गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

महाराष्ट्रातील रणसंग्राम

                                        




        महाराष्ट्रामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेली १५ दिवस प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रभर उडला होता. दिल्ली पासून गल्लीपर्यंत सर्व राजकीय पुढारी या निवडणूकीत कार्य़रत होते. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याच्या भष्टाचारी कारभारामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरुध्द असंतोष होता त्यामुळे या निवडणूकीत भाजप शिवसेनेच्या बाजूने जनतेचा कौल होता हे लोकसभेतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाने स्पष्ट झाले होते. भाजप शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन अनेक दिवस वादावादी सुरु होती. अखेर भाजपाने शिवसेनेशी काडीमोड घेत तब्बल २५ वर्षापासुन असलेली ही युती संपुष्टात आली. त्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भुकंप घडवून आणला. महाराष्ट्राने गेली काही वर्षे पाहिलेली आघाडी आणि युतीचे राजकारण एका दिवसामध्ये पालटले. मनसेही शहरी भागात यश मिळवू शकत असल्याने महाराष्ट्रातमध्ये पहिल्यांदाच पंचरंगी निवडणुका झाल्या.

गरज सरो वैद्य मरो
          वरील म्हणीप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भुमिका घेतली. २५ वर्षे हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र असणारे भाजप शिवसेना या पक्षांमध्ये अनेकदा वाद झाले परंतु युतीत कधी बेबनाव दिसला नव्हता मात्र लोकसभेतील एकहाती सत्तेनंतर भाजपाने शिवसेनेला दिलेले कमी महत्वाचे मंत्रीपद वारंवार दिलेली कमीपणाची वागणूक यामुळे शिवसेना अस्वस्थ होती. नरेंद्र मोदीची लाट असल्याने भाजपाने शिवसेनेकडे विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी केली अवाजवी जागा मागितल्याने शिवसेनेनेही त्या मागणीस विरोध केला. त्यानंतर चर्चेचे गुऱ्हाळ अनेक दिवस सुरु होत आणि शेवटी भाजपाने शिवसेनेशी युती तोडली ज्या भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बोट धरुन पाय रोवले त्यांनी आता शिवसेनेलाच दुर सारले आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेली १५ वर्षे काँग्रेसबरोबर राज्यकारभार केला मात्र लोकसभेतील पराभव आणि जनतेमधील असंतोषाची भावना यामुळे काँग्रेसला टार्गेट करत आघाडीतून बाहेर पडत वेगळा रस्ता धरला. जरी आम्ही सत्तेत होतो तरी आम्ही विकासाचाच प्रयत्न केला मात्र काँग्रेसमुळेच राज्याचा विकास होऊ शकला नाही असा प्रचार राष्ट्रवादीला यामुळे करता आला यावरुनच राष्ट्रवादीचा संधीसाधुपणा दिसुन येतो.


प्रचाराची रणधुमाळी
           प्रचारातही राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेख केली. कोणी अफजलखानाच्या फौजा, पहाड का चुहा, अर्धे चड्डीवाले अशी खालच्या दर्जाची टिका या निवडणूकीत झाली. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट, मनसेची ब्लू प्रिंट भाजपाचे दृष्टीपत्र आणि काँग्रेस, ऱाष्ट्रवादीने जाहीरनामा काढुन जनतेला आश्वासन दिले खरे मात्र यावर चर्चा न होता एकमेकांची उणीधुणी काढण्यातच राजकीय पक्ष मग्न होते. आठवलेंच्या कविता आणि राज ठाकरेंच त्यास प्रत्युत्तर देण यातही जनतेच राजकीय मनोरंजनच झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षरश पुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला. अमेरिकेचा दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी गेले १५ दिवस महाराष्ट्रातच मुक्कामाला होते. एखाद्या पंतप्रधानाने विधानसभेसाठी तब्बल २७ सभा घेणे हे इतिहासात प्रथमच होत होते.  प्रदेश भाजपने जणू नरेंद्र मोदी नामाचा जपच केला. सीमेवरील गोळीबार हुडहुड वादळ अशा राष्ट्रीय समस्यांवरुन इतर पक्षांनी पंतप्रधानांवर जोरदार टिका केली.
         शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि त्यातच भाजपाने युती तोडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याच्यासाठी ही निवडणुक म्हणजे राजकीय कसोटीच आहे. प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. भाजपाविषयी असलेला असंतोष त्यानी प्रचारातुन व्यक्त करत भाजपालाच क्रमांक एकचा शत्रु मानले. या निवडणुकीत मोदी लाट थोपवून महाराष्ट्रात शिवसेना भाजपपेक्षा वरचढ असावी हेच त्यांच्यासमोरील मुख्य ध्येय आहे.
लोकसभेतील पराभवातून काँग्रेस, राष्ट्रवादी अजून सावरले नाहीत असेच या दोन्ही पक्षांच्या प्रचारातून दिसून येत होते. पराभवाची मानसिकताच घेऊन हे पक्ष निवडणूकीत उतरले आहेत असे नेत्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. महाराष्ट्राचे राजकारणावर पकड असलेले शरद पवारही निवडणूकीनंतरच्या बेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी किंगमेकर ठरु शकते याकडे लक्ष ठेऊन आहेत असे त्यांच्या भाजप शिवसेनेसंबधी विधानातून स्पष्ट होत होते. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती तरी ही गर्दी मतांमध्ये किती परावर्तित होईल यावरच मनसेची राजकीय घौडदौड अवलंबून आहे.

धक्कादायक निकालांची शक्यता
       पंचरंगी निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनां उमेदवार उभे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. या निवडणूकीत राजकीय पक्षांना कोण किती पाण्यात आहे याचा अंदाजही येईल. जनेतेलाही युती आणि आघाडीचे सरकार न देता कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता देण्याची संधी लाभली आहे. जनतेचा कौल मतपेटीत बंद झाला आहेत. अनेक सर्वेक्षणातून भाजप एकहाती सत्ता मिळवले असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. माध्यमांच्या सर्वेक्षण हे तंतोतंत खरे ठरेल असे नाही कारण पंचरंगी निवडणूका असल्याने प्रत्येक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत आणि जिंकून येणाऱ्या उमेदवारचे मताधिक्य हे फार थोड असेल त्यामुळे आताही अंदाज बांधणे कठीण आहे. कल जरी भाजप शिवसेनेच्या बाजूने असला तरी राज्यात अनेक धक्कादायक निकालांची शक्यता आहे आणि अनेक भाकित या निवडणूकीत खोटी ठरतील असे मला वाटते. आता फक्त १९ तारखेचीच प्रत्येकाला आस लागली आहे. बघुया भविष्यात काय दडले आहे ते...

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

भारतीय हॉकीला नवसंजीवनी


           गेल्या शनिवारी इन्चॉन आशियाई खेळांची सांगता झाली. या स्पर्धेत चीनने नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखत ३५० पदकांची कमाई केली. जपान, यजमान दक्षिण कोरिया या देशांनीही स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. भारताने ११ सुवर्णासहित ५७ पदकांची कमाई केली. गेल्या आशियाई खेळांच्या तुलनेत ही कामगिरी कमी असली तरी या स्पर्धेतून अनेक नवे क्रिडापटूं भारतास मिळाले, कबड्डी, नेमबाजी, टेनिस,अॅथलेटिक्स या खेळांमध्ये खेळाडूंनी साजेशी कामगिरी केली . मात्र काही क्रिडा प्रकारात खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागला. या आशियाई खेळांमुळे स्कॉश. तिरंदाजीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमठवला. या खेळामध्ये वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला पराभूत करत  सुवर्णपदक जिंकत  खऱ्या अर्थाने हॉकीला नवसंजीवनी दिली आहे त्यामुळेच या य़शाच महत्व वेगळ आहे. ह़़ॉकी संघाने १६ वर्षानंतर सुवर्णपदक जिकले आणि २०१६ अॉलिम्पिक खेळांमध्ये प्रवेशही निश्चित केला.
         भारतीय ह़़ॉकी संघावर खराब कामगिरीमुळे नेहमीच टीका केली जात होती. राष्ट्रीय ह़ॉकी संघटनेमध्ये असणारे वाद, ह़़ॉकी हा भारताचा  राष्ट्रीय खेळ असूनही सरकार दरबारी ह़ॉकी खेळाप्रती असलेली उदासिनता, यामुळे भारतीय ह़ॉकी संपली असेच वाटत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी संघाने आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.   प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी  हॉकीपटूंनी केली आहे.

         अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू असा आत्मविश्वास स्पर्धेपूर्वीच हॉकीपटूंनी वक्त केला होता आणि त्यानी तो सार्थ ठरवला. सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अाशियाई स्पर्धेत उपांत्यफेरीत दक्षिण कोरियाचं अाव्हान १-० असे परतवले. साखळी सामन्यात पाकिस्तान विरुध्द भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी अंतिम सामन्यात भारताला मिळाली होती आणि या संधीचे सोने करत हॉकी संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. अनुभवी सरदार सिंग, गोलकिपर श्रीजेश, बिरेंदर लाक्रा, रघुनाथ  अाणि नव्या दमाचे अाकाशदिप सिंग,मनप्रीत सिंग, कोठाजित सिंग यांची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनिय होती एकंदर गेल्या काही वर्षापासून  पूर्ण हॉकी संघच फार मेहनत करत आहे या मेहनतीचे फळ हे आशियाई खेळामध्ये मिळाले,
        भारतीय हॉकीचा इतिहासच गौरवशाली आहे.हॉकीचे जादुगर ध्यानंचंद यानी हॉकीला खरा सुवर्णकाळ मिळवून दिला.  तब्बल ८ वेळा आलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी हॉकी संघाने केली आहे. अॉलंम्पिकमध्ये भारत आणि हॉकीचे सुवर्णपदक हे जणू समीकरणच होत. १९७५ मध्ये मलेशियात अजितपाल सिंग याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकत हॉकीला यशोशिखर मिळवून दिले. लहान लहान पास अाणि खेळातील प्रचंड वेग हे भारतीय हॉकीची वैशिष्टय होती.   १९८० पर्य़ंत भारतीय हॉकीचा दबदबा होता. भारतीयांमध्ये हॉकी सर्वात लोकप्रिय खेळ होता.
        १९८२ मध्ये दिल्ली येथे आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये भारत आणि पाकिस्तान असा अंतिम सामना रंगला त्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताला ७-१ ने हरवून जणू भारतीय हॉकीचा धज्जा उ़डविला. या मानहानिकारक पराभवामुळे भारतीय हॉकीची लोकप्रियता प्रचंड घसरली, हॉकी संघावर प्रचंड टिका झाली या पार्श्वभुमीवर आधारित चक दे इंडिया हा चित्रपट आहे. त्यावेळीचे गोलकिपर मीररंजन नेगी यांची भुमिका शाहरुख खानने साकारली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्यामुळे क्रिडारसिंकाना क्रिकेटने आकर्षित केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय हॉकीला उतरती कळा लागली.
      त्यानंतर हॉकीमध्ये भारताची कामगिरी खालावतच गेली. त्यात  ह़ॉकीचा चेहरामोहरा बदलला हॉकी अस्ट्रोटर्फ मैदानावर खेळली जाऊ लागली त्यामुळे अनेक युरोपियन देशांनी या नव्या हॉकीशी जुळवून घेतले मात्र भारतीय हॉकीचा पायाच मुळात मैदानावर असल्याने भारतीय हॉकी या नव्या हॉकीशी लवकर समरस झाली नाही. ९०च्या दशकात धनराज पिल्लेंच्या रुपाने भारतीय हॉकीला नवा स्टार मिळाला. धनराज पिल्लेंच्या नेतृत्वाखाली हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत असतानाच हॉकी प्रशासनाने राजकारण करीत धनराज पिल्लेसारख्या खेळाडूचे करियरच संपविले. २००८ च्या बिजींग अॉलंम्पिकमध्ये भारत प्रवेशही करु शकला नाही याघटनेमुळे भारतीय हॉकीचं संपली अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येऊ लागली.

         गेल्या दोन-तीन वर्षात भारतीय हॉकी संघाने चांगली कामगिरी केली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई चषकातील उपविजेतेपद अाणि आता आशियाई  खेळांमध्ये सुवर्णपदकासहित अ़ॉलंम्पिक प्रवेश यामुळे भारतीय हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. य़ा भारतीय संघाक़डून लोकांना फार अपेक्षा आहेत.  कारण हॉकीशी भारतीयांचे भावनिक नाते आहे कितीही झाले तरी लोक हॉकी खेळांमध्य भारतीयांना आपलेपण वाटते. भारतातील हॉकीचे चाहते हे दर्दी आहेत. भारतीय हॉकीचे गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास आताच्या संघात आहे. या यशाने हुरळून न जाता दोन वर्षानंतर येणाऱ्या अॉलंम्पिकसाठी योग्य नियोजनपूर्वक प्रयत्न आतापासून सुरु करायला हवेत. भारतीय ह़ॉकी आणि युरोपियन हॉकीचा ताळमेळ घालता गेला तर् नक्कीच हा भारतीय संघ २०१६ रियो अॉलंम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल आणि भारतीय हॉकीला गतवैभव प्राप्त करुन देईल यात शंका नाही


शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

विजयीभव:



       आजपासून दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे आशियाई क्रिडा स्पर्धेस सुरुवात होत आहे. आशिया खंडातील ४५ देश या स्पर्धेत सामील होणार आहेत. ऑलंम्पिकनंतर महत्वाची स्पर्धा म्हणून आशियाई स्पर्धेकडे पाहिले जाते. १९५१ साली दिल्ली येथे पहिली आशियाई स्पर्धा पार पडली. इन्चॉन येथे होणारी ही १७ वी आशियाई स्पर्धा आहे. भारतातर्फे या स्पर्धेत ६८९ जणांचा चमू पाठविण्यात आला आहे. ३६ विविध खेळांमध्ये भारत सहभागी होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक असणार आहे हॉकी संघाचा कप्तान सरदार सिंग. ही हॉकीसाठी अभिमानाची बाब आहे.
       या स्पर्धेत प्रामुख्याने नेमबाजी, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती कबड्डी आणि हॉकी या खेळामध्ये भारताला पदकांची आशा आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जितू राय, अभिनव बिंद्रा,राही सरनोबत यांनी सुवर्णवेध घेतला होता त्यांच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताने नेहमीच पदकांची लयलुट केली आहे. २०१० ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत भारतीय अॅथलिटसनी ५ सुवर्णासहित अनेक पदके मिळवली होती यावेळी या पदकांमध्ये वाढ होइल व्हावी. तिरंदाजीत दिपिका कुमारी आणि इतर खेळाडू सुवर्णवेध करण्यास आतूर आहे. बॅडमिंटनमध्ये सायना,सिंधु आणि पी. कश्यपकडून पदकाची अपेक्षा आहे. स्टार बॉक्सर विजेंदर सिग याच्या अनुपस्थित बॉक्सिंगपटूही ‘ग्लोडन पंच’ देण्यास उत्सुक आहे. सुशील कुमार याने या स्पर्धेत माघार घेतली असली तरी योगेश्वर दत्तसह इतर कुश्तीपटू चीतपट करुन  सुशील कुमारची कमी जाणवू देणार नाही. स्कॉशमध्ये जोश्ना,दिपिका पल्लीकली याचां राष्ट्रकुलमधील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे. 
        प्रो कबड्डीमुळे कबड्डीला नवसंजीवनी मिळाली त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण जिंकू असा कबड्डीपटूंचा विश्वास आहे. कबड्डीमध्ये विशेष म्हणजे भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णच कामगिरी केली आहे. हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकविणारच आणि २०१६ च्या रियो ऑलंम्पिकचे टिकीट निश्चित करणार असा चंग हॉकी खेळाडूंनी बांधला आहे. महिला हॉकीकडूनही पदकाची अपेक्षा आहे.  स्टार टेनिसपटूंच्या गैरहजरीतही सानियाकडून पदकाची आस आहे. रोईंग, गोल्फ, बिलियर्ड या खेळांतूही भारतास पदक मिळू शकतात.
        स्पर्धेचा इतिहास पाहता चीन,जपान आणि दक्षिण कोरियाचे पदक तालिकेवर वर्चस्व असते. भारत पहिल्या दहामध्ये स्थान असते यावेळी मात्र एकंदर या स्पर्धेत पदकांची लयलूट करुन भारताने २०१४चे एशियाड गाजवावे  आणि पदकतालिकेत पहिल्या पाचात येऊन क्रिडा क्षेत्रात नवा अध्याय लिहावा हीच सामांन्य क्रिडा रसिकांची आशा आहे. तर चला या पुढील १५ दिवस या स्पर्धेचा आनंद लुटुया आणि खेळाडूंना प्रोत्साहित करुया... 

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

'पोश्टर बॉइज्' एक इरसाल ईनोदी सिनेमा





पोश्टर बॉइज् हा चित्रपट गेल्या आठवड्यात मित्रांसोबत पाहिला. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट पाहण्यसाठी चित्रपटगृहात गेलो. चित्रपटाची विषय मुळातच नसबंदी सारख्या गंभीर विषयावर असला तरी दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या समीर पाटील यांनी या विषयाला रंजक आणि विनोदी पद्धतीने सादर केला आहे. नसबंदीवर विनोद करताना तो विनोद कमरे खालचा होऊ न देता विनोदाची सीमारेषा जपली आहे याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला द्यावे लागेल. चित्रपटाची कथा एका गावातील जत्रेत सुरु होते. या जत्रेच्या आनंदानंतर गावचे प्रतिष्ठित गृहस्थ जगन देशमुख ( दिलीप प्रभावळकर), शाळा मास्तर सदानंद कुलकर्णी ( ऋषिकेश जोशी) आणि गावातला एक अवली तरुण अर्जुन जगताप(अनिकेत विश्वासराव) यांच्यावर जणु काही आभाळच कोसळते. जगन देशमुखांच्या मुलीचा साखरपुडा मोडतो, सदानंद कुलकर्णींची बायको घर सोडून जाते आणि अर्जुनचे लग्न मोडते. ही आफत कशामुळे ओढवली आहे याचा थांगपत्ता या तिघांनाही नसतो. ते या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की त्यांचे फोटो सरकारच्या बिनटाका नसबंदीच्या पोश्टरवर त्यांना न विचारता लावण्यात येतात. यानंतर हे तिघे कशाप्रकारे लढा देतात याची गमतीशीर गोष्ट म्हणजे पोश्टर बॉइज्.
       कुलकर्णी मास्तर मुलांना त्सुनामी शिकवत असताना त्यांची बायको शाळेत येऊन मी घर सोडते आहे असे सांगते हा प्रसंग तसेच जगन आबा एका मातारीला आजीबाई म्हणतात तेव्हाचा प्रसंग अशा  कथेतील विनोदाच्या पेरणीमुळे चित्रपट पाहताना आपल्याला कंटाळा येत नाही. दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. या चित्रपटात सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो अनिकेत विश्वासराव. गावातील अवली पण तितकाच हळव्या मनाचा तरुण   त्याने ज्याप्रकारे साकारला आहे त्याला तोड नाही. नेहा जोशीने साकारलेली मास्तरची भांडखोर बायको, अर्जुनची कल्पु डार्लिंग असलेली पुजा सावंत, यांनी आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे. उद्य सबनीस,भारत गणेशपुरे,नेहा बुगडे आणि इतर कलाकारांनी  चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
       अशा चित्रपटाची निर्मिती करण्याच धाडस श्रेयस तळपदेने दाखवले याबद्दल त्याचेही कौतुक. पुष्पांक गावडेच्या सिनेमॅटोग्राफीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. लेझी यांच्या संगीतही चित्रपटास साजेस आहे. चित्रपटाचे प्रमोशनल साँग तर सर्वांच्या ओठावर रुळल आहे. क्षण हे आणि देवा देवा ही गाणीसुध्दा श्रवणीय आहेत. एकंदर तद्दंन चित्रपटापेक्षा काहीसा वेगळा विषय आणि त्याची विनोदी पध्दतीने केलेली हाताळणी यामुळे पोश्टर बॉइज् नक्कीच स्मरणीय ठरतो.     

शनिवार, २८ जून, २०१४

करो या मरो...







                          आज उपउपांत्यपूर्व फेरीची   (प्री क्वाटर फायनल) सुरवात होणार आहे  फुटबॉल विश्वचषकाचा हा  उत्तरार्ध आहे. आता खऱ्या अर्थाने फुटबॉल विश्वचषकाला रंगत येईल कारण सर्वोत्तम सघ एकमेकांसमोर उभे टाकतील यामध्ये  जो जिंकेल तो पुढच्या फेरीत आणि ज्याच्या वाटी 'पराभव' तो परतीच्या वाटेवर. ३२ संघांपैकी १६ संघ या फेरीसाठी पत्र ठरले आहे.या विश्वचषकात पोर्तुगाल,स्पेन,इंग्लंड आणि इटली या दादा सघांवर साखळी फेरीतच गाशा गुडाळायची वेळ आली. कोस्टा रिका,चिली आणि अल्जेरिया या संघांनी नामी संघाना धक्का देत पहिल्यांदाच बाद फेरी गाठली आहे.
                         बाद फेरीचा पहिला सामना  यजमान आणि पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलचा गतविजेत्या स्पेनला धक्का देणाऱ्या चिलीशी होणार आहे. ब्राझीलच या सामन्यात पारड जड वाटत असल तरी जायंटकिलर चिली ला कमी लेखता येणार नाही.ब्राझीलच्या युवा फुटबॉलपटू नेयमारवर साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे नेयमार सध्या फोर्मात असल्याने त्याचाकडून चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.
                        दुसरा सामना आहे उरुग्वे आणि कोलंबियात  चावऱ्या  सुआरेझवर बंदी आणल्याने   उरुग्वे संघाची ताकद कमी झाली आहे याचा फायदा कोलंबिया उठवून अजून एक धक्का देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
                        आज पासून विश्वचषकातील रोमहर्षक आणि श्वास रोखून धरणाऱ्या लढतींना आरंभ होईल. त्यामुळे फुटबॉल रसिकांसाठी आजपासून प्रत्येक सामना महत्वाचा असेल यात काही शंका नाही. 

शनिवार, १७ मे, २०१४

अब अच्छे दिन आ गये है…





                                 

                      नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल आहे.गेल्या दहा वर्षात केलेले घोटाळे,भ्रष्टाचार यामुळे  काँग्रेसला जनतेने अस्मान दाखवले. नरेंद्र मोदींची  लाटही एवढी विशाल होती की कॉंग्रेसला पन्नाशीही पार करता आली नाही. तब्बल ७ राज्यांमध्ये भाजपने पूर्ण बहुमत  प्राप्त केले यावरूनच देशातील  वातावरण मोदींमय झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्रामध्ये महायुतीने  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्याचीत केले. सत्तेची आणि पैशाची मस्ती चढलेल्या बड्या नेत्यांना  लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. यावेळी देशात आणि  महाराष्ट्रात इतर कोणताही फॅक्टर चालला नाही इथे फक्त मोदी  फॅक्टर चालला त्यामुळे या  निवडणूक निकालावरून अस वाटत आहे कि  अब अच्छे दिन आ गये है…  

सोमवार, २४ मार्च, २०१४

आज लागी लागी नई धूप










               'आखो देखी' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता. ट्रेलरवरूनच हा चित्रपट वेगळा असेल असे वाटत होते आणि आज हा चित्रपट पाहिल्यावर खरच या चित्रपटाची वाट वेगळी आहे. आपण अनेक चित्रपट रोज पाहतो परंतु आखो देखी सारखे अंतर्मुख करणारे चित्रपट फार कमी असतात. दिल्लीतील एकत्र कुटुंबातील मुख्य 'बाबूजी' एका घटनेने  जे  मी स्वतःच्या डोळ्याने बघतो तेच खरे ,ज्याचा मी अनुभव घेतो तेच सत्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट त्यांना नव्याने उलगडते  अशी चित्रपटाची कथा. चित्रपटातील संवादही जमेची बाजू आहे सर्व कलाकारांनी उत्तमरित्या अभिनय केला आहे परंतु बाबूजी (संजय मिश्रा )आणि त्याची पत्नी (सीमा पावा) यांचा अभिनयाला खऱ्या अर्थाने  दाद द्यावीशी वाटते.वाघाची डरकाळी ऐकण्यासाठीचा प्रसंग भलताच विनोदी झाला आहे. चित्रपटच संगीतही साजेस आहे  'आज लागी नयी धूप' हे गाण मनाला स्पर्शून जात.  जुन्या दिल्लीतील घरे ,तेथील वातावरण हे चित्रपटात अप्रतिमरित्या दाखविले आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट आपल्याला  अंतर्मुख करण्यास भाग पाडतो यातच  दिग्दर्शक रजत कपूर याचं  यश आहे.