सोमवार, ३ जून, २०२४

एक्झिट पोल



2024 ची लोकसभा निवडणूकीचे मतदान एक जून रोजी पार पडले तब्बल सात टप्प्यात हे मतदान पार पडले त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता भारतातील प्रमुख चॅनेलवर एक्झिट पोल सादर केला गेला. कमालीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व एक्झिट पोल हे मोदी सरकार येणार हे दर्शवत होते पण त्यांनी दाखविलेले चमत्कारिक आकडे मात्र कळत नव्हते 350 ते 400 याच आकड्यांमध्ये बहुतांश एक्झिट पोल होते. त्यावरून नंतर थोडा गदारोळ झाला विरोधी पक्षांनी या एक्झिट पोल पेक्षा एक्झॅक्ट पोलला महत्व देऊ असे जाहीर केले. राहुल गांधीने तर हे मोदी मीडिया पोल आहे असं संबोधले. या पोलमुळे एकंदर भाजप आणि एनडीए घटक पक्षांमध्ये एक सकारात्मक आणि विजयाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या तुलनेत विरोधकांनी एक्झिट पोल येण्याअगोदरच आम्ही इंडिया आघाडी 295 हून जास्त जागांवर विजय होऊ असे सांगितले. 

गेल्या दोन महिन्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोचला होता संविधान, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरती प्रचार केंद्रीभूत होता अनेक पत्रकारांनी आणि राजकीय विश्लेषकांनी ग्राउंड रियालिटी अनुभवले आणि त्यांच्या मतानुसार यावेळची निवडणूक ही 2014 आणि 2019 प्रमाणे भाजपाला पूर्णपणे अनुकूल नाही विरोधी पक्षही यावेळी लोकांमध्ये आपल्या मुद्दे योग्य पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे सरकार भाजपचे येऊ शकतं पण खासदारांची संख्या ही गेल्या वेळी पेक्षा कमी येईल असेच सांगितले होते. त्यामुळे एक्झिट पोल आणि पत्रकारांनी,विश्लेषकांनी घेतलेला आढावा यामध्ये नक्की काय बरोबर हे आपल्याला चार जूनला कळणारच आहे आणि तो दिवस म्हणजेच उद्याचा दिवस. 

खरंतर लोकसभा निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की विरोधी पक्षांनी यावेळी बऱ्यापैकी लढत देण्याचा प्रयत्न केला. 2019 ला मुळात विरोधी पक्ष दिसतच नव्हता  यावेळी मात्र विरोधी पक्षाने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या लोकप्रियतेबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही पण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी घेतलेले चांगले निर्णय हे त्यांच्या बाजूने जाणारच आहेत पण राज्यातील सरकार तोडणे, अनेक भ्रष्टाचारी नेतांना आपल्या पक्षात सामावून घेणे आणि काही अवाजवी घोषणा करणे यामुळे लोकांमध्ये थोडी का होईना नाराजी दिसली. त्याचं परिवर्तन मतांमध्ये होतंय की नाही हे निकालात कळेल. वोट शेअर किती मिळतो गेल्या वेळीच्या तुलनेत किती मताधिक्य असेल नसेल हे कळेल‌. अनेक मतदारसंघात ह्यावेळी खरंच चुरशीची लढत दिसली आहे त्यामुळे अत्यंत कमी फरकाने विजयी उमेदवार निवडून येतील. एक्झिट पोल त्या कमी फरकाचा पण ठाव घेऊ शकतो का हे आपल्याला निकालात कळून येईल. 

एक्झिट पोल बद्दल काही ठराविक नियम असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच एक्झिट पोल कशाच्या आधारावर घेतले आहेत?  त्यांचा सॅम्पल साईज काय आहे? हे एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थेने जाहीर करावं जेणेकरून लोकांमध्ये त्याबद्दल स्पष्टता निर्माण होईल. अनेकदा हे एक्झिट पोल खोटे ठरले आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये एक्झिट पोल घेताना या सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडण्यात येतात.त्या मांडणं भारतातही गरजेच आहे. यामुळे राजकीय पक्षांमध्ये आणि लोकांमध्ये एक्झिट पोल विषयी कुठलीही शंका राहणार नाही.

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२- यशस्वी भव:




आजपासून सुरू होत आहे आशियाई देशांमध्ये  खेळांचा महासग्राम आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीनमधील कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील  हांगझोऊ शहरात होणार आहे. चीनमध्ये तिसऱ्यांदा ही आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ १९५१ साली भारतामध्ये झाला. यावर्षी होणारी ही स्पर्धा ही १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 

भारताचा विचार केल्यास या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तब्बल ६५० हून जास्त खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग ज्याच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच आपण आशियाई चॅम्पियन चषक जिंकलो आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन हे दोघे देशाचे ध्वजवाहक असतील. आज २३ तारखेला स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन होईल. खरंतर १९ तारखेपासूनच अनेक खेळांची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत तब्बल ४० खेळांच्या ६१ क्रिडाप्रकारांचा समावेश आहे तसेच ४८१ सुवर्ण पदकांकरिता ४५ देशातील १२ हजारांहून जास्त खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 

सुवर्ण कामगिरीचे दावेदार


भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. सुवर्णपदक जिंकून दोन्ही संघाला ऑलिंपिकमध्ये पात्र होण्याची सुवर्णसंधी आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ऑलिंपिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, निखत झरीन, बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू,  लक्ष्य सेन, सात्विक साईराज - चिराग शेट्टीची जोडी, एच एस प्रणॉय, कुस्ती मध्ये अंतिम पंघाल, ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बजरंग, महिला आणि पुरुष कब्बडी संघ, धावपटू अविनाश साबळे, रिले संघ हे सर्व भारताचे सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार असतील.नेमबाजीत नेमबाज सुवर्ण कामगिरी करतील. त्यासोबतच तिरंदाजी रोविंग, स्विमिंग, टेनिस,  आणि इतर स्पर्धांमध्ये ही भारतीय खेळाडू शानदार प्रदर्शन करतील.

या आशियाई क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे २०१४ नंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ यामध्ये सहभागी होणार असून दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन खेळांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान दिले असून  त्यामध्ये पब्जी, ई फुटबॉल , डोटा असे ही खेळ समाविष्ट आहे. 



 गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदक जिंकली होती या स्पर्धेत त्याहून जास्त पदके जिंकण्याचा मानस असेल. गेल्या महिन्यातच आपण चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश ठरलो. आपला देश जगातील ५ मोठी अर्थव्यवस्था आहे . देशाला महासत्ता होण्याचे वेध लागले आहेत. महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हायला हवे. क्रिडा क्षेत्रात तर आपण खूप मागे आहोत पण चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून खेळांना पोषक वातावरण निर्माण होते आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या वाढविल्या पाहिजेत. दर दशकात आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धा देशात आयोजित केल्या तर क्रिडापटूंना प्रोत्साहन मिळेल  आणि या स्पर्धांच आयोजन करुन जगाला आपली खेळातील आणि आयोजन करण्याची क्षमता दाखवता येईल.  आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. यशस्वी भव:, चक दे इंडिया.

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

आशियाई चॅम्पियन भारतीय संघ व्हावा विश्व चॅम्पियन

आशियाई चॅम्पियन, चक दे इंडिया 

चैन्नई मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने ४-३ ने मलेशियाला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी वर नाव कोरले. सामन्यामध्ये १६ मिनिटे शिल्लक असताना मलेशिया ३-१ ने पुढे होती मात्र पुढच्याच मिनिटाला भारताने २ गोल करत जबरदस्त कमबॅक केला आणि सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली. शेवटच्या सत्रात आकाशदिप सिंगने ४ था गोल करत भारतीय संघाला शानदार विजय संपादन करुन दिला. भारतीय संघाचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने केला.त्यानंतर दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने केला. सामन्यातील तिसरा अत्यंत महत्त्वाचा गोल गुरजंट सिंगने केला हा गोल भारतीय संघातील सुंदर ताळमेळीचे एक उदाहरण होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अतिंम सामन्यात भारताने पिछाडीवरुन आघाडीवर येत सामना जिंकला. यावरुनच भारतीय संघाची लढण्याची, हार न मानण्याची मानसिकता कळते.ही मानसिकता कोणत्याही संघासाठी जास्त महत्वाची असते.

या स्पर्धेत भारत अपराजित राहत पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान, चीन याच्यावर विजय मिळविला. यावरुनच स्पर्धेत पूर्णपणे भारतीय संघाने वर्चस्व केले हेही लक्षात येते. कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेत ९ गोल करत चषक विजयात सिंहांचा वाटा उचलला. युवा लोकल बॉय कार्ती सेलवम, उपकर्णधार हार्दिक सिंग, श्रीजेश, पाठक, मनदीप सिंग आणि निलकंठ शर्मा यांची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. चेन्नईच्या प्रेक्षकांनीही स्पर्धेत भारतीय संघाला दिलेला पाठिंबा कौतुकास्पद होता. अंतिम सामन्यात जेव्हा भारत पिछाडीवर होता त्यावेळी भारताच्या प्रत्येक आक्रमणाला प्रेक्षकांनी पाठिंब्याची धार दिली त्यामुळे चषक जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पाठिंबा खुप महत्वाचा ठरला.


अंतिम लक्ष्य ऑलिंपिक

२०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर पदक जिंकून हॉकीला नवसंजीवनी दिली . त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता मात्र घरच्या मैदानावर महत्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने  ९ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. हा पराभव जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळेच हॉकी इंडियाने फुल्टोन यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. फुल्टोन प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर भारताने जिंकलेले हे मोठे विजेतेपद आहे. आता लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचे असेल कारण या स्पर्धेत जर आपण सुवर्णपदक जिंकलो तर थेट ऑलिंपिक साठी पात्र होऊ.ज्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या पॅरिस ऑलम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. कारण अंतिम लक्ष्य हे ऑलम्पिक मध्ये सुवर्ण कामगिरी करणे हेच असणार आहे. 

जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा.

एक आनंदाची बाब म्हणजे आज भारतीय संघ वर्ल्ड रॅंकिंग मध्ये तिसऱ्या क्रमावर पोहचला आहे. गेल्या दोन दशकातील सर्वोत्कृष्ट क्रमांक भारतीय संघाने मिळवला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात भारतीय संघ नेहमी वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या पाच संघात राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा दिसून येतो. जर या सर्वाचे योग्य निरीक्षण करुन विचार केल्यास भारतीय हॉकी संघ एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जात आहे आणि भारताचा असणारा हॉकीचा सुवर्ण इतिहास पुन्हा साकारणे हेच उद्दिष्ट असणार आहे.

पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन.

येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा 

दिल दो हॉकी को. चक दे इंडिया 🇮🇳

रविवार, ३ जुलै, २०२२

*महिला हॉकी विश्वचषक २०२२*

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची चर्चा सर्व भारतीयांमध्ये असते. आपण सर्व फुटबॉल विश्वचषक ही आवर्जून पाहतो त्यासाठी जागरण ही करतो. महिला हॉकी विश्वचषकाची तशी फारशी चर्चा माध्यमांमध्ये नाही आणि सामान्य क्रिडा प्रेमींमध्ये ही नाही ही खंत वाटते.  स्पेन आणि नेदरलँड्स येथे १ जुलै पासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली असून आज महिला भारतीय महिला हॉकी संघ इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहेत.  हॉकी म्हटले की *चक दे इंडिया* हा चित्रपट आठवतो त्या चित्रपटातील संघानेही जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकला होता आता ही संधी प्रत्यक्षात भारतीय संघाला आहे.

गेल्यावर्षी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत हॉकीला नवसंजीवनी दिली त्याच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय महिला हॉकी संघाने अविश्वसनीय कामगिरी  करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकाच्या जवळ आले असताना ग्रेट ब्रिटनविरुध्द अटीतटीच्या लढतीत ३-४ असा पराभव झाला. मात्र राणी रांमपालाच्या नेतृत्वाखाली महिला संघाने केलेली कामगिरी अद्भुत होती. प्रधानमंत्री मोदींपासून सर्वसामान्य भारतीयांनी त्याचे कौतुक केले होते.

या विश्वचषकामध्ये गोलरक्षक सविताच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून ऑलिम्पिक सारखी अथवा त्यापेक्षा चांगली कामगिरी त्यांनी करावी याकरिता मनःपुर्वक शुभेच्छा. आपली जबाबदारी ही आहे की आपण सर्वांनी भारतीय संघाला पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक सामन्याचे प्रसारण हे Star sports आणि Hotstar द्वारे केले जाणार आहे त्यावर आपणास सर्व सामने पाहता येईल आणि आपल्या भारतीय महिला हॉकी संघास पाठिंबा देता येईल.
भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकावा हीच इच्छा.

चक दे इंडिया 🇮🇳🇮🇳

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

महिलांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा 'झिम्मा'

 


आपण नेहमी बॉलिवूडमध्ये मल्टीस्टार एक्टर्सचा               (अभिनेत्यांचे)  चित्रपट पाहतो पण मराठी मध्ये मल्टीस्टार अभिनेत्रींना एकत्र घेऊन झिम्मा हा चित्रपट केला जातो आणि हा चित्रपट कोविड काळात ५० टक्के प्रेक्षक संख्या असतानाही  बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो यावरुनच जर आशय चांगला असेल तर तो चित्रपट चालतो हे मराठी प्रेक्षकांनी पुन्हा सिध्द केले आहे. आजच ॲमेझॉन प्राईमवरही हा चित्रपट रिलीज झाला आहे.  चित्रपटात ची कथा ही वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या महिला युके ( ब्रिटन) टूरवर जातात कोणी वयाने लहान, कोणी आजी अशा वेगवेगळ्या वयोगटातील या महिला आहेत त्यांचा स्वभावही वेगवेगळा पण कशा पद्धतीने त्या या ट्रीपचा आनंद घेतात. स्वातंत्र्य अनुभवतात. तसेच त्यांच्यामध्ये होणारे रुसवे-फुगवे कशा सोडवतात हे सर्व या चित्रपटात दाखवलेले आहे. 

सुहास जोशी,निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी,  मृण्मयी गोडबोले क्षिती जोग,सायली संजीव यांनी आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. सिध्दार्थ चांदेकरने साकारलेली 'गाईड'ची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेंनी छोट्या छोट्या प्रसंगांतून महिलांचे  व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर प्रकारे उलगडले आहे. पर्यटनावर चित्रपट असल्याने युकेतील महत्वाची पर्यटन स्थळे कॅमेराने छान टिपली आहेत. महिलांचे तेचतेच रडगाणे न दाखवता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा हा 'झिम्मा' पाहिलाच पाहिजे .

सोमवार, १० जानेवारी, २०२२

पूष्पा, फ्लावर नही फायर है फायर...


पूष्पाराज मै झूकेगा नही साला..., पूष्पा फ्लावर नही फायर है फायर, असे जबरदस्त डायलॉग आणि हे डायलॉग बोलणारा जर स्टाइलीश स्टार अल्लू अर्जून असेल तर प्रेक्षक हा चित्रपट डोक्यावरच घेणार यात शंका नाही. मसाला चित्रपटांमध्ये साऊथ सिनेमाच्या तोडीस तोड चित्रपट बनविणे महाकठिण आहे हे पूष्पाने पुन्हा सिध्द केले आहे.  लहानपणापासूनच दुजाभाव, अवहेलना मिळालेला पूष्पराज एका प्रसंगी  निर्णय घेतो की तो कोणासमोर झुकणार नाही. मोठा झाल्यावर पूष्पा ( अल्लू अर्जून) मजूर असला तरी राजासारखा राहतो. बुध्दीचा आणि शक्तीचा वापर करुन मालकासोबत भागीदार बनतो. त्यादरम्यान पूष्पाचे अनेक शत्रू तयार होतात त्यांना अद्दल घडवितो. श्रीवल्ली (रश्मिका) या मुलीवर प्रेम करतो साऊथच्या अनेक चित्रपटापणे यातही प्रेम करताना नायकाची स्टाईल वेगळी आहे. पूष्पाला प्रेम मिळते का? पूष्पा शत्रूंवर विजय मिळवून पूढे जातो का? हे सर्व चित्रपटांमध्ये पाहता येईल. 

अल्लू अर्जूनला पडद्यावर पाहणे, त्याचा डांन्स, एक्शन, बसण्याची स्टाईल सर्वच कमाल आहे. अनेक तरुणांची क्रश रश्मिकानेही चांगले काम केले आहे. नायकाचे विरोधक ही जबरदस्त आहेत. चित्रपटातील गाणी ही ठेका धरणारी आहेत.  शेवटी पूष्पामध्ये  पुढील भागासाठी काही प्रमाणात उत्सुकता निर्माण केली आहे.  चित्रपटातील सीन आणि कॅमेऱ्याची फ्रेम ही केमिस्ट्री जूळून आली आहे. यासाठी दिग्दर्शकाचे आणि सिनेमेटोग्राफरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पूष्पा अल्लू अर्जूनसाठी एकदा तरी पाहिलाच पाहिजे असा हा 'पैसा वसूल' चित्रपट आहे. कोणत्याही स्टारचा चित्रपट पहिल्या आठवड्यात जबरदस्त चालतो आणि नंतर कमाई कमी होते. पूष्पा मात्र पहिल्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आठवड्यात जास्त कमाई करुन फ्लावर नाही फायर ठरत आहे. अनेक बड्या चित्रपटांसमोर झुकतही नाही आहे. आम्ही मित्रांनी (नीरव, दर्शन, उत्कर्ष आणि मी) हा चित्रपट काल पाहिला. विशेष म्हणजे उत्कर्षने मोबाईलवर दोनदा पाहिल्यावरही थिएटर मध्ये पाहण्यासाठी आला. क्रेझ म्हणतात ती हीच.


रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

गोल्डन बॉय नीरज चोप्रा

 


कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता,         एक भाला तो तबीयत से उछालो यारों...! 

आज नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक  जिंकत वरील शेर सिध्द केला आहे.ट्रेक एण्ड फिल्ड प्रकारात भारताने ऑलिम्पिकमध्ये कधीच पदक जिंकले नव्हते. मात्र नीरजने अद्भुत कामगिरी करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आसमानमध्ये भाला फेकत सुवर्ण सुराख केला आहे. भारताला तब्बल १३ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळाले असून आज भारतीय तिरंगा ऑलिम्पिकमध्ये डौलाने फडकला. १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रधून वाजली आणि सर्व भारतीयांना राष्ट्रधूनवर उभे राहून तिरंग्याला अभिवादन करता आले. हे यश, हा सुवर्णक्षण नीरजने भारतीयांना दिला आहे.

मिल्खा सिंग, पी.टी. उषा यांच पदक ०.१० सेकंद फरकाने गेले होते. आज मिल्खा सिंग यांना खरी श्रद्धांजली मिळाली आहे. स्वर्गात फ्लाइंग सिंखांच्या आनंदाला पारावार उरला नसणार. पी टी उषांही आनंदा अश्रूंनी हा विजय पहात असतील. जे स्वप्न असते ते सत्यात आणण्यासाठी नीरज सारखी मेहनत आणि आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास नीरजच्या सुवर्ण यशाने सर्व भारतीय खेळाडूंना आणि भारतीयांना नक्कीच मिळाला असणार. 

नीरज नावाचा अर्थ कमळ असाही होतो. भारताच्या ट्रेक एण्ड फिल्ड क्रिडा प्रकारातील भूतकाळ हा चीखल असून नीरजचे सुवर्णपदक हे सुवर्ण 'कमळ' आहे. आज नीरजच्या यशाने भारताने या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकले आहेत.आतापर्यंत सर्वात जास्त पदक आपण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलो आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्या सुवर्णपदकाची आस साऱ्या भारतीयांना होती ते नीरजने जिंकत देशाला अनमोल भेट दिली आहे.  नीरजचे हे यश भारतातील क्रिडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात असावी आणि उत्तरोत्तर क्रिडा क्षेत्रात नीरजसारखे गुणवान खेळाडू तयार होवोत. भारत क्रिडा क्षेत्रात महासत्ता बनावा हीच इच्छा. नीरज तुझ्यावर कितीही लिहिले तरी कमीच पडेल. नीरज तुला मानाचा मुजरा.

सलाम नीरज. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अंधेरा हट गया, सुरज निकल गया, पदक मिल गया।




८ वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताला आज ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ५-४ ने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. ३-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारताने सलग ४ गोल करत दमदार कमबॅक केला आणि जर्मनीला नेस्तनाबूत केले. 

साल २००८ भारत बीजींग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ न शकला नाही. त्यामुळे अनेक तज्ञांनी भारताच्या हॉकीला तिलांजली दिली होती.  २०२० टोक्यो ऑलिम्पिकच्या सुरुवातीला एका प्रख्यात वृत्तपत्राच्या वार्ताहराने भारतीय पुरुष संघाबद्दल ते मेडलचे दावेदार नाहीत असे म्हणत हिणवले होते. त्या सर्वांना आजचा पदकविजय हे जबरदस्त उत्तर आहे. हॉकी ही भारताची अस्मिता आहे. भारतीयांचे हॉकीशी भावनिक नाते आहे.जितके प्रेम या स्पर्धेत भारतीयांनी हॉकीवर दाखवले तेवढेच प्रेम कायम ठेवा हॉकीला सदैव समर्थन द्या. या विजयामुळे आज आपण खऱ्या अर्थाने हॉकीसाठी चक दे इंडियाचा जयघोष करत आहोत. भारतीय हॉकीवर गर्व आहे.


सलाम भारतीय हॉकी संघ. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

टोक्यो ऑलम्पिक- रंग दे तिरंगा 🇮🇳

 

आजपासून उगवत्या सुर्याचा देश म्हटल्या जाणाऱ्या जपानमध्ये टोक्यो येथे ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट अवघे जग ऑलम्पिकमय होणार आहे.  गेल्यावर्षी होणारी स्पर्धा कोरानामुळे यावर्षी आयोजित केली जाईल असा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघटनेने घेतला होता. या वर्षीही स्पर्धा होणार की नाही याबाबत शंकाच होती कारण कोरोनाची जागतिक परिस्थिती आणि जपानमधील कोरानास्थितीमुळे स्पर्धेला असलेला स्थानिकांचा विरोध मात्र या सर्वविरोधास दूर करत अखेर आज या स्पर्धेस सुरुवात होत आहे. स्टेडियमवर प्रेक्षक मर्यादित असल्याने तेथील उत्साह कमी असेल मात्र जगात ऑलम्पिकमुळे उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण नक्कीच असेल. कोरोनाच्या या निराशादायी वातावरणात अवघ्या जगाचे लक्ष वळविण्याचे कार्य ऑलम्पिक करत आहे.


रंग दे तिरंगा

ऑलम्पिकमध्ये भारताचा विचार केल्यास या ऑलम्पिक मध्ये भारताचा 120 खेळाडू असलेल्या आतापर्यंतचा सर्वात जास्त खेळाडूंचा चमू जात आहे ही खरच अभिमानास्पद बाब आहे. पदकांच्या दावेदारांचा विचार केल्यास बॅडमिंटनमध्ये गेल्या दोन्ही ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळाले होते. यावेळीही गेल्या ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ही सुवर्णपदकाची प्रबऴ दावेदार आहे. कुस्तीतही मागील तीन ऑलम्पिकमध्ये पदक मिळाले आहे यावेळी विनेश फोगट, बजरंग पुनिया कुस्तीमध्ये पदक जिंकू शकतात. बजरंगची गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरी पाहता तो सुवर्णपदक जिंकेल असे म्हटले जात आहे. 2016 च्या ऑलम्पिकमध्ये ऐन भरात असणाऱ्या विनेशला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली होती त्यामुळे या स्पर्धेत पदकासाठी ती पराकाष्ठा करेल हे नक्की.

नेमबाजीमध्ये युवा नेमबाज मनु भाकर, सौरभ चौधरी, यांच्याकडून पदकाची आस आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्याकडेही पदक मिळविण्याची क्षमता आहे. बॉक्सिंगमध्ये सुपरवुमन मेरी कोम आणि अमित पांघल हे पदक निश्चित करु शकतात. एथलेटिक्समध्ये भारताची पदकांची पाटी नेहमी कोरी राहिली आहे यावेळी मात्र भालाफेकपटू नीरज चोप्राच्या रुपाने आशेचा किरण आहे. द्युतीचंद 200 मीटर धावणे आणि महाराष्ट्राचा अविनाश साबळे स्टीपलचेसमध्ये कमाल करु शकतो.

तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमांकावर प्रथम स्थानी असणाऱ्या दिपिका कुमारी भारताची सुवर्णकन्या बनू शकते. प्रविण जाधव हा महाराष्ट्राचा तिरंदाज ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची घरची परिस्थिती अतिशय गरीब आहे. आई, वडील शेतात मोलमजुरी करतात पण या पठ्ठ्याने खडतर संघर्ष करत आज ऑलम्पिकमध्ये स्थान मिळविले आहे. पंतप्रधान मोदींनीही त्याच्याशी थेट संवाद साधून त्याचे कौतुक केले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू भारताची एकमेव खेळाडू प्रतिनिधित्व करत आहे. विशेष म्हणजे तीने जागतिक विश्वविजेतेपद जिंकले असून ती देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल असा विश्वास वाटत आहे. टेबलटेनिसच्या मिश्र दुहेरीत देशाचे अव्वल टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल आमि मनिका बात्रा यांची जोडी चीनच्या तगड्या आव्हाना टक्कर देऊन पदकाची मानकरी होऊ शकते.

आता बोलूया अशा खेळाबद्दल ज्या खेळाने भारतासाठी ऑलम्पिकमधील इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला आहे पण गेली 40 वर्षे या खेळात भारताला पदक मिळाले नाही ही एक लाजिरवाणी बाबही आहे.  होय, मी हॉकीबद्दल बोलत आहे. क्रिकेट जरी देशाचा धर्म असला तरी हॉकीशी भारतीयांच भावनिक नाते आहे. गेली 40 वर्ष पदकांची पाटी कोरी असणाऱ्या भारतीय दोन्ही हॉकी संघांना यावेळी पदक जिकण्याची सुवर्णसंधी आहे. पुरुष हॉकी मध्ये भारत जागतिक क्रमवारीत 4 थ्या क्रमांकावर असून गेल्या काही वर्षांपासून भारताच्या खेळात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे यावेळी पुरुष हॉकीत पदक जिंकून भारतीयांना चक दे इंडिया म्हणणाची आणि आनंद साजरा करण्याची संधी द्यावी. राणी रामपालच्या महिला हॉकी संघानेही अमेरिकेसारख्या ताकदवान संघाचा पराभव करत ऑलम्पिकमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महिला हॉकी संघाने कामगिरीत सातत्य राखल्यास ते मोठमोठ्या संघाला हरवून देशाला पदक जिंकवून देऊ शकतात. याव्यतिरिक्त टेनिस,स्विमिंग, फेंन्सिंग, ज्युदो आणि घोडेस्वारी या खेळांमध्येही भारतीय खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत 

ऑलम्पिकमध्ये पदक विजेत्यामध्ये नव्या  खेळाडूंचीही भर पडू शकते. काही धक्कादायक निकाल ही लागू शकतात कारण शेवटी हा खेळ आहे आणि खेळात अशक्य असे काही नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या खेळांच्या थराराचा आनंद जग घेईल. आपण रोजच्या जीवनात कितीही वेगवेगळे असलो तरी 15 दिवसांसाठी आपले खेळाडू देशाला एकत्र आणतील. हेच खेळाचे वैशिष्ट्य आहे. 2008 मध्ये ऑलम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते त्यानंतर ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजले नाही. यावेळी हा 13 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपावा आणि खेळाडूंच्या सुवर्णकामगिरीमुळे ऑलम्पिकमध्ये राष्ट्रधून वाजावे.  या क्षणासाठी प्रत्येक देशवासिय आसूसलेला आहे कारण तो क्षण त्या खेळाडूंसाठी आणि सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण असेल. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन भारतासाठी प्रथमच दोन आकडी पदकसंख्या जिंकण्याचा विक्रम करावा आणि चक दे इंडियाचा नारा घुमावा हीच इच्छा. टोक्यो ऑलम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. चक दे इंडिया, रंग दे तिरंगा  

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

अजिंक्य भारत, अतुल्य भारत, विजयी भारत

  

( आजचा लेख थोडा मोठा झाला आहे परंतु खर म्हणजे भारतीय संघाने मिळविलेले यश हे इतक ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे की शब्द अपुरे पडतील.)

दमा के पुरा किया जितना भी खसारा था
वही से जितके निकला जहां मैं हारा था।

शायर शकील आझमी यांचा हा शेर आज पुन्हा लिहावासा वाटला कारण पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर आज भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ ने हरवत इतिहास घडविला आणि दाखवून दिले की वही से जीतके निकले जहां हम हारे थे. पहिल्या कसोटीत ३६ वर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघापेक्षा गल्ली क्रिकेटचा संघ बरा अशी चौफेर टीका होत होती त्यात कर्णधार, रनमशीन विराट कोहली मायदेशी परतला आणि प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होते त्यामुळे या कसोटी मालिकेत भारत ४-० ने हरेल किंवा आता भारत मालिका हरणारच असे रिकी पॉंटिंग, मायकल वॉर्न, मायकल क्लार्क या दिग्गजांनी सांगितले. परंतु यांना माहित नव्हते की 'अजिंक्य' भारत काय असतो.

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद आले आणि पराभवाने खचलेल्या संघाला स्वतः अविस्मरणीय शतक करत प्रेरणा दिली. अजिंक्यचे शतक, अश्वीन,जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे भारताने मेलबर्नमध्ये  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत बाउंसबॅक केला. मेलबर्न कसोटीतील विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कसोटी विजयापैकी एक होता.


सिडनी येथील तिसरी कसोटीमध्ये दुसऱ्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय होईल असे वाटत असताना  पंतने काऊंटर अटॅक करत ऑस्ट्रेलिया पराभूत होईल अशी परिस्थिती निर्माण केली. पुजारानेही मैदानात तंब्बू ठोकून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. दोघे बाद झाल्यावर   दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी आणि अश्वीन यांनी किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखत सामना अनिर्णित ठेवला. तब्बल ४२ ओव्हर्स त्यांनी फलंदाजी करत सामना अनिर्णित केला. विहारी आणि अश्वीनची खेळी जिद्द,चिकाटी आणि संयम याचे अद्वितीय उदाहरणच आहे. जडेजाने केलेला ऑलराऊंड परफोर्मन्स ही कौतुकास्पद होता.

निर्णायक कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर होणार होती ज्या मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नाही असे हे मैदान. भारताचे प्रमुख गोलंदाज बुमराह, अश्विन, जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेले. नवख्या भारतीय गोलंदाजांकडे फक्त एकुण ५ सामन्याचा अनुभव मात्र जे शुर असतात त्यांना लढणं शिकवाव लागत नाही ते उपजत येत हे नटराजन, शार्दुल ठाकुर, सुंदर यांनी अप्रतिम कामगिरी करत दाखवून दिले.  भारतीय संघाची १५० वर ५ विकेट्स असताना शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनुक्रमे ६७ आणि ६२ धावांची अविस्मरणीय खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. 

तिसऱ्या इंनिगमध्ये सिराजने कसोटी इंनिगमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघास ३०० धावांच्या आत रोखले. शेवटची इनिंग T-20 पेक्षाही रोमहर्षक झाली. ३०० पेक्षा अधिक धावा पाचव्या दिवशी करता येणे शक्य नाही एकतर सामना अनिर्णित राहिल अथवा भारताचा पराभव होईल असेच क्रिकेट तज्ञांचे मत होते परंतु अशक्य लक्ष्य प्राप्त करण हेच या संघाच वैशिष्ट्य होत आणि शुभमन गिलच्या ९१ धावांच्या आक्रमक खेळीने धावसंख्येचा पाया उभारला गेला. पुजाराने एखाद्या योद्ध्याप्रमाणे एक बाजू धरुन ठेवली आणि ज्याला भारताचा फ्युचर स्टार बोलल जात त्या ॠषभ पंतने सामना जिंकविला. ऑस्ट्रेलियाचा गाबाचा घमंड ३२ वर्षांनंतर तोडत भारताने ऐतिहासिक मालिका विजय मिळविला.

या मालिका विजयाचे श्रेय हे सर्व खेळाडूंना जाते. ज्या जिद्दीने ते खेळले त्यांना खरंच सलामही कमी पडेल. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी संधीच सोनं केले. सर्वात मुख्य म्हणजे अजिंक्य रहाणेने केलेले शांत,संयमी नेतृत्वासाठी शब्द कमी आहेत. प्रमुख गोलंदाज आणि फलंदाज नसतानाही संघाला विजय मिळवून देणे ही अशक्यप्राय गोष्ट अजिंक्यने केली. त्याची खिलाडूवृत्ती आणि त्याचा स्वभाव खरंच कौतुकास्पद आहे आणि हा चारित्र्यवान खेळाडू 'आपला माणूस' आहे असं नेहमी वाटत. भारतीय क्रिकेट इतिहासात तो 'अजिंक्य' कर्णधार म्हणून  ओळखला जाईल हे नक्की.

राखेतून भरारी घेणे काय असतं याचे अद्वितीय उदाहरण ही मालिका आहे. जेव्हा कधी निराश व्हाल तर ही मालिका आठवा बक्कळ प्रेरणा देऊन जाईल.

चक दे इंडिया. सलाम सलाम सलाम.





मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

साहेब विनम्र अभिवादन 🙏🙏

 


आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन. त्याबद्दल आताच मित्र सुमेध म्हात्रेशी बोलत होतो. साहेब गेले ती बातमी टीव्हीवर पाहिली आणि रडू कोसळलं होत याची आठवण झाली. साहेबांच आणि माझ नात सुरु झाल लहानपणापासून. वडिलांना राजकारणात  रस आणि आवड असल्याने मला आपोआप राजकारणाची आवड निर्माण झाली. सामान्य मराठी माणसाप्रमाणे साहेबांचे आणि शिवसेनेचे आकर्षण वाटू लागले. साहेबांवर श्रद्धा वाढत गेली. शाळेत असताना साहेबांचा फोटो पाकिटात ठेवायचो. काही महिने वर्गात मॉनिटर होतो त्यावेळी साहेब सभेमध्ये हात दाखवायचे तसा हात दाखवून वर्गावर नियंत्रण करायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी मी राजकारणात जाईन असंच मला आणि माझ्या मित्रांना वाटायचे.  

दशकभरापूर्वी म्हणजे माझ्या महाविद्यालयीन जीवनात मनसेची जबरदस्त लाट होती त्यावेळी घरच्यांसोबत, मित्रांसोबतच्या वादात शिवसेनेची बाजू लावून धरायचो.  साहेबांच भाषण, दसरा मेळावा हा अतिशय जवळचा विषय होता. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या वाक्याची जादू वेगळीच होती.साहेबांच्या भाषणाने उर्जा मिळायची.

साहेब गेले तेव्हा माझा मित्र प्रणित भगत सोबत साहेबांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो तेथील न भूतो न भविष्यती असा जनसागर जमला होता या जनसागराच साहेबांशी नात फक्त एकच होत ते म्हणजे साहेब सर्वांसाठी घरातील व्यक्ती होती. परत या परत या बाळासाहेब परत या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे या घोषणांनी शोकाकूल वातावरणातही साहेबांच अस्तित्व जाणवत होत. एकदा साहेब दिसावे म्हणून जो,तो त्यांच्या गाडीच्या जवळ जात होता कारण प्रत्येकाला माहिती होते आज आपण आपल्या दैवताला, श्रद्धांस्थानाला अखेरचा निरोप देत आहोत.

जे प्रेम साहेबांना मिळाले ते कुठल्या नेत्याला मिळण शक्य नाही. आज माझी राजकीय पक्षांबद्दल मत बदलली. कोणताही पक्ष जवळचा नाही पण साहेबांवर प्रेम होते, आहे आणि कायम राहील.


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

गुरुवार, ४ जून, २०२०

बासू चटर्जी - सामान्य माणसाचं जीवन मांडणारे दिग्दर्शक



प्रिय बासूदा,

तुम्ही छोटी सी बात, रजनीगंधा, चितचोर, दिल्लगी, बातो बातो मे, खट्टा मिट्टा अशा तुमच्या अनेक चित्रपटातून  सामान्य माणसाच जीवन नर्मविनोदी आणि साध्या सरळ पद्धतीने आमच्या समोर मांडलात. कधी कधी साधेपणा जपणच खुप कठीण असत मात्र ते तुम्ही प्रत्येक चित्रपटात जपलं‌. आजही हे चित्रपट सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी जोडले जातात यातच तुमच्या दिग्दर्शनाचे मोठेपण आहे.


ज्या काळात मारधाड, डायलॉगबाज चित्रपटांची चलती होती त्यावेळी बासुदा तुम्ही सामान्य माणसाच्या इच्छा,आकांक्षा,स्वप्न, संघर्ष, नाती हे चित्रपटातून मांडलात आणि ती तुमच्या चित्रपटांची ओळख बनली आणि ही ओळख चित्रपटसृष्टी असेपर्यंत कायम राहील. छोटी सी बातमधील बस स्टॉप, बातो बातो में मधील लोकल ट्रेन, चीतचोरमधील गाव, मंजील मधील शहरातला पाऊस अशा सामान्य माणसाच्या खऱ्या जीवनातील गोष्टीही जशाच्या तशा दाखवल्या, हे अस दाखवणे तुमचं वैशिष्ट्य होत.

ब्योमकेश बक्षी, एक रुका हुआ फैसला या वेगळ्या धाटणीच्या मालिकाही तुम्ही केलात. काही माणस न भेटताही अनेकदा आपल्यासाठी खजिना ठेवून जातात तसे बासूदा तुम्ही आहात तुमचे चित्रपट आमच्या सारख्या चाहत्यांसाठी अनमोल खजिना आहे जो आम्हाला सदैव आनंद देत राहिल. 

तुमच्या कारकिर्दीला सलाम
बासुदा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुम्ही सदैव स्मरणात राहाल.

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

सुषमाजी हमेशा याद रहेंगे...




एक प्रभावी वक्ता, देशप्रेमी नेता और राजनीति के क्षेत्र में महिलाओं के लिए आदर्श स्थापित करनेवाले मेरे पसंदीदा  सुषमा स्वराज को भावपूर्ण श्रद्धांजलि।

 पासपोर्ट से लेकर विदेश में भारतीय लोगों की मदद करना। Twitter पे आए हुए समस्याओं के Twit का समाधान करना ये क्रांतिकारी बदलाव सुषमाजीने विदेश मंत्रालय में किए थे। इसिस ने बंधी बनाएं हुए भारतीय अस्पताल कर्मियों को सही सलामत भारत में लाने में सुषमाजी का महत्वपूर्ण योगदान रहा।

सुषमाजीने विदेश मंत्री रहते  वक्त  पाकिस्तान के लोगों को भारत में उपचार के लिए तुरंत व्हिसा दिया यह बात एक इंसानियत का सबसे बड़ा उदाहरण है। ऐसे अनेक कार्यों से सुषमाजीने विदेश मंत्रालय को एक ऊंचे स्तर पर पहुंचाया ।

सुषमाजीने  जिस तरह विपक्ष की नेता का पद संभाला था कॉन्ग्रेस को हिला के रखा था। उसी दौर में प्रधानमंत्री मनमोहन सिंहजी को शायराना अंदाज में दिया हुआ जवाब 'कुछ तो मजबूरीया  रहीं होंगी युही कोई बेवफा नहीं होता' सुषमाजी के ऐसे अनेक प्रभावशाली भाषणसे संसद गुंज उठी है। उनके भाषण सुनना हमारा भाग्य था।

राजनीतिक विरोधी नेताओं का सुषमाजीने हमेशा सन्मान किया। कल जब ३७० कलम हटाने के बाद उन्होंने किया हुआ Twitt 'इसी पल को देखने का इंतजार कर रही थी' जीवन के अंत के वाक्य में भी देशप्रेम ही था।

भारतीय लोकतंत्र के इतिहास में स्वर्णिम अक्षरों से सुषमाजी का नाम लिखा गया है।
सुषमाजी हमेशा याद रहेंगे। अंतःकरण से श्रध्दांजलि।

सोमवार, १० जून, २०१९

Champion is Always Champion

युवराजने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली माझ्यासह सर्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण आहे. युवराज क्रिकेटच्या मैदानात आणि वैयक्तिक जीवनात Fighter होता आणि राहिल.


२००० साली under 19 विश्र्वचषक भारताने जिंकला युवराज त्या विश्र्वचषकात मालिकावीर होता आणि त्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला.२००२ नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळलेली जिगरबाज खेळी.त्यानंतर त्याकाळात मोहम्मद कैफ आणि त्याची जोडीने अनेक सामने जिंकविले. क्षेत्ररक्षणासाठी युवराज Point वर उभा असायचा आणि कित्येक अप्रतिम झेल त्याने टिपले.


२००७ T- 20 विश्र्वचषकात युवराजचे ६ चेंडूत ६ षटकार कोणताही भारतीय विसरू शकत नाही. २००७ चा विश्र्वचषक जिकंविणारा मुख्य शिलेदार युवराज होता. भारतीय क्रिकेटला २०११ साली तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकविणारा युवराजच होता. विश्र्वचषकात त्याला शारिरिक त्रास होतानाही एका स्वप्नाकरिता खेळला आणि स्वप्न सत्यात आणले.


युवराजने कॅन्सरवर मात केली आणि वैयक्तिक जीवनातही तो Fighter होऊन अनेकांना प्रेरणादायी बनला. कॅन्सरवर मात करून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले यासाठी युवराजला सलाम. २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५० धावा ( highest Score) करत जिगरबाज आणि अविस्मरणीय खेळी केली. युवराज तू आज निवृत्त झालास पण तुझ्या चाहत्यांसाठी तू कधीच निवृत्त नसशील त्यांना तुझ्या या खेळी सदैव आनंद देत राहतील.


युवराज भारतीय क्रिकेट इतिहासात तीन विश्र्वचषक जिंकविणारा खेळाडू आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज, एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहेस. युवराजने सामाजिक जाणीव जपत Youwecan नावाची सामाजिक संस्था कॅन्सरग्रस्तांकरिता सुरु करुन कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांना मदत करत आहे.

शेवटी एवढंच म्हणीन खुप खुप धन्यवाद आम्हाला  तुझ्या खेळाने आनंद दिल्याबद्द्ल आणि You are Always Champion For us. Real Fighter .

मंगळवार, २८ मे, २०१९

अभिनंदन NDA, अभिनंदन भाजपा, अभिनंदन नरेंद्र मोदी.



मोदी सरकार सत्तेत पुन्हा येईल हे सर्वांना माहीत होते. मात्र इतका मोठा विजय होईल याची कल्पना फारच कमी लोकांनी केली असेल‌. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती मात्र आजही ही लाट आहे हे या विजयामुळे स्पष्ट होते आहे. भाजपा मित्रपक्ष यांचे समन्वय, भाजपा संघटन, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे मोदींचा करिष्मा यांचा हा विजय आहे. भाजपा, नरेंद्र मोदी, NDA या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.  सबका साथ, सबका विकास व्हावा हिच अपेक्षा.

जय भारत.

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

चक दे इंडिया


 

आज भुवनेश्वर येथे हॉकीचा रणसंग्राम सुरू होत आहे. १६ संघाचा समावेश असलेल्या विश्र्वचषक स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे लक्ष्य मायदेशात विश्र्वचषक जिंकून देशाला अविस्मरणीय भेट देण्याचे असेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करुन हॉकीतील मरगळ झटकून टाकली आहे. सध्या जागतिक स्तरावर भारत ५ व्या क्रमांकावर असून विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे.प्रशिक्षक हरिंदर सिंग यांनी भारताला २१ वर्षांखालील विश्र्वचषक जिंकून दिला होता आता हा विश्र्वचषक जिंकण्याच्या ध्यासाने ते आणि त्यांचे खेळाडू मैदानात उतरतील हे नक्की.


भारताच्या खेळात प्रचंड सुधारणा झाली असून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त रहावे याकडे लक्ष दिले गेले आहे. भारतीय हॉकीचे वैशिष्ट्य आहे कलात्मक खेळ आणि त्यासोबत पाश्चिमात्य देशांची शैली यांचा मेळ त्यांच्या खेळांमध्ये दिसतो आहे.हॉकी खेळ नसून भारतीय अस्मिता आहे. हॉकीच देशवासीयांशी भावनिक नाते आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर दमदार कामगिरी करत भारतीय संघाने  विश्र्वचषक जिंकावा याकरिता मनापासून शुभेच्छा.सर्व देशवासीय एकच जयघोष करीत आहेत तो म्हणजे

चक दे इंडिया.

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सर्वसमावेशक युगाचा अंत.

                   

आज सद्यकालीन राजकारणातील आवडता नेता निवर्तला. अटलबिहारी वाजपेयीजींना अंतःकरणापासून श्रद्धांजली.

जेव्हा बालपणी राजकारणाबद्दल जाणिव झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांचा पाकिस्तानचा दौरा ही पहिली आठवण होती. जेव्हा राजकारण नेमकं काय असतं हे समजू लागले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणातील सक्रिय सहभाग कमी केला होता मात्र त्यांच्याबद्दल माहिती मिळू लागली तसं तसा हा महान नेता मनी स्थान निर्माण करु लागला.

१३ दिवसांच सरकाराचा राजीनामा देताना देश रहना चाहिए, देश का लोकतंत्र रहना चाहिए हे त्यांच वाक्य अजरामर झाले. त्यानंतर वाजपेयीजींनी राष्ट्रीय लोकशाही दल स्थापन करुन अनेक विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करून स्थापन केलेले सरकार, मुख्य म्हणजे सर्व पक्षांना सांभाळून सरकारचा कार्यकाल पूर्ण केला हे कौशल्य फक्त वाजपेयींमध्येच होत.पोखरण अणुस्फोट सारखा धाडसी निर्णय, कारगील युद्ध अशा महत्त्वपूर्ण घटना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान या मुलभूत योजनांतून वाजपेयी सरकारची कामगिरी कळाली.

विरोधकांशी ही सन्मानाने वागणारा नेता, टीका करताना ही मर्यादा पाळणारा वक्ता, विजयाने उन्मादून न जाणारा आणि पराभवाने न खचणारा योध्दा, देशप्रेम, प्रेरणेने ओतप्रोत असणाऱ्या कविता करणारा कवी असे असंख्य गुण असणाऱ्या  या नेत्यांच राजकारणात सक्रिय नसणं यांचं दुःख मनी सदैव होत.

देशभक्त असणारे तुम्ही भारतमातेच्या उदरातच पुन्हा जन्म घ्याल यात शंका नाही. वाजपेयीजी तुम्हाला त्रिवार मुजरा. पुन्हा अंतःकरणापासून श्रद्धांजली.

सोमवार, ४ जून, २०१८

फर्जंद एक अविस्मरणीय शौर्यगाथा



फर्जंद हा चित्रपट म्हणजे शुरवीर मावळ्यांची शौर्यगाथा, फर्जंद म्हणजे राजमाता  जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील मावळ्यांची श्रद्धा, फर्जंद म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आणि महाराजांचं मावळ्यांवरील प्रेम फर्जंद म्हणजे पन्हाळा सर करणारा शुर यौध्दा अस असंख्य शब्दांमध्ये फर्जंदच वर्णन करता येईल. काही वेळा एखाद्या गोष्टीवर काय लिहावं हे कळतं नाही तर काहीवेळा अशा कलाकृतीवर किती लिहावं आणि काय लिहावं यासाठी शब्द अपुरे पडतात. फर्जंद ही अशीच भव्यदिव्य आणि शिवकाळ डोळ्यांसमोर उभी करणारी कलाकृती.आज सकाळी प्लाझा थिएटरला हा चित्रपट १९ शिवप्रेमींसोबत पाहिला. इतक्या मोठ्या ग्रुपसोबत चित्रपट पाहण तेही शिवप्रेमींसोबत खरंच फार अप्रतिम अनुभव होता.हाऊसफुल्ल असलेल्या शोमध्ये शिवरायांचा जयघोष, प्रत्येक महत्त्वाच्या संवादाला टाळ्या,आवाज असं शिवमय थिएटरच वातावरण होत.

या चित्रपटाचं कथानक आहे पन्हाळ्याच्या मोहिमेवर आधारित. शिवराज्याभिषेक अगोदर हा किल्ला स्वराज्यात सामील होणं हे स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.यवनांनी स्वराजातील पळवून नेलेल्या स्त्रीयांना ही याच किल्ल्यावर ठेवले असल्याने महाराजांना हा किल्ला त्या महिलांच्या सुटकेकरिता हा किल्ला जिंकायचाच आहे. या मोहिमेकरिता सरदार कोंडाजी फर्जंद यांची निवड केली जाते. आऊसाहेब जिजाऊ मात्र अशा मोहिमाकरुन आमची मुलं गमवायची नाही आहेत अशा मनःस्थितीत असतात मात्र कैदेतील स्रीयांकरिता आणि कोंडाजी फर्जंदच्या जिद्दीमुळे या मोहिमेस होकार देतात.फक्त ६० मावळ्यांसह २५०० यवनांचा पराभव करुन ही मोहिम फर्जंद फत्ते करतात आणि इतिहास घडवितात. इतक्या कमी फौजेसह २५०० शत्रुचा पराभव केला हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.

फर्जंद या चित्रपट हा मराठीतील एक उत्कृष्ट युद्धपट म्हणू शकतो. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अक्षरशः शिवकाळ डोळ्यांसमोर उभा केलाय. लेखक म्हणूनही कथानकाची मांडणी उत्तम केली आहे.vfx आणि graphics उत्तमरित्या वापरले आहे.यासर्वबांबीमुळे चित्रपटाला भव्यदिव्य स्वरुप आले आहे.खरच दिग्पाल तुम्हाला मानाचा मुजरा. जिजाऊ साहेब मृणाल कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारल्या आहेत.  चिन्मय मांडलेकर यांनी जीव ओतून महाराज साकारले आहेत हे दिसतं. अभिनेता  अंकित मोहन यांनी कोंडाजी फर्जंद या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. अंगमेहनत आणि मराठी भाषिक नसुनही त्याकाळातील मराठी भाषा त्याचा लहेजा पकडला आहे. खरच मोहन तुमचं कौतुक. अजय पुरकर,आस्ताद काळे, मृण्मयी देशपांडे, हर्षद दुधाणे, निखिल राऊत,प्रविण तरडे, नेहा जोशी यासर्वांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे.गणेश यादव आणि अंशुमन विचारे यांची अगदी लहान भुमिका ही लक्षात राहते. समीर धर्माधिकारी यांनी बेशक खान हा खलनायक ताकदीने उभा केलाय.विशेष कौतुक आहे प्रसाद ओक यांच बहिर्जी नाईक यांच ७ वेषातील बहुरुपी पात्र जीवंत केले आहे. सर्व कलाकारांना सलाम.

फर्ज़ंद प्रत्येक शिवप्रेमींनी, मराठी माणसांनी आवर्जून थिएटरला पहावा आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर मावळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. हा चित्रपट इतिहास घडवणार यात शंका नाही.

जय जिजाऊ
जय शिवराय.

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सुवर्ण टेबल टेनिस.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

टेबल टेनिसमध्ये क्रांतीकारी सुवर्णपदके


तिरंग्यासहित भारतीय पुरुष संघ आणि प्रशिक्षक

सकाळी अटीतटीच्या उपांत्य फेरीत सिंगापूरविरुध्द २-२ अशी सामन्यांची बरोबरी झाली त्यावेळी भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू अचंता शरथकमले अंतिम सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाद्वारे 11-5,12-10,12-10 असा झुई पेंगवर विजय मिळवत भारतीय संघाला सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये स्थान मिळवून दिले.अंतिम सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळ करत नायजेरियाचा ३-० असा पराभव केला आणि तब्बल 12 वर्षानंतर टेबल टेनिसमध्ये  सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. .

पहिला सामना अंचता शरथ कमलने ३-०सरळ सेटमध्ये जिंकत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. युवा खेळाडू सवथीन गणशेखरने पुढील सामना ३-१ असा जिंकला. पुरुष दुहेरीत सवथीनसह हरमीत देसाईने नायजेरियन जोडी  विरुद्ध ३-० ने सामना जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. साखळी सामन्यामध्ये त्रिनिनाद टोबेगो, उत्तर आर्यलंड यांचा पराभव केला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुध्द विजय मिळविला होता. अमलराज आणि सनील शैटी या खेळाडूंनीही या सुवर्ण वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले. भारताचे इटालियन प्रशिक्षक मसीमो कोन्संटिनी यांचेही अभिनंदन.

सुवर्णपदकासहित महिला संघ

दोन दिवसात टेबल टेनिस हा भारतीयांसाठी सुवर्णपदक देणारा खेळ ठरला आहे.महिला संघाने सुवर्ण कामगिरी केल्या नंतर आज पुरुष संघाने सुवर्ण जिंकुन टेबल टेनिसच्या नव्या वाटचालीची सुरुवात केली आहे. वैयक्तिक टेबल टेनिस स्पर्धा अजून बाकी असून यातही आपले खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांच्या कामगिरीमुळे वाटत आहे.

टेबल टेनिस खेळामध्ये भारतीय खेळाडू  आहेत हे कालपर्यंत अनेकांना माहिती ही नसेल. काल महिलांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेकांनी स्टेटस, पोस्ट करत महिला संघाचे अभिनंदन केले आणि  आज भारतीय पुरुष टेबल टेनिसपटूंनी ही सुवर्णपदक जिंकून टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंची गुणवत्ता दाखवून दिली. या खेळाला दोन दिवसापासून मिळणारी लोकप्रियता अशीच वाढावी ही सदिच्छा.

बॅडमिटंन मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

आज बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकत. बॅडमिंटनचा नवा अध्याय लिहिला आहे. गोपीचंद  यांनी तयार केलेल्या या परिपूर्ण संघात सर्वच खेळाडू सरस आहेत. वैयक्तिक प्रकारात सायना, सिंधू, कदंम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यम, एच एस प्रणॉय तर दुहेरीत अश्विनी पोनप्पा हे यशस्वी कामगिरी करत होतेच मात्र आज संघ म्हणून देशाकरिता ऐतिहासिक कामगिरी करुन बॅडमिंटनमधील प्रत्येक प्रकारात भारत यश संपादन करु शकतो हा विश्वास जागृत केला आहे.

साखळी सामन्यांपासून सुरु असलेली बॅडमिंटनमधील विजयी घौडदौड कायम ठेवत भारताने चारवेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मलेशियाचा पराभव केला. या विजयासह पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावले. अश्विनी पोनप्पा आणि 17 वर्षीय सात्विक रेड्डी यांनी पहिला सामन्यात 21-14, 15-21, 21-15 असा मलेशिय मिश्र दुहेरी संघाचा पराभव केला. तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवर असताना अश्विनी पोनप्पाने अनुभवाच्या जोरावर सत्विकसह या सामन्यात विजय मिळविला. कदंम्बी श्रीकांतने ऑलंम्पिक रौप्यपदक विजेता ली चाँग विरुध्द सामना 21-17,21-14 असा जिंकत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिल्यांदाच ली चाँग वीचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात युवा सात्विक रेड्डी आणि चिराग शेट्टीचा पुरुष दुहेरीत मलेशियन दुहेरी संघाने 15-21, 20-22 असा पराभव केला. दोन्ही भारतीय युवा खेळाडूंनी चांगला संघर्ष केला.


2-1 अशी स्थिती असताना भारताची फुलराणी आणि सर्वात अनुभवी खेळाडू सायनाने महिला ऐकेरीचा सामना 21-11, 19-21, 21-9 असा जिंकत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. पहिल्या गेममध्ये सायनाने शेवटचे 12 गुण थेट मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सायना आघाडीवर असताना मलेशियन सोनिया चेहने सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये 9-9 अशी बरोबरी असताना सायनाने आपला जादुई खेळ दाखविला. सायनाचा झंझावात एवढा होता की सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला 9 गुणानंतर एकही गुण प्राप्त करायला दिला नाही. सायनाचा तिसऱ्या गेममधील खेळ डोळ्याच पारणे फेडणारा होता. या तिसऱ्या गेमच्या विजयासह भारताने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

साखळी सामन्यात श्रीलंका, पाकिस्तानचा पराभव भारतीय संघाने केला. उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशिअस आणि उपांत्य फेरीत बलाढ्य सिंगापूरला भारतीय संघाने हरविले होते. रुत्विका गद्दे, प्रणव चोप्रा, एन सिक्कीरेड्डी, या खेळाडूंनी या सुवर्णवाटचालीत महत्वपूर्ण योगदान दिले. प्रणॉय कुमारसहित पी सिंधूचाही समावेश या संघात होता मात्र दुखापतीमुळे सांघिक सामने सिंधूने खेळले नाहीत. वैयक्तिक सामने उद्यापासून सुरु होत आहेत या सामन्या सर्व भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना शुभेच्छा.

सलाम बॅडमिंटन संघ.  प्रशिक्षक गोपीचंद  आणि मिश्र जोडीचे प्रशिक्षक किम टेन हर यांना सलाम. रंग दे तिरंगा. चक दे इंडिया.