून त्याच्या दिग्दर्शनाची छापही मनावर पडते. या वर्षीच त्यांचे काही कवितासंग्रह वाचनात आले. मकान ही कविता तर हद्याचा ठाव घेते. भावनांना गुलजारांच्या शब्दांची जोड मिळाली की त्या मनात खोलवर रुजतात. मानवी स्वभावाचे दर्शन ‘रावी के पार’ या कथासंग्रहातून होत. गेली अनेक वर्षे हा चिरतरुण कवी, गीतकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या जन्मदिनी काही पक्तीं सुचल्या त्या त्यांना समर्पित करतो. 
                  

प्यार हि जिंदगी का असली मतलब होता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
न धर्म मानता हु न जात सिर्फ इन्सानियत को मानता हू क्यो कि जिंदगी गुलजार है! 
उर्दू हिंदी पे दिलसे मोहोब्बत करता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !
हर पल नई उमंग दिलाता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
मेरे कलम से कुछ लिख पाता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !



सोमवार, १ डिसेंबर, २०१४

इंटरनेट एक व्यसन

आजच्या काळात सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत.मानवाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती केली. इंटरनेटमुळे तर माहितीचा  विस्फोट होऊन जगाचे  द्वारच खुले झाले आहे. कोणत्याही व्यक्तीस कुठल्याही स्वरुपाची माहिती  इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली.इंटरनेटमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. भारतात आर्थिक उदारीकरणानंतर इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले. या इंटरनेटच्या फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा वापर केला असता समतोल साधणे फार महत्वाचे आहे. त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच त्याप्रमाणे इंटरनेटचा जास्त वापर केल्यास त्याचे व्यसन लागू शकते.


       आजची तरुणाई हि फेसबुक वोट्सअपवर बिझी असते. या साईटचा वापर करताना  आसपासच्या जगाचे भानही त्यांना राहत नाही.इंटरनेटवर सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या साईटमध्ये पोर्नोग्राफिक साईटसचा समावेश होतो. या  पोर्नोग्राफिक साईटसवरील व्हिडियो पाहून अनेकवेळा तरुण वाईट मार्गी जातात. तरुणांमध्ये विकृती वाढण्याच्या कारणांत इंटरनेटचा समावेश होतो. 
घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट एडिक्शन' अर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे शहरातील मुलांचे प्रमाणही वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 'इंटरनेट'चा वाढता वापर चिंतेत भर घालणारी बाब असून, कम्प्युटर अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरुण मुले करतात कि आई वडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत.

  इंटरनेट व्यसनात गुरफटलेली ही मुले  खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहातात. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी/सत्याशी नातं तुटल्याने वा कमी झाल्याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात.कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या आजघडीच्या गंभीर समस्येला, गढुळलेले कौटुंबिक, सामाजिक स्तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. ‘इंटरनेट व्यसनाधीनता’ हे यातील एक महत्त्वाचं कारण!              


इंटरनेटचं व्यसन सोडवण्यासाठी मुक्तांगण


         जेव्हा कोणत्याही गोष्टीला भुलून त्याचा अतिरेक वापर केला जातो, तेव्हा खरी त्या गोष्टीच्या व्यसनाची सुरवात होते. पण आजच्या जगात दारू, तंबाखू, चरस, गांजा हेच फक्त व्यसन  राहील नाहीये. तर इंटरनेट ही व्यसनासारख वापरलं जावू लागलंय. अशाच इंटरनेट व्यसनी विद्यार्थी, आणि मोठ्या व्यक्तींसाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात इंटरनेट एडिक्शन सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.आजच प्रगत तंत्रज्ञान ज्या प्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे.तस्च ते त्यांच्यासाठी मारक बनत चालंल आहे. आजकाल टीव्ही, कम्प्युटर यांचा वाढता वापर. त्यात तासंन तास इंटरनेट, सोशल नेट वर्किंग साईट्स, गेम्स, पोर्न मुव्हीज, चॅटीगमुळे ते सतत त्यातच गढून राहातायेत..त्यांच्या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.        

दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते या गोष्टींसाठी घालवतात आणि दारू, तंबाखू, चरस गांजा यांसारख या इंटरनेटचं व्यसन जडवून घेतायेत. सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्हणजेच या महाजालात ते स्वत:ला अडकून घेतायेत. आजच्या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्यक्तींना व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केद्रात ही या वर्षभरात इंटरनेट एडीक्शनच्या ब-याच केसेस दाखल झाल्यात. यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं- मुलींच प्रमाण जास्त आहे.याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडील. ते घरात नसल्याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाही, आणि मग परिणामी ते या व्यसनाच्या आहारी जातात, अशा विद्यार्थ्यांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे मुक्तांगण मध्ये आता या व्यसनावरही उपचार आता देण्यात येत आहेत.
त्यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे की, आपल्या मुलाला. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्याला याच सगळ्याचं व्यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभ करायचं.